गाईच्या दुधाचे दर दोन रुपयांनी केले कमी 

एक एप्रिलपासून अपवाद वगळता राज्यातील बहुतांश संघांनी गाईच्या दुधाचे प्रति लिटर दोन रुपये दर कमी केले आहे. केवळ दोन संघांनी एक रुपया प्रति लिटर दर कमी केले आहेत.
The price of cow's milk has been reduced by two rupees
The price of cow's milk has been reduced by two rupees

नगर : कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याने आता कुठे सावरत असलेल्या दूध व्यवसायावर पुन्हा एकदा संकटात येऊ लागला आहे. एक एप्रिलपासून अपवाद वगळता राज्यातील बहुतांश संघांनी गाईच्या दुधाचे प्रति लिटर दोन रुपये दर कमी केले आहे. केवळ दोन संघांनी एक रुपया प्रति लिटर दर कमी केले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक पुन्हा एकदा हवालदिल झाले आहेत. दर कमी झाल्याने दररोज राज्यातील दूध उत्पादकांना अडीच ते तीन कोटींचा फटका बसत आहे. 

राज्यात साधारण दीड कोटी लिटरच्या जवळपास गाईच्या दुधाचे दररोज संकलन केले जाते. संकलित होणाऱ्या दुधापैकी चाळीस टक्के दुधाची पावडर व उपपदार्थ होतात. उर्वरित दूध थेट ग्राहकांना पिशवीतून वितरित केले जाते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे दुधाची मागणी घटली व दूध पावडरचे दर कमी झाले होते. त्यामुळे दुधाचे दर पडून ते थेट १७ ते १८ रुपयांवर आले होते. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर मागणी वाढल्याने गेल्या तीन महिन्यांपासून दराची परिस्थिती काहीशी सुधारली होती. ३.५ फॅट व ८.५ एफएनएस असलेल्या गाईच्या दुधाला अलीकडे ३१ ते ३२ रुपयांपर्यंत दर मिळत होता. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने तोटा सोसत असलेल्या दूध उत्पादकांना दिलासा मिळत होता, परंतु सध्या २८ ते २९ रुपये दर मिळत आहेत. 

मात्र पंधरा दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यातील बहुतांश भागांत लॉकडाउनची चर्चा होत आहे. काही जिल्ह्यांत लॉकडाउन झाले आहे. आठवडे बाजार, हॉटेल, लग्नसोहळे व इतर मोठे, धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. याच कार्यक्रमात तसेच हॉटेल्सला बटर, पनीर, दही, ताक, लस्सी, आइस्क्रीम याला मागणी असते. मात्र लॉकडाउनच्या भीतीने आठ दिवसांपासून वीस टक्के मागणी कमी झाली आणि दूध पावडरीचे दरही कमी झाल्याचा दावा खासगी दूध संघाकडून केला जात आहे. 

या सर्व बाबींचा गंभीर परिणाम दिसत असून, एक एप्रिलपासून दोन संघ वगळता राज्यातील खासगी दूध संघानी प्रति लिटर दोन रुपये दर कमी केले आहेत. एक दूध संकलन केंद्र चालकाने सांगितले. ‘‘आम्हाला तशा तोंडी सूचना दिल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिली, तर अजून दर कमी होण्याची भीती आहे. या प्रकाराने दूध उत्पादक पुरता उद्‌ध्वस्त होईल. सरकारनेच दूध उत्पादकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.’’ 

लॉकडाउन होईल याची सगळ्यांनाच भीती आहे. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांची खरेदी कमी झाल्याने साधारण दुधाची मागणी वीस टक्क्यांनी घटली आहे. त्याचा परिणाम निश्‍चित दरावर परिणाम होत आहे.  - प्रकाश कुतवळ, सचीव, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ. 

गेल्या वर्षभरापासून शेतकरी वेगवेगळ्या संकटाने पुरला खचून गेला आहे. दुधातून गेल्या वर्षी मोठा तोटा सहन केला. गेल्या दोन महिन्यांपासून कुठे परिस्थिती सुधारली की लगेच कोरोनाच्या कारणाने दुधाचे दर कमी केले आहेत. असेच राहिले तर पुन्हा एकदा दूध व्यवसाय अडचणीत येईल. शासनाने आता लक्ष घालून शेतकऱ्यांचा विचार करत दुधाचे दर कमी होणार नाहीत याचा विचार करावा.  - नंदकुमार रोकडे, दूध उत्पादक, खडकी, ता. नगर, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com