बेदाणा हंगामाची तयारी सुरू

Preparation of currant season begins
Preparation of currant season begins

सांगली ः द्राक्ष उत्पादकांना अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या बेदाणानिर्मिती व्यवसायाचा चालू वर्षातील हंगाम सुरू होत असून केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बेदाणा शेडची उभारणी करण्याचे काम शेडमालकांनी हाती घेतले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बेदाणानिर्मितीसाठी द्राक्षे येतील असा अंदाज शेड मालकांनी व्यक्त केला आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील आगळगाव, शेळकेवाडी, केरेवाडी, घोरपडी, चोरोची आदी गावांतील बेदाणा शेडमध्ये मजुरांची वर्दळ वाढू लागली आहे. या परिसरात सुमारे ६ हजार बेदाणा शेड आहेत. यापैकी या हंगामात ७० ते ८० टक्के शेडमध्ये बेदाणानिर्मिती होण्याची शक्‍यता आहे. बेदाणानिर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. त्यामुळे बेदाणा शेड मालकांनी बेदाणा शेडची स्वच्छता करण्यास सुरवात केली आहे. त्याचप्रमाणे शेडची मोडतोड झाल्याने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर बेदाणानिर्मितीला सुरुवात होईल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बेदाणा तयार होण्यासाठी द्राक्षे येण्यास प्रारंभ होईल.

बेदाणा शेडवर हंगाम सुरू झाल्यापासून हंगाम संपेपर्यत १५ हजार बॉक्स (एक बॉक्स १५ किलोचा) बेदाणा तयार होतो. एका बेदाणा शेडवर तालुक्यातील सरासरी बेदाणानिर्मिती शेडची संख्या विचारात घेता एकूण सुमारे १५ ते १६ हजार टन बेदाणा तयार होतो. चार महिने चालणाऱ्या या बेदाणा हंगामामध्ये केवळ कवठेमहांकाळच नव्हे तर नजीकच्या जत, तासगाव, आटपाडी, सांगोला या तालुक्‍यांतील तसेच परजिल्हा व परप्रांतीय मजूर महिला-पुरुषांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. गेल्या दोन वर्षांपासून बेदाणा शेडवर यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे.

यंदा बेदाणानिर्मितीला लवकर सुरुवात होते आहे. त्यामुळे आम्ही बेदाणा शेडची दुरुस्तीचे काम हाती घेतले असून येत्या पाच ते सहा दिवसांत बेदाणा तयार करण्यासाठी शेतकरी येतील. - सुनील माळी, बेदाणा उत्पादक शेतकरी आणि बेदाणा शेड मालक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com