राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी
राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

पुणे : दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र झाल्या असताना शुक्रवारी (ता. ७) सांयकाळनंतर राज्यात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, नाशिक, पुणे, नगर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, अकोला, बुलडाणा, वाशीम, नागपूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी वादळी वारे, विजा, ढगांचा गडगडाट व गारांसह पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाळी हंगामातील ऊस, बाजरी, कडवळ, मका, भाजीपाला, आंबा, केळी, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शनिवारपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्राच्या प्रारंभालाच यंदा पावसाने हजेरी लावल्याने खरीप पूर्वमशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होणार आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांत शनिवारी (ता. ८) पहाटे पावसाच्या सरी बरसल्या. दुष्काळाच्या झळा सोसलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, येवला, चांदवड, निफाड या तालुक्यात सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला. खरीप हंगामाच्या त्याच्या आशाही पल्लवित झाल्या. गारांच्या पावसासह वादळी वाऱ्यामुळे फळबागा उन्मळून पडल्या असून, पशुधनाचा साठवलेला चाराही पावसात भिजला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, खेड, दौंड, हवेली तालुक्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी शुक्रवारी (ता.७) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने जबरदस्त तडाका दिला. अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाळी हंगामातील ऊस, बाजरी, कडवळ, मका, भाजीपाला, आंबा, केळी, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. देऊळगाव गाडा येथे गोठ्यावरील पत्रे अंगावर पडल्याने दोन बकऱ्या ठार झाल्या. शुक्रवारी रात्री वऱ्हाडाच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शी टाकळी, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर तालुक्यांत पावसाने हजेरी दिली. शनिवारी पहाटेपासून बुलडाणा, मोताळा, चिखली व इतर परिसरात पावसाने हजेरी दिली. वाशीममध्येही काही तालुक्यांत वादळी वारा, विजांच्या कडकडाटात पहिल्या पावसाचे आगमन झाले. नागपूर जिल्ह्याच्या पारशिवणी तालुक्‍यातील खेडी गावात शुक्रवारी (ता. ७) दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.  मराठवाड्यातील सुमारे दीडशे मंडळांत मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील मंडळात पावसाचा जोर अधिक होता. बीड जिल्ह्यातील माजलगाव, हिंगोली जिल्ह्यांतील नादापूर मंडळात ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जिंतूर शहरासह तालुक्‍यात वादळी वाऱ्यामुळे बागायती पिकांचे नुकसान झाले. झाडावर वीज पडून विसाव्याला उभे असलेले दोन जण गंभीर भाजले. तर नगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा, पारनेर आणि नेवासे तालुक्याच्या काही भागात शुक्रवारी (ता.७) सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. धालवडी येथे केशर पवार यांची गाय व शेळी मृत्युमुखी पडली. अनेक ठिकाणी फळबागाही उद्‌ध्वस्त झाल्या.

विदर्भात उष्ण लाटेचा इशारा विदर्भात आलेली उष्ण लाटही कायम आहे. शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे तापमानाचा पारा सातत्याने ४५ अंशांच्या पुढे आहे. मालेगाव, औरंगाबाद येथेही उष्ण लाटेची स्थिती होती. विदर्भात मंगळवारपर्यंत (ता.११) उष्णतेची तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

वादळी पावसाची शक्यता मॉन्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून, उद्यापासून (ता.१०) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता.९) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरसह मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. ८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६ (३.९), जळगाव ४२.८ (२.०), कोल्हापूर ३६.१(४.०), महाबळेश्वर ३१.५ (५.०), मालेगाव ४१.८ (४.५), नाशिक ३७.० (१.०), सांगली ३७.१ (३.०), सातारा ३८.६ (६.४), सोलापूर ३७.३ (०.५), अलिबाग ३६.८ (४.०), डहाणू ३५.२ (०.९), सांताक्रूझ ३४.९ (१.७), रत्नागिरी ३५.४ (३.८), औरंगाबाद ४१.६ (४.८), बीड ४१.० (३.८), परभणी ४२.१ (२.८), नांदेड ४०.५ (१.०), अकोला ४५.५ (५.५), अमरावती ४५.६ (६.३), बुलडाणा ४१.५ (५.४), बह्मपुरी ४७.१ (६.६), चंद्रपूर ४५.२ (४.१), गोंदिया ४३.५ (२.९), नागपूर ४६.७ (५.८), वाशीम ४४.६, वर्धा ४५.५ (५.२), यवतमाळ ४५.०(५.६).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com