वऱ्हाडात ठिकठिकाणी पाऊस, अकोट तालुक्यात तुरळक गारपीट

वऱ्हाडात ठिकठिकाणी पाऊस, अकोट तालुक्यात तुरळक गारपीट
वऱ्हाडात ठिकठिकाणी पाऊस, अकोट तालुक्यात तुरळक गारपीट

अकोला  ः मावळत्या वर्षात शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान केलेल्या पावसाने नवीन वर्षातही शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही. बुधवारी (ता. १) रात्री अकोला, बुलडाणा तसेच वाशीम जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी दिली. गुरुवारी (ता.२) सकाळीसुद्धा वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याने आता रब्बी हंगामाच्या अनुषंगाने शेतकरी चिंतेत सापडला आहे.  बुधवारी दिवसभर थंडीचा जोर तसेच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाचे वातावरण तयार होऊन सायंकाळी पाऊस सुरू झाला. रात्री ८ ते १० वाजेदरम्यान पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. रात्री साडे दहा ते एक वाजेदरम्यान अकोट तालुक्यात तुरळक प्रमाणात गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. पावसापेक्षा वाऱ्याचा जोर अधिक असल्याने या तालुक्यात बोचरा, रुईखेड परिसरात केळीच्या बागांमध्ये पाने फाटली. तर रामापूर गावात सुधीर भील यांच्या शेतात संत्र्याच्या झाडांवरील फांद्या तुटल्या. झाडांवरील फळे मोठ्या प्रमाणात जमिनीवर आली. असेच नुकसान इतर शेतकऱ्यांचेही झाले आहे. वाशीम जिल्ह्यात जऊळका रेल्वे परिसरातील विविध गावांमध्ये पावसाने हजेरी दिली. गुरुवारी सकाळी या जिल्ह्यातील कारपा भागात पावसाने दमदार हजेरी लावली. या भागात रब्बीत हरभरा, गहू पिकाची लागवड झालेली आहे. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, मोताळा व इतर तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस झाला. गुरुवारी दिवसभर आभ्राच्छादीत वातावरण बनलेले होते. वाशीम जिल्ह्यात गुरुवारी (ता. दोन) सकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने देगाव, वारा जहाँगीर, देपुळ, कुंभी परिसरातील गहू, हरभरा, तूर, कपाशी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. मानोरा तालुक्यातील भुली, विठोली परिसरातसुद्धा पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाशी दोन हात करणारा वाशीम जिल्ह्यातील शेतकरी आज झालेल्या गारपिटीमुळे उपरोक्त गावात पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी पहाटेपासूनच संपूर्ण जिल्हाभर पावसाला सुरुवात झाली होती. पावसाबरोबर वाशीम तालुक्यात देगाव कुंभी परिसरात काही काळ गारपीट झाली. तसेच मानोरा तालुक्यात भुली विठोली परिसरही गारपिटीच्या तडाख्यात सापडला. या गारपिटीने गहू, हरभरा, तुर या पिकांचे मोठे नुकसान झाले. भाजीपाल्यालाही फटका बसला. पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच यंत्रणांनी घटनास्थळी जाऊन पंचनाम्यांना सुरुवात केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com