कांदा दरनियंत्रणासाठी केंद्राकडून दबावतंत्र

कांदा
कांदा

नाशिक: कांदा दरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय ग्राहक सेवा मंत्रालय व कृषी मंत्रालयाच्या पथकाने लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी (ता. २७) पुन्हा बैठक घेऊन दरनियंत्रणासाठी व्यापाऱ्यांना तंबी दिल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय उपस्थित काही शेतकऱ्यांनाही तुम्ही ‘कांदा साठवणूक का करता, विक्रीस उपलब्ध करा’ असे सांगिल्याचे सूत्रांनी सांगितले.   कांद्याची दरवाढ, आवक व बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी गेल्या आठवड्यात (ता. २०) केंद्रीय पथकाने नाशिक व नगर जिल्ह्यांतील कांदा उत्पादक, बाजार समित्या व व्यापाऱ्यांच्या भेटी दिल्या.  चार दिवसांच्या दौऱ्यानंतर पथकाने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे सांगितले होते. कांदा आवक, माल आणणारा घटक, अंदाजे साठा आदींची सविस्तर माहिती मागविली. सध्या कांदा उत्पादक पट्ट्यात मागणीप्रमाणे कांदा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या पाहणीत समोर आले होते. मात्र यानंतरही शुक्रवारी (ता. २७) पुन्हा लासलगाव बाजार समितीत येऊन येथील प्रमुख व्यापाऱ्यांबरोबर केंद्रीय पथकाने बैठक घेतली. या वेळी कांदा दरनियंत्रणासाठी व्यापाऱ्यांवर दबाव टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  या पथकाने कांद्याचे दर कमी करण्याबाबत व्यापाऱ्यांना बोलावून घेत तत्काळ साठवलेला साठा वितरित करावा, अशा सूचना केल्या. बाजारात होत असलेल्या दरवाढीला कांदा व्यापारी जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप पथकातील एका अधिकाऱ्याने केला. या वेळी बाजारात कांदा विक्रीसाठी आलेल्या चार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बोलावून तुमच्याकडे किती कांदा शिल्लक आहे, तो तातडीने विकून का टाकात नाही, असा प्रश्‍न केला. यानंतर बाजारात होणारी आवक, कांदासाठा उपलब्धतेविषयी अभ्यासकांनी बाजू मांडली. मात्र पथकाने काहीही स्पष्टपणे ऐकू न घेता दरनियंत्रणासाठीचा आग्रह धरला. ग्राहकांचा विचार सरकारने जरूर करावा, मात्र कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांना सरकारने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न झाला. मात्र पथकाने ही सूचना लक्षात घेतली नाही. या शिष्टमंडळात ग्राहक सेवा मंत्रालयाचे वित्तीय सल्लागार अवधेश चौधरी, एमआईडीएचचे फलोत्पादन आयुक्त बी. एन. एस. मूर्ती, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, पणन मंडळाचे प्रभारी विभागीय उपसरव्यवस्थापक बहादूर देशमुख हे उपस्थित होते.  शेतकऱ्यांचा प्रतिप्रश्‍न...  बैठक आटोपताच काही शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाला प्रश्‍न विचारण्याचा प्रयत्न केला. तुम्ही भाव पडल्यानंतर कारणे जाणून घ्यायला का येत नाही, असे विचारताच अधिकाऱ्याने निरुत्तर होत थेट गाडीत बसणे पसंत केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com