मित्रपक्षांच्या साक्षीने मोदींचा उमेदवारी अर्ज

मित्रपक्षांच्या साक्षीने मोदींचा उमेदवारी अर्ज
मित्रपक्षांच्या साक्षीने मोदींचा उमेदवारी अर्ज

वाराणसी ः प्रकाशसिंग बादल (अकाली दल), नितीशकुमार (जेडीयू), उद्धव ठाकरे (शिवसेना), रामविलास पासवान (लोजपा), ओ. पनीरसेल्वम (अण्णाद्रमुक), अनुप्रिया पटेल (अपना दल), नागालॅंड, मेघालयाचे मुख्यमंत्री भाजप आघाडीचे तब्बल बारा ते तेरा नेते शुक्रवारी वाराणसीत एकत्र आले होते. हे महाशक्तिप्रदर्शन होते वाराणसीच्या भावी खासदाराला, अर्थात नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी.

गुरूवारी पाच ते शुक्रवारी दुपारी १२.४५ अशा २० तासांच्या मोदींच्या काशी मुक्कामाचा भाजपने मेगा इव्हेंट केला. काशीनगरीला अलविदा म्हणताना मोदींनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही मजबूत करा, असा संदेश पुन्हा एकदा मतदारराजाला दिला. वाराणसीत शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी मतदान आहे त्याआधी मोदींची एकच जाहीर सभा येथे होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मदनमोहन मालवीय यांच्या मानसकन्या, ९१ वर्षीय अन्नपूर्णा शुक्‍ला, जनसंघ- भाजपचे जुने कार्यकर्ते सुभाष गुप्ता, ‘आयसीएआर’चे वैज्ञानिक रमाशंकर पटेल, दशाश्वमेध घाटावर अंत्यसंस्कार करणाऱ्या डोम राजाचे वंशज जगदीश चौधरी हे यंदा पंतप्रधानांचे प्रस्तावक होते. जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याआधी मोदींनी काशीचा चौकीदार असलेल्या कालभैरवाच्या मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला. चाळीस अंश सेल्सिअसच्या प्रचंड उन्हातही या परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. माध्यमांसाठी राखीव कक्षातही भाजप कार्यकर्त्यांनी बिनदिक्कत घुसखोरी केली होती.

मोदींनी घेतले बादल यांचे आशीर्वाद मोदींनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एका वेगळ्या कक्षात जमलेल्या एनडीए नेत्यांबरोबर काही मिनिटे चर्चा केली, त्यांनी आल्याआल्याच बादल यांना वाकून नमस्कार करीत त्यांचे आशीर्वाद घेतले. 

एनडीएच्या नेत्यांव्यतिरिक्त अमित शहांसह सर्वश्री राजनाथसिंह, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा आदी भाजप नेते या वेळी उपस्थित होते. ‘एनडीए’च्या नेत्यांशी सकाळी शहा यांनी ताज हॉटेलमध्येही चर्चा केली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात पोचल्यानंतर मोदींनी श्रीमती शुक्‍ला आणि गुप्ता यांनाही वाकून नमस्कार केला. सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबारा या वेळेतच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यादरम्यान मोदींनी राज्यघटनेला स्मरून शपथही घेतली. अर्ज भरल्यानंतर त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांबद्दल प्रशंसोद्गार काढले.

लोकशाही मजबूत करा! अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना मोदी म्हणाले, की गुरूवारी मोठा रोड शो झाला. ही बाबाची नगरी, गंगामातेची नगरी मला पुन्हा एकदा आशीर्वाद देत आहे. भारताच्या उज्वल भविष्यासाठी काशीवासीय संकल्पबद्ध आहेत. माझे एकच आवाहन आहे की ज्या टप्प्यांत निवडणूक बाकी आहे तेथे लोकशाहीचा उत्सव शांततेने व उत्साहाने साजरा करावा. वाराणसीत मोदी तर विजयी झालेच आहेत असे समजून मतदान न करता स्वस्थ बसू नये. जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीला मजबूत करावे. ते म्हणाले, की प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही गेले वीस तास इतक्‍या भीषण उन्हात सतत काम केले आहे तुम्हा साऱ्या पत्रकारांचीही प्रकृती चांगली राहो, अशा माझ्या शुभेच्छा आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com