खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी सुरू

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी सुरू झाली आहे. मूग, उडीद पिकाखालील रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात कांदेबाग केळीची लागवड केली जाणार आहे.
Preparations for Kandebagh banana cultivation started in Khandesh
Preparations for Kandebagh banana cultivation started in Khandesh

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी सुरू झाली आहे. मूग, उडीद पिकाखालील रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात कांदेबाग केळीची लागवड केली जाणार आहे. यंदा लागवड सुमारे ५०० ते ६०० हेक्टरने वाढण्याचा अंदाज आहे.  

कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा तालुक्यात केली जाते. ही लागवड सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होते. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही लागवड सुरू असते. यंदा ही लागवड लवकर सुरू होऊ शकते. शेतकरी या लागवडीसाठी कंदांचा उपयोग करतात. त्यात उतिसंवर्धित रोपांच्या केळीतील कंद, आंबेमोहोर, महालक्ष्मी, बसराई आदी वाणांचा उपयोग केला जातो. काळ्या कसदार जमिनीत केळी लागवडीसाठी हलक्या जमिनीतील केळी बागांमधील कंद उपयोगात आणले जातात. 

जळगाव, चोपडा भागातील शेतकरी औऱंगाबादमधील सोयगाव, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातून कंद आणतात. यंदा हे कंद मोफत मिळतील, अशी स्थिती आहे. कारण नवती केळी अनेक भागात असून, ती बऱ्यापैकी काढणी होऊन रिकामी झाली आहे. मुबलक कंद उपलब्ध होतील, अशी स्थिती आहे. 

वाहतुकीसह तीन ते चार रुपये कंद, शेतकऱ्यांना लागवडीसाठी पडतो. चोपडा तालुक्यात सर्वाधिक चार ते साडेचार हजार हेक्टरवर केळीची लागवड शक्य आहे. त्यापाठोपाठ जळगाव तालुक्यात सुमारे १५०० ते १६०० हेक्टर, जामनेरात एक ते दीड हजार हेक्टरवर केळी लागवड होण्याचा अंदाज आहे.

शिरपुरात सुमारे दोन हजार हेक्टरवर कांदेबाग केळीची लागवड अपेक्षित आहे. गिरणा, अनेर, तापी नदीकाठी केळी लागवड अधिक होते. सध्या मुगाची काढणी सुरू आहे. तसेच उडीददेखील मळणीवर येत आहे. मळणीनंतर लागलीच क्षेत्राची मशागत करून लागवड केली जाईल, असे चित्र आहे. 

आमच्या भागात कांदेबाग केळी लागवड स्थिर राहील. पुढे कोरोना दूर होऊन केळीला बरे दर मिळतील, अशी अपेक्षा आहे.  - दीपक पाटील, शेतकरी, विटनेर (जि.जळगाव)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com