मंत्रिमंडळ बैठकीत ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे सादरीकरण 

Presentation of 'Smart' Project at Cabinet Meeting
Presentation of 'Smart' Project at Cabinet Meeting

मुंबई : राज्यातील कृषी व कृषिपूरक व्यवसायाशी निगडित सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या साह्याने महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात बुधवारी (ता. १५) झालेल्या राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, या स्मार्ट योजनेचे नामकरण ‘स्व. बाळासाहेब ठाकरे योजना’ असे करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या साह्याने (IBRD) सुमारे २१०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामध्ये जागतिक बँकेच्या कर्जाचा हिस्सा १४७० कोटी रुपये, राज्य शासनाचा हिस्सा ५६० कोटी रुपये आणि सीएसआर मधून ७० कोटी रुपये राहणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कालावधी सात वर्षे इतका ठरविण्यात आला आहे. 

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी मालाच्या पणनविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यामध्ये शेतमाल बाजार प्रवेशाच्या नोंदी, प्रतवारी, गुणवत्ता तपासणी, संगणकीकृत शेतमाल लिलाव पद्धती, साठवणूक सुविधा, निर्यात सुविधा निर्मिती, अस्तित्वातील सुविधांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या व खासगी बाजार समित्यांना ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकीकृत बाजार नेटवर्कद्वारे (Network) जोडण्याची सुविधा यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती व त्यांच्या सक्रिय सहभागातून शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे, शेतमालाचे काढणीपश्चात व्यवस्थापन व प्राथमिक प्रक्रियेद्वारे मूल्यवृद्धी करणे, ग्राहकांसाठी सुरक्षित खाद्य (Safe Food) उत्पादित करण्यास मदत करणे आणि या सर्व उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांच्यासाठी उपजीविकेचे स्त्रोत निर्माण करणे आदी या प्रकल्पाचे प्रमुख उद्देश आहेत.

शेतकरी कंपन्या, गटांचे बळकटीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक कंपन्या, साधारण स्वारस्य गट, शेतकरी स्वारस्य गट यांची स्थापना करण्यासह त्यांचे बळकटीकरण आणि कौशल्य विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत स्थापित संस्थांची वार्षिक उलाढाल वाढविणे व त्यांची जोडणी प्रस्थापित खासगी व्यावसायिकांशी करण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्यात येणार आहे. शेतकरी उत्पादक संस्था, उत्पादक समूह व इतर संबंधित संस्थांचा विकास व्यापार केंद्र म्हणून केला जाईल. तसेच विभागनिहाय बाजार सुलभता केंद्राची (Market Facilitation Center) स्थापना केली जाईल. 

सर्वांची बाजार केंद्रांशी जोडणी प्रभावी कृषी पणन व्यवस्थेसाठी बाजार केंद्रांशी जोडणी करण्यासह या बाजार केंद्रात कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतकरी उत्पादक संस्था, ग्रामीण बाजार, वखार महामंडळ, खासगी बाजार इत्यादींचा समावेश असेल. ग्रामीण बाजारांतून वितरण केंद्रांची स्थापना आणि धान्य व फळे-भाज्या बाजार समूहाची स्थापना केली जाणार आहे.

आंबेडकरांच्या पुतळ्याची  उंची वाढविण्यास मान्यता इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील पुतळ्याची उंची ३५० फूट इतकी करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट, अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com