पाच वर्षांत साडेतीन लाख कोटी ‘जलजीवन’वर खर्च करणार : पंतप्रधान मोदी

पाच वर्षांत साडेतीन लाख कोटी ‘जलजीवन’वर खर्च करणार : पंतप्रधान मोदी
पाच वर्षांत साडेतीन लाख कोटी ‘जलजीवन’वर खर्च करणार : पंतप्रधान मोदी

औरंगाबाद ः जलजीवन मिशनच्या माध्यमातून आम्ही घर घर पाणी पोचवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. येणाऱ्या पाच वर्षात या अभियानावर आम्ही साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत. प्रत्येक घरात शौचालय आणि पाण्याने भरलेले घर असेल. महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी वॉटरग्रीडच्या माध्यमातून फडणवीस सरकार करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. येथील शेंद्रा एमआयडीसीतील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत तयार होत असलेल्या ऑरिक सिटीच्या हॉलचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शनिवारी (ता. ७) करण्यात आले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास व महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांची या वेळी उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑरिक (औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी) हॉलचे लोकार्पण केल्यानंतर राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्याला मार्गदर्शन केले. ऑरिक व डीएमआयसीमुळे अनेक मोठ्या कंपन्या या भागात गुंतवणूक करण्यासाठी उत्सूक आहेत, यातून लाखो तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्‍वास मोदींनी व्यक्त केला. सक्षम महिला मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित महिलांचे गौरी विसर्जनाच्या दिवशीदेखील तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल मोदींनी त्यांचे कौतुक करत आभारदेखील मानले. महिलांच्या सोबतीने राष्ट्रकल्याणाचा आपला संकल्प असल्याचे सांगतानाच मोदी म्हणाले, १९६० मध्ये राम मनोहर लोहिया यांनी महिलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या दोन गोष्टींचा उल्लेख केला होता, तो म्हणजे पाणी आणि शौचालय. महिलांचे हे प्रश्‍न सुटले तर त्यांचे जीवन सुसह्य होते. महिलांना सक्षम करण्यासाठी जनधन खात्याच्या मार्फत ५ हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ, मुद्रा योजनेच्या माध्यमतातून महिलांना व्यवसायासाठी एक लाखांचे कर्ज सरकारकडून दिले जात आहे. त्यातून स्वयंसहायता समूहाला बळ मिळत असून सामाजिक परिवर्तनातदेखील त्यांचा मोठा सहभाग वाढत असल्याचे मोदी म्हणाले. २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर.. देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी आम्ही काम करतो आहोत. पण यावर विरोधक म्हणतात या गोष्टी तर आम्हीदेखील करत होतो. पैसे आम्हीही द्यायचो, तुम्ही नवीन काय करत आहात? त्यांना मी सांगू इच्छितो, आम्हाला हाऊस नाही, तर होम द्यायचे आहे. नुसत्या चार भिंतीचे घर न देता त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या गरजा ओळखून सुविधा पुरवण्याचा आमचा मानस आहे. आतापर्यंत १ कोटी ८० लाख घरे दिल्याचेदेखील मोदी यांनी या वेळी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com