पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

पुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन दिवसांपासून पावसाने दणका दिला आहे. सोमवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. तर बारामती तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, जोरदार पावसाने अनेक गावांना झोडपून काढले. माळेगाव येथे सर्वाधिक १४५ मिलिमीटर, तर पणदरे येथे ११७ मिलिमीटर, वडगाव निंबाळकर येथे १३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

बारामतीमध्ये पावसाचा जोर प्रचंड असल्याने चारा पिके पाण्याखाली गेली होती. नीरा-बारामती रस्त्यावरून पाणी वाहू लागले. सोरटेवाडी येथे करंजे ओढ्याला आलेला मोठा पूर आल्याने ओढ्याकाठची घरे पाण्याखाली गेली. रस्त्यावरून वाहणाऱ्या वेगवान पाण्याने एका घराची संरक्षण भिंत ढासळवली. शेतजमिनीत पाणी साचल्याने शेतांचे तळे झाले. वाकी येथील छोटे धरण भरून सांडव्यातून पाणी वाहत होते. बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांतही जोरदार पाऊस पडला. उर्वरित सर्वच तालुक्यांत मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र, ढगाळ हवामानासह हलक्या सरी येत होत्या. 

सोमवारी (ता. २१) सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती. दुपारनंतर जिल्ह्याच्या अनेक भागांत ऊन पडले होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्याच्या सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागल्याने नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. वीर धरणातून साडेपाच हजार क्युसेक, नाझरे धरणातून २ हजार आणि उजनी धरणातून १२५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. तर घोड धरणातून ९०० क्युसेक, चासकमान ५५५, भामा आसखेड ५३० क्युसेक वेगाने, तसेच आंद्रा, कळमोडी धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : महसूल विभाग) : खडकवासला २०, खेड शिवापूर २४, किकवी २५, संगमनेर २१, निगुडघर २८, कार्ला २१, वेल्हा २५, राजगुरुनगर २४, पाईट २५, कडूस २०, वडगाव रसाई २२, शिरूर २०, बारामती ९०, माळेगाव १४५, पणदरे ११७, वडगाव निंबाळकर १३८, लोणी भापकर ६०, सुपा ७०, मोरगाव ४५, भिगवण ४८, इंदापूर २९, लोणी ६०, बावडा ३०, काटी ३२, निमगाव केतकी ४८, अंथुरणे ४०, सणसर ५३, पाटस ४९, यवत ४५, केडगाव ३३, वरवंड ४३, दौंड ३४, सासवड २८, भिवडी ३२, जेजुरी ४०, परिंचे ३५, वाल्हे ६३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com