‘मिशन बालाकोट’च्या वीरांचा गौरव; विंग कमांडर वर्धमान यांना वीर चक्र

‘मिशन बालाकोट’च्या वीरांचा गौरव; विंग कमांडर वर्धमान यांना वीर चक्र
‘मिशन बालाकोट’च्या वीरांचा गौरव; विंग कमांडर वर्धमान यांना वीर चक्र

नवी दिल्ली : पाकिस्तानी हवाई दलाचे ‘एफ-१६’ हे लढाऊ विमान पाडणारे व नंतर पाकिस्तानच्या तावडीत सापडूनही अतुलनीय धाडसाचे दर्शन घडविणारे हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना बुधवारी (ता.१४) वीरचक्र जाहीर झाले. याबरोबरच जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेले बेळगावचे जवान प्रकाश जाधव यांना कीर्तीचक्र सन्मान घोषित झाला. विंग कमांडर वर्धमान यांना हवाई दलाच्या कंट्रोल रूममधून तातडीची व महत्त्वाची माहिती आणि मदत करणाऱ्या स्वाड्रन लिडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा पदक जाहीर झाले आहे. बालाकोटवर हवाई हल्ला करून ‘जैशे महंमद'चे दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त करणाऱ्या मोहिमेत बॉंब डागणाऱ्या लढाऊ विमानांचे सारथ्य करणारे हवाई दलाचे विंग कमांडर अमित रंजन, स्क्वाड्रन लिडर राहुल बोसाया, पंकज भुजडे, बी. के. एन. रेड्डी व शशांक सिंह या पाच जणांना विशेष वायूसेना पदकांनी सन्मानित केले जाणार आहे. हे सारे ‘मिराज-२०००' या लढाऊ विमानांचे पायलट आहेत. देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना परमवीर चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र आणि वीर चक्र ही पदके देऊन सन्मानित करण्यात येते. विंग कमांडर वर्धमान यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांच्या नावाची वीरचक्रसाठी शिफारस करण्यात आली होती. आज स्वातंत्र्यदिनी (ता. १५) त्यांना पदक प्रदान करण्यात येणार आहे. पुलवामामध्ये पाकप्रशिक्षित दहशतवाद्यांनी यावर्षी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर केलेल्या भयंकर हल्ल्यात चाळीस जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यानंतर हवाई दलाने फेब्रुवारीमध्ये थेट पाकिस्तानच्या बालाकोटमधे घुसून "जैशे महंमद'च्या दहशतवादी तळावर जोरदार हवाई हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सजग असलेल्या भारतीय हवाई दलाने त्यांना पिटाळून लावले होते. पाकिस्तानी हवाई दलाचे "एफ-१६' हे विमान विंग कमांडर वर्धमान यांनी अचूक मारा करीत पाडले होते. मात्र, या वेळी त्यांचे लढाऊ विमान पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर हद्दीत अपघातग्रस्त झाले होते. तब्बल ६० तास पाकिस्तानच्या तावडीत सापडूनही त्यांनी आपल्या कणखरपणाचे दर्शन घडवले होते. शत्रू राष्ट्राला देशासंबंधीची कोणतीही संवेदनशील माहिती कळू दिली नव्हती. विंग कमांडर वर्धमान यांच्या त्वरित सुटकेसाठी भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या माध्यमातून पाकिस्तानचे नाक दाबल्यावर या देशाला त्यांना मुकाट्याने सोडून द्यावे लागले होते. पाकच्या तावडीत सापडल्यावर तिसऱ्या दिवशी रात्री वाघा सीमेमार्गे अभिनंदन मायदेशात सुखरूप परतले होते. कीर्ती चक्र

  • शिपाई प्रकाश जाधव
  • सीआरपीएफ कमांडंट हर्षपाल सिंह
  • वीर चक्र

  •   विंग कमांडर अभिनंदन वर्धमान
  • शौर्य चक्र

  • लेप्टनंट कर्नल अजयसिंह कुशवाह
  • विभूती शंकर ढोंढियाल (मरणोत्तर)
  • कॅप्टन महेश्वर कुमार भूरे
  • लान्सनायक संदीप सिंह (मरणोत्तर)
  • शिपाई ब्रजेश कुमार (मरणोत्तर)
  • हरी सिंह (मरणोत्तर)
  • रायफलमन अजवीर सिंह चौहान
  • रायफलमॅन शिव कुमार (मरणोत्तर)
  • युद्ध सेवा पदक

  •   स्क्वाड्रन लिडर मिंटी अग्रवाल
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com