चांगले काम करूनही पक्षाने साथ दिली नाही : राधाकृष्ण विखे पाटील

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून साडेचार वर्षांत चांगले काम केले. अनेक प्रश्न सोडविले. माझ्यासोबतच पक्षाची प्रतिमा स्वच्छ ठेवली. कुठल्याही तडजोडी केल्या नाहीत. मात्र पक्षाकडून वास्तव समजून घेतले गेले नाही. चांगले काम करूनही पक्षाने साथ दिली नाही, अशी खंत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांशी बोलून राजकीय निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी (ता. २७) लोणी (ता. राहाता) येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की नगर दक्षिणच्या जागेवर तीन वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पराभूत झाल्यानंतर ही जागा कॉंग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून साडेचार वर्षात चांगले काम केले. माझ्याबाबत राज्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्याची तक्रार नव्हती. मात्र डॉ. सुजय विखेसाठी नगर दक्षिणची जागा मिळावी यासाठी मी पक्षनेतृत्वाला भेटलो. मात्र पाहिजे तशी साथ मिळाली नाही. पक्षाने वास्तव समजून घेतले नाही. शरद पवार यांनी माझे वडील स्व. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल अवमानास्पद शब्द वापरले. आजोबांचा अवमान सहन न झाल्यानेच सुजयने भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीची भूमिका आमच्याबाबत अजिबात चांगली नाही. त्यामुळे मी मुलाच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली.

मुख्यमंत्री माझे मित्र आहेत हाच माझ्याबाबत आक्षेप असणे चुकीचे आहे. अनेकांना माझी बदनामी करण्यासाठी हाच मुद्दा पुरेसा वाटत होता. निवडणुकीत पक्षाने मला प्रचारापासून दूर ठेवले. पक्षाने माझा राजीनामा स्वीकारला असला तरी मी समाधानी आहे. कारण साडेचार वर्षांत मी चांगले काम केले. आमच्या रेट्यामुळेच सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. आता माझ्यासमोर कामाचे आव्हान आहे, असे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.   `पाणी प्रश्नावर लढा उभारणार` राधाकृष्ण विखे म्हणाले, की पश्चिम वाहिन्यांचे पाणी समुद्राला वाहून जाते, ते गोदावरी खोऱ्यात आणावे यासाठी माझ्या वडिलांनी (स्व. बाळासाहेब विखे) अनेक वर्ष लढा दिला. मात्र ज्यांच्याकडे अनेक वर्षे पाटबंधारे खाते होते त्यांनी आम्हाला श्रेय मिळेल म्हणून हे काम केले नाही. पाण्याबाबत जनता आसूसलेली आहे. प्रांतवाद निर्माण झाले, पण पाणी मिळालेच नाही. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. पाण्यासाठी मला नवा संघर्ष उभा करायचाय. संघटितपणे सगळ्यांना बरोबर घेऊन मी काम करणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com