खरिपासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना

हवामानातील बदलांमुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ शकते. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा पीक विमा योजनेत सहभागास प्राधान्यक्रम असला पाहिजे.
Prime Minister's Crop Insurance Scheme for Kharif crops
Prime Minister's Crop Insurance Scheme for Kharif crops

हवामानातील बदलांमुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ शकते. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा पीक विमा योजनेत सहभागास प्राधान्यक्रम असला पाहिजे. खरीप २०१६ या हंगामापासून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केलेली आहे. गत काही वर्षांच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरली आहे. हवामानातील बदलांमुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ शकते. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा पीक विमा योजनेत सहभागास प्राधान्यक्रम असला पाहिजे. योजनेची उद्दिष्टे 

  • नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण.
  • नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन.
  • पीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे.
  • या पिकांचा आहे सहभाग  भात(धान), खरीप ज्वारी , बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे, कापूस व कांदा या पिकांसाठी,अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल.

    योजनेमध्ये शेतकरी सहभाग  अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. सहभागासाठी अंतिम मुदत-  ३१ जुलै, २०२० जोखीम स्तर-   सर्व पिकांसाठी ७० टक्के.

    उंबरठा उत्पादन  अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षांतील सर्वाधिक उत्पादनाची ५ वर्षांचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते.

    विमा संरक्षणाच्या बाबी

  • पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट
  • पीक पेरणीपूर्व /लावणीपूर्व नुकसान : यात अपुरा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकूल घटकामुळे अधिसूचित मुख्य पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी/लावणी होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे.
  • हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर,पावसातील खंड,दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्यांहून अधिक घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे.
  • काढणी पश्चात चक्रीवादळ,अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते.
  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते. ( युद्ध आणि अणू युद्धाचे दुष्परिणाम ,हेतू पुरस्सर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्याजोग्या धोक्यास विमा संरक्षण मिळत नाही )
  • योजना राबविणारी विमा कंपनी आणि संबंधित जिल्हे 

    अॅग्रिकल्चर इन्शुरेंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड लातूर, बीड
    बजाज अलियंज जनरल इन्शुरन्स कंपनी लि उस्मानाबाद
    भारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लि नगर, नाशिक,चंद्रपुर,सोलापूर, जळगाव, सातारा
    रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. परभणी,वर्धा, नागपूर, जालना , गोंदिया, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार
    इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली
    एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे

    टीप शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता हा कापूस व कांदा पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या ५% किंवा वास्तवदर्शी विमा हप्ता यांपैकी जो कमी असेल तो आणि उर्वरित १३ पिकांसाठी तो विमा संरक्षित रकमेच्या २% किंवा वास्तवदर्शी विमा हप्ता यांपैकी जो कमी असेल तो असा निश्चित केला आहे. त्यामुळे जिल्हानिहाय पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता यात बदल संभवतो. खरीप हंगामातील सर्वसाधारण पीक निहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता याची माहिती पुढील प्रमाणे आहे. मात्र जिल्हानिहाय यात फरक संभवतो.

    पीक सर्वसाधारण विमा संरक्षित रक्कम रु./हे शेतकऱ्याने भरावयाचा सर्वसाधारण विमा हप्ता रु./हे शेरा
    भात ३०००० ते ४५५०० ६०० ते ९१० शेतकऱ्याने भरावयाचा सर्वसाधारण विमा हप्ता हा विमा संरक्षित रक्कमेच्या २% किंवा वास्तवदर्शी विमा हप्ता यांपैकी जो कमी असेल तो
    ज्वारी १६००० ते २५००० ३२० ते ५००
    बाजरी १४००० ते २२०००

    २८० ते ४४०

    नाचणी १२५०० ते २०००० २५० ते ४००
    मका ५५०० ते ३०००० ११० ते ६००
    तूर २५००० ते ३५००० ५०० ते ७००
    मूग १८००० ते २०००० ३६० ते ४००
    उडीद १८००० ते २०००० ३६० ते ४००
    भुईमूग १७५०० ते ३५००० ३५० ते ७००
    सोयाबीन २६००० ते ४५००० ५२० ते ९००
    तीळ २२००० ते २४००० ४४० ते ४८०
    कारळे

    १२५००

    २५०
    कापूस २२००० ते ४५००० ११०० ते २२५० विमा संरक्षित रक्कमेच्या ५% किंवा वास्तवदर्शी विमा हप्ता यांपैकी जो कमी असेल तो
    कांदा ३६००० ते ६५००० १८०० ते ३२५०

    विमा नुकसान भरपाईची निश्चित खरीप २०२० च्या हंगामात महसूल मंडल/तालुक्यात पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास खालील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते.                                     उंबरठा उत्पादन - प्रत्यक्ष आलेले सरासरी उत्पादन नुकसान भरपाई (रु.) = --------------------------------------------------------------X विमा संरक्षित रक्कम रू.                                                   उंबरठा उत्पादन

    नुकसान भरपाई मिळण्यासाठी

  • नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अकस्मात नुकसान झाल्यास ४८ ते ७२ तासांच्या आत याबाबत संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे.
  • संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा घट आल्यास वरील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम अंतिम केली जाते. सदर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांकरिता विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई त्यांचे बँक खात्यात जमा केली जाते.
  • विमा योजनेत सहभागी होण्याकरिता

  • अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे.
  • इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक ,आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोहोच पावती त्याने जपून ठेवावी. किंवा www.pmfby.gov.in या शासकीय विमा पोर्टल वर ऑनलाइन अर्ज भरावा. त्याची पावती लगेच मिळते. आपण नोंदवलेल्या मोबाइल वर एसएमएस येतो. या शिवाय कॉमन सर्विस सेंटर (CSC) आपले सरकार च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.
  • योजनेच्या अधिक माहितीसाठी

  • या योजनेबाबतचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय दिनांक २९-६-२०२० व दिनांक १७-७-२०२० हा शासनाच्या वेबसाइट www.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे.
  • संबंधित विमा कंपनी , स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजने संदर्भात काही तक्रारी निवारणासाठी तालुक्याचे तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे.
  • संपर्क- विनयकुमार आवटे- ९४०४९६३८७० अधीक्षक कृषि अधिकारी ( मग्रारोहयो) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com