ऑनलाइन, पारदर्शकतेला चालना देणारा अधिकारी

कृषी आयुक्त पदभार
कृषी आयुक्त पदभार

पुणे : दुष्काळग्रस्त करमाळा तालुक्यातील वांगी नंबर तीन गावाचा शेतकरी कुटुंबातील सुहास आज राज्याच्या कृषी आयुक्तपदी विराजमान झाल्याने या भागाला कौतुक वाटते आहे. ऑनलाइन सुधारणा आणि पारदर्शकतेला चालना देणारा स्मार्ट अधिकारी म्हणून परिचित असलेले सुहास दिवसे हे कृषी खात्याचा किल्ला कितपत लढवतात, याविषयी कृषी क्षेत्रात उस्सुकता आहे.  कृषी खाते हे भल्याभल्या सनदी अधिकाऱ्यांना नामोहरम करणारे खाते म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच सुनील केंद्रेकर यांना ९० दिवसांत तर सच्चिंद्र प्रताप सिंह यांना दीड वर्षात आयुक्तपद सोडावे लागले आहे. श्री. दिवसे यांची पार्श्वभूमी पाहून प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा मात्र वाढल्या आहेत.  स्पर्धा परीक्षांमध्ये सतत चमकणारा उमेदवार अशी प्रतिमा असलेल्या श्री. दिवसे यांची १९९१ मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. १९९२ मध्ये त्यांची कृषिसेवा वर्ग दोन आणि वित्त लेखाधिकारीपदी निवड झाली. १९९३ मध्ये ते उपजिल्हाधिकारी बनले आणि पुढे २००९ मध्ये आयएएस श्रेणीत निवडले गेले.   गलथानपणामुळे भरकटलेल्या वखार महामंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री. दिवसे यांनी काही चांगले बदल कामकाजात केले. महामंडळ हे शेतकऱ्यांच्या मालकीचे असताना त्यांच्यासाठी असलेल्या गोदामांची माहिती त्यांनाच का दिली जात नाही, असा जाब विचारत श्री. दिवसे यांनी शेतकऱ्यांसाठी १८००१२१८०६६ प्रथमच टोल सेवा सुरू केली. यामुळेच शेतकऱ्यांना गोदामांची माहिती मिळू लागली.  ‘‘श्री. दिवसे यांनी शेतकऱ्यांना शेतमाल तारण योजना, गोदामांचा लाभ होण्यासाठी मोबाईल अप्लिकेशन आणले. त्यामुळे किती माल ठेवल्यावर किती भाडे आकारणी होते, सवलत काय मिळते, विमा, दरपत्रकातील सुधारणा शेतकऱ्याला कळू लागल्या. दोन लाख शेतकऱ्यांसाठी त्यांनी एसएमएसने माहिती देण्याचादेखील प्रयत्न केला. वखारीमध्ये सॅप ही संगणकीय प्रणाली वाढवून पारदर्शकता आणण्यासाठी आग्रह धरला,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  शेतकरी व कर्मचाऱ्यांविषयी आत्मियता असलेला अधिकारी म्हणून चर्चेत असलेले श्री. दिवसे मनात राग न धरता प्रशासकीय कामे कुशलतेने करतात. मतभेद झाल्यास, चूक झाल्यास दोन पावले माघार घेत नम्रतेने पुन्हा कामे करून घेतात. वखार महामंडळाच्या ६०० कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा धाडसी निर्णय त्यांनीच घेतला, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  वखारी दुरुस्तीसाठी मराठवाडा, विदर्भात ७३ कोटी रुपयांचा निधी त्यांनी मिळवून दिला. महामंडळाच्या जुनाट कार्यालयाला थोडा कार्पोरेट लूक मिळवून देताना इतर खर्चात मात्र त्यांनी कपातीचे धोरण ठेवले होते. राज्य पर्यटन महामंडळ, नागपूर महापालिका, पुणे नवनगर विकास प्राधिकरणात त्यांनी कामकाज केले.  ‘‘पुण्याचे महसूल उपायुक्त तसेच भंडारा जिल्हाधिकारी पदावर काम करताना त्यांनी महसूल व कृषीविषयक कामकाज जवळून पाहिले आहे. राज्य आपत्ती निवारण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम केलेल्या श्री. दिवसे यांना कृषी खात्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी सोनेरी टोळ्यांपासून दूर राहावे लागेल. पारदर्शकता वाढविण्यासाठी ऑनलाइन सुधारणांना चालना द्यावी लागेल, अन्यथा कृषी खात्यातील सुप्त शक्ती पुन्हा आयुक्तालयाला कब्जात घेतील,’’ असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com