कांदा दरांवर खानदेशात दबाव

कांदा दरांवर खानदेशात दबाव
कांदा दरांवर खानदेशात दबाव

जळगाव  ः खानदेशात प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागील ८ ते १० दिवसांपासून स्थिर आहे. आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. दरात मात्र चढउतार सुरू आहे. दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत.  ऑक्‍टोबरमध्ये लागवडीच्या कांद्याची काढणी काहीशी उशिराने झाली. कांद्याची काढणी करून काही भागांत त्याची साठवणूक झाली होती. जळगाव, धुळे, चाळीसगाव, साक्री (जि. धुळे), अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) येथील बाजारात कांद्याची आवक स्थिर आहे. या बाजारांमध्ये मिळून रोज सरासरी साडेपाच ते सहा हजार क्विंटल कांद्याची आवक मागील आठवडाभरात झाली आहे. सर्वाधिक आवक साक्री, जळगाव, अडावद, धुळे येथील बाजारात होत आहे. तर किनगाव, चाळीसगाव बाजारातील आवक कमी झाली आहे. मागील वर्षी जळगावच्या बाजारात डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान प्रतिदिन सरासरी दोन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यात पांढऱ्या कांद्याचीदेखील आवक होत होती.  यंदा पांढऱ्या कांद्याची आवक नगण्य अशीच आहे. लाल कांद्याला जळगावच्या बाजारात मागील सात ते आठ दिवसांपासून प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये दर नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. दर हवे तसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. परंतु कांद्याची १० ते १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ साठवणूक करता येत नसल्याने त्याची विक्री शेतकरी बाजारात करीत आहेत.  कांद्याची आवक औरंगाबाद, जालना, बुलडाण्यासह जळगाव, चोपडा, भुसावळ, यावल, धुळे, पाचोरा आदी भागातून होत आहे. कांद्याचे दर मागील महिन्यात २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. आवकही कमी होती. परंतु, सध्या आवक वाढली आहे. पुढे आवक वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com