यंदा हंगामात सोयाबीनच्या दरात तेजीचा अंदाज

यंदा हंगामात सोयाबीनच्या दरात तेजीचा अंदाज
यंदा हंगामात सोयाबीनच्या दरात तेजीचा अंदाज

अमरावती  ः सोयाबीनचा हंगाम सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाच बाजारात सोयाबीन दरात तेजी अनुभवल्या जात आहे. कापसाला गेल्या हंगामात मिळालेल्या चांगल्या दराच्या परिणामी कापूस लागवड क्षेत्रात झालेली वाढ आणि घटलेले सोयाबीन क्षेत्र यामुळे ही वाढ झाल्याचे जाणकार सांगतात. कारंजा (वाशीम) बाजार समितीत नव्या सोयाबीनला शनिवारी (ता. २१) प्रतिक्‍विंटल ३१३१ रुपयांचा दर मिळाला. जिल्ह्यात मागील काही वर्षांत सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमीने झाली. परिणामी शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन घेण्याप्रती उदासीनता वाढीस लागली. त्याच कारणामुळे या वर्षी जिल्ह्यात सोयाबीन लागवड क्षेत्रही घटले. याउलट कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाली. गेल्या खरिपात शासनाने सोयाबीनला ३३९९ रुपयांचा हमीभाव जाहीर केला. परंतु वर्षभर खुल्या बाजारात सोयाबीनची हमीभावाने खरेदी झाली नाही, हे वास्तव आहे. अशा स्थितीत यंदा शासनाने सोयाबीनला ३७१० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  दोन आठवड्यांपासून सोयाबीन दरात तेजी येत ते हमीभावाच्या पुढे गेले आहेत. शनिवारी ३२०० ते ३८१५ रुपये क्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार झाले. डिसेंबरकरिता विक्रीसाठी सोयाबीनला विक्रमी ४ हजार रुपयांचा दर एनसीडीईएक्‍सच्या ऑनलाइन प्लॅटफार्मवर शुक्रवारी (ता. २०) होता. त्यानंतर दरात ३५०० पर्यंत घसरण ही नोंदविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या वर्षी अमरावती जिल्ह्यात २ लाख ३८ हजार ७२६ हेक्‍टरवर सोयाबीन तर २ लाख ७६ हजार ०७८ हेक्‍टरवर कपाशीची लागवड आहे.  नव्या सोयाबीनची आवक कारंजा (वाशीम) बाजार समितीत शनिवारी पहिल्यांदा नव्या सोयाबीनची आवक झाली. १० क्‍विंटल इतकी अत्यल्प ती होती. या सोयाबीनला ३१३१ रुपये क्‍विंटलचा दर मिळाला, असे बाजार सूत्रांनी सांगितले. जुने सोयाबीनला कमीतकमी ३४५० तर जास्तीत जास्त ३८७५ इतका दर मिळाला. ९०० क्‍विंटल जुने सोयाबीन बाजारात दाखल झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com