संकेश्‍वरी मिरचीला दराचा ठसका; कमाल दर दीड लाखावर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मिरची उत्पादक प्रदेशात चार महिन्यांपूर्वी पाऊस झाल्याने मिरचीच्या आवकेत घट झाली आहे. यामुळे यंदाही गडहिंग्लज जवारी (संकेश्‍वरी) मिरचीचे दर उच्चांकी आहेत.
Price hike of Sankeshwari Chili
Price hike of Sankeshwari Chili

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मिरची उत्पादक प्रदेशात चार महिन्यांपूर्वी पाऊस झाल्याने मिरचीच्या आवकेत घट झाली आहे. यामुळे यंदाही गडहिंग्लज जवारी (संकेश्‍वरी) मिरचीचे दर उच्चांकी आहेत. घाऊक बाजारात या मिरचीला क्विंटलला किमान ८०००० ते कमाल १५०००० रुपयापर्यंत दर मिळत आहे. सध्या मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये मिरचीची चणचण जाणवत आहे. या शिवाय इतर जातीच्या मिरचीच्या दरातही किलोमागे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे.

संकेश्‍वरी मिरचीची गडहिंग्लज व कर्नाटकातील संकेश्‍वर चिकोडी भागात लागवड केली जाते. यंदा पीकवाढीच्या अवस्थेत असतानाच सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान वादळी पाऊस झाला. यामुळे मिरचीचे व्यवस्थापन करणे अशक्य बनले. यामुळे शेतकऱ्यांना जेवढे अपेक्षित उत्पन्न होते तेवढे मिळाले नाही. मागणी कायम असल्याने शेजारील बाजारपेठांमध्ये या मिरचीचे दर चढेच राहिले. हंगामाच्या सुरुवातीला ६०००० रुपयांपासून सुरू झालेले दर हंगाम संपतेवेळी १५०००० रुपयांपर्यंत गेले आहेत. गेल्या वर्षीही १८०००० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. यंदा दर चांगला मिळाला असला तरी उत्पादनात घट आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

इतर मिरच्यांचे दरही वाढले सध्या पश्‍चिम महाराष्ट्रात जवारीबरोबर ब्याडगी, गुंटूर लवंगी मिरचीलाही मागणी असते. ब्याडगीचे उत्पादन रायचूर, हुबळी भागात होते. तर गुंटूर, लवंगी मिरचीची मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशमध्ये लागवड होते. सध्या अणेगिरी, ब्याडगीस क्विंटलला २९००० ते ३१०००, गुंटूर मिरचीस क्विंटलला १२५०० ते १५०००, लवंगी मिरचीस १७००० ते १८००० रुपये दर मिळत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मिरची बाजारात तेजी कायम आहे. अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने मिरची उत्पादनात घट झाली. मिरचीच्या आवकेवर परिणाम झाल्याने मिरचीच्या दरात वाढ दिसून येत आहे. - किरण तपकिरे, मिरची व्यापारी, कोल्हापूर

यंदा मिरची फळधारणेच्या वेळीच पाऊस आल्याने मिरचीच्या वाढीवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. यामुळे उत्पादनात घट झाली. यंदा प्रत्येक वर्षापेक्षा सुमारे तीस टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी झाले आहे. - मारुती हुल्ली, मिरची उत्पादक, निलजी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com