जळगाव : कांदा दरांवरील दबाव कायम

कांदा दरांवरील दबाव कायम
कांदा दरांवरील दबाव कायम

जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढत असल्याने दरांवर दबाव वाढत आहे. महिनाभरात लाल कांद्याचे दर क्विंटलमागे २०० रुपयांनी कमी झाले आहेत. यातच मध्य प्रदेश, गुजरातच्या बाजारातही हवे तसे दर नाहीत. खानदेशात सध्या किमान ७०० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर कांद्याला मिळत आहे.  खानदेशात कमी दर असल्याने मध्यंतरी काही शेतकरी कांदा विक्रीसाठी मध्य प्रदेशातील इंदूर व गुजरातमधील सुरतच्या बाजारात कांदा घेऊन गेले होते. तेथेही कमाल दर १५०० रुपयांपर्यंतच आहे. कांदा तेथे धुळे किंवा नंदुरबारमधून पोचविण्यासाठी किलोमागे दोन रुपये खर्च येत आहे. यामुळे तेथील बाजारातील दरही परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.   कांद्याची आवक मागील महिनाभरापासून स्थिर होती. अशातच मागील पंधरवड्यात आवक वाढली आहे. खानदेशात धुळ्यातील पिंपळनेर, धुळे, जळगावमधील अडावद, जळगाव, चाळीसगाव येथील बाजार लाल कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या जळगाव, धुळे, चाळीसगाव, साक्री (जि.धुळे), अडावद (ता.चोपडा), किनगाव (ता.यावल) येथील बाजारात कांद्याची आवक वाढल्याची स्थिती आहे. या बाजारांमध्ये मिळून रोज सरासरी सहा हजार क्विंटल कांद्याची आवक सुरू आहे. सर्वाधिक आवक साक्री, जळगाव, अडावद, धुळे येथील बाजारात होत आहे. तर किनगाव, चाळीसगाव बाजारातील आवक कमी झाली आहे. सध्या कमाल दर १२०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. मागील महिन्यात कमाल दर १६०० रुपयांपर्यंत होता. अर्थातच कमाल दरात क्विंटलमागे मोठी घसरण झाली आहे. दरांवरील दबाव वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे. कारण खानदेशात लागवड वाढली असून, यंदा मार्चनंतर अधिकची आवक होईल. त्या वेळेस दबाव कायम राहिला तर कांदा परवडणार नाही, अशी भिती शेतकऱ्यांना आहे.  सध्या कांद्याची आवक जळगाव, चोपडा, भुसावळ, यावल, धुळे, पाचोरा आदी भागातून होत आहे. दर अपेक्षित मिळत नसल्याने अनेक शेतकरी आपल्या कांद्याची पाठवणूक मध्य प्रदेश, नाशिक जिल्ह्यातील लासलगावच्या बाजारात करीत आहेत. तेथे कमाल दर १५०० रुपयांपर्यंत मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना तेथील बाजारातही फटका बसत आहे. लाल कांद्याची आवक सध्या अधिक आहे. पांढऱ्या कांद्याची आवक कमी आहे. अशातच कांदा दरांवरील दबाव दूर करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com