पशुधनासाठी मे महिन्यापर्यंतच्या चाऱ्यांची तजवीज

पशुधनासाठी मे महिन्यापर्यंतच्या चाऱ्यांची तजवीज
पशुधनासाठी मे महिन्यापर्यंतच्या चाऱ्यांची तजवीज

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील ११ लाख ४४ हजार ७२५ एवढ्या पशुधनास दर महिन्याला १ लाख ४४ हजार ९३६ टन चारा लागतो. गतवर्षीचा शिल्लक, खरीप तसेच रब्बीतून उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यांतून मे महिन्यापर्यंतची तजवीज होईल. जून महिन्यात चाऱ्याची तूट निर्माण होणार आहे. त्यासाठी पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात चारा उत्पादनाचे नियोजन केले आहे. या संदर्भात जिल्हा पशुधन संवर्धन उपायुक्त डाॅ. एम. आर. रत्नपारखी यांनी माहिती दिली.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३२ हजार ८४५ हेक्टरवर खरीप ज्वारीची पेरणी झाली होती. परंतु, पेरणीनंतर दोन ते तीन वेळा पडलेल्या पावसाच्या खंडामुळे ज्वारीची वाढ खुंटली. कडब्याच्या उत्पादनात मोठी घट आली. यंदा सप्टेंबरमध्ये पावसाळा संपला. कोरडवाहू क्षेत्रात ओलावा नसल्यामुळे रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली. आजवर रब्बी ज्वारीची केवळ ८ हजार ५४१ हेक्टरवर पेरणी झाली. त्यामुळे यंदा ज्वारीच्या कडब्याची उपलब्धता कमी होणार आहे. कमी पावसामुळे देगलूर, मुखेड, कंधार, लोहा तालुक्यातील अनेक मंडळातील गवत आॅक्टोबर महिन्यातच वाळून गेले. उर्वरित तालुक्यातही शेतशिवारात हिरव्या गवताची वाणवा आहे.

जूनमधील चाऱ्यासाठी नियोजन जून महिन्यात चाऱ्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. जून महिन्यात १ लाख ४४ हजार ९३६ टन चारा लागेल. त्यासाठी जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पांमधील उघड्या पडलेल्या जमिनीवर (गाळ पेरा क्षेत्र) मका लागवडीचे नियोजन आहे. साखर कारखान्यांच्या परिसरात उसाचे वाढे उपलब्ध होतील. राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि एनडीडीबी योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेले चारा पिकांचे बियाणे तसेच ठोंबं यापासून चारा उपलब्ध होईल. इसापूर धरणातून रब्बी तसेच उन्हाळी हंगामात पाणी आवर्तने मिळणार आहेत. अर्धापूर, हदगांव, नांदेड, मुदखेड तालुक्यातील उन्हाळी ज्वारीचे उत्पादन घेतात. कालव्याच्या पाण्यामुळे चारा पिकांची लागवड होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com