बेधडक, गतिशील नेता
बेधडक, गतिशील नेता

बेधडक, गतिशील नेता

शब्द हाच अध्यादेश पतंगराव कदम यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खाते होते. त्यांचा खात्याचा पूर्वानुभव जबरदस्त होता. राज्यात दुष्काळी स्थिती होती. पतंगरावांच्या अध्यक्षतेखाली दर मंगळवारी उपसमितीची बैठक व्हायची. त्यात महत्त्वाचे निर्णय घेऊन पतंगराव बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडायचे आणि मी तातडीने त्याला मंजुरी द्यायचो. सायंकाळी पाच वाजता अध्यादेश जारी झालेला असायचा. त्या काळात दहा लाख जनावरे आम्ही छावणीत सांभाळली. एकावेळी 5200 टॅंकरने पाणीपुरवठा केला. याच काळात साखळी बंधाऱ्यांची योजना पुढे आली. एकावेळी आम्ही ओढ्यावरील दीड हजार साखळी बंधाऱ्यांची उद्‌घाटने केली.

महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे, प्रामाणिक आणि अतिशय गतिमान नेतृत्व म्हणजे डॉ. पतंगराव कदम. ते माझ्या मंत्रिमंडळाचा अतिशय महत्त्वाचा हिस्सा राहिले. राज्यात सुशासन, विकासासोबत पारदर्शी कारभार करण्याच्या मोहिमेत नेहमी खंबीरपणे उभे राहिले. दुष्काळी स्थितीला पुरून उरले. पतंगराव हे नेते म्हणून जितके मोठे, तितकेच सर्वसामान्य माणसांचा आधार म्हणूनही लोकप्रिय ठरले. राजकारण, शिक्षण, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये पतंगरावांनी आपले योगदान दिले होते...   

पतंगरावांची बेधडक वृत्ती मला आवडत होती. जे असेल ते तोंडावर बोलून ते रिकामे होत. जे आपल्या हातून होणार आहे, त्याला होय म्हणा आणि जे जमत नाही, त्याला सरळ नकार द्या, ही राजकारणातील दुर्मिळ गोष्ट पतंगरावांनी सुरवातीपासूनच जपली. त्यांच्या या स्वभावाला कुणी दोष म्हणत असेल, मात्र मला हा राजकीय जीवनातील अतिशय महत्त्वाचा गुण वाटतो. तो जपण्यासाठी पतंगरावांनी राजकीय फायद्या-तोट्यापेक्षा तत्त्वांचा नेहमी विचार केला आहे. भारती विद्यापीठाचे कुलपती, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या खात्याचे मंत्री राहिलेल्या या माणसाचे पाय मातीत आहेत. ही साधी गोष्ट नाही. 

मी कऱ्हाडचा अन्‌ पतंगराव लगतच्या सोनसळ गावचे. पतंगरावांचा आमचा संबंध तसा फारच जुना. त्यांच्या एकूण वाटचालीचा मी साक्षीदार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतगरावांसोबत अधिक काळ आणि अधिक जवळून काम करता आले. एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे ते विकासकामांच्या फायली क्‍लिअर करण्यासाठी धडपडत असताना मी पाहिले आहे. टेंभू उपसा सिंचन योजना, म्हैसाळ, ताकारी योजना असतील किंवा ऊस दरासह अन्य प्रश्‍न असतील, पतंगरावांनी नेहमीच लोकहिताला पहिले प्राधान्य दिले. दर आठवड्याच्या कॅबिनेटच्या बैठकीत पतंगरावांनी आपल्या मागण्या आणि योजनांसाठी प्रचंड ताकद लावलेली पाहिली आहे. ते केवळ पलूस-कडेगाव या मतदार संघापुरता विचार करत नव्हते. त्यांना सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक भागाची नस माहिती आहे. तिथले प्रश्‍न माहिती आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मतदार संघातीलच नव्हे तर संबंध जिल्हा आणि राज्यातील लोक गाऱ्हाणी घेऊन यायचे. तेही प्रत्येक प्रश्‍न मतदार संघातील समजून तळमळीने सोडवायचे. हे का शक्‍य होते, याचा विचार करताना पतंगराव आज कुठे आहेत, यापेक्षा ते कुठून आले आहे, हे जास्त महत्त्वाचे ठरते. 

एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना या उंचीवर पोचतो, यामागे प्रचंड इच्छाशक्ती आणि कामाचा झपाटा आहे. पुण्यातील एका खोलीत शाळा सुरू करायची, त्याला भारती विद्यापीठ नाव द्यायचे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी झपाटून काम करायचे, ही त्यांची धडपड मला नेहमीच प्रेरणादायी वाटत आली आहे. भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या राबवा, ही पतंगरावांची खासियत. त्यातूनच सोनहिरा खोऱ्याचे नंदनवन करण्यात त्यांनी मोठे यश मिळविले. सोनहिरा साखर कारखाना, सूतगिरणी, भारती विद्यापीठाच्या कित्येक शाखा पतंगरावांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या आहेत. सहकारी चळवळीभोवती संकटांचे फास आवळत असताना पतंगरावांच्या संस्था अतिशय भक्कमपणे उभ्या होत्या. त्याला कारण होते पतंगरावांनी घालून दिलेल्या वाटेवरून त्या संस्था चालत होत्या. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र, त्यांच्या स्वप्नातील सहकार पतंगरावांनी जवळून अनुभवला होता. ते बाळकडू जणू त्यांनी आपल्या संस्थांमध्ये उतरवले. राज्यातील सहकारी संस्था वाचविण्यासाठी पतंगरावांची धडपड अद्वितीय राहिली. सहकारमंत्री असताना त्यांनी सहकार टिकावा म्हणून काही कटू वाटणाऱ्या उपाययोजना केल्या. त्याचे गोड फळ आज काही संस्था चाखताहेत.  मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद घेतल्यानंतर मंत्रिमंडळात खातेवाटपाची चर्चा सुरू होती. पतंगराव कदम ज्येष्ठ मंत्री होते. त्यांनी आतापर्यंत महसूल, सहकार, शिक्षण, मदत व पुनर्वसन, उद्योग, जलसंधारण, पाटबंधारे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्या त्या खात्याला पतंगरावांनी न्याय दिला होता. त्यावर छाप उमटवली होती. दिल्लीतील चर्चेनुसार पतंगरावांकडे वनमंत्री आणि मदत व पुनर्वसन खात्याची धुरा सोपविण्यात आली. परंतु, अधिक महत्त्वाचे खाते द्यायला हवे होते, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटले. पण, पतंगरावांना वन खाते मिळाले हे वरदान ठरले. महाराष्ट्राचे वन खाते पतंगरावांनी चर्चेत आणले. राज्याच्या वनसंपदेने त्या काळात जी भरारी घेतली ती अद्वितीय होती. त्यांनी कुंडल येथे फॉरेस्टची ऍकॅडमी आणली. त्याला काहींनी विरोध केला, पण पतंगराव रेटून काम करायचे. ते इथेही त्यांनी केले. 

त्यांनी राजकारण करताना विरोध केला, मात्र शत्रू निर्माण केले नाहीत. राजकारण हे तत्त्वाने केले पाहिजे, इर्षेने नव्हे, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. त्यामुळे ते अजातशत्रू आहेत. राजकारणात चढ-उतार येत असतात, त्यावर मात करून पुढे कसे जायचे, याचे ते आदर्श आहेत. 

शब्द हाच अध्यादेश  पतंगराव कदम यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खाते होते. त्यांचा खात्याचा पूर्वानुभव जबरदस्त होता. राज्यात दुष्काळी स्थिती होती. पतंगरावांच्या अध्यक्षतेखाली दर मंगळवारी उपसमितीची बैठक व्हायची. त्यात महत्त्वाचे निर्णय घेऊन पतंगराव बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडायचे आणि मी तातडीने त्याला मंजुरी द्यायचो. सायंकाळी पाच वाजता अध्यादेश जारी झालेला असायचा. त्या काळात दहा लाख जनावरे आम्ही छावणीत सांभाळली. एकावेळी 5200 टॅंकरने पाणीपुरवठा केला. याच काळात साखळी बंधाऱ्यांची योजना पुढे आली. एकावेळी आम्ही ओढ्यावरील दीड हजार साखळी बंधाऱ्यांची उद्‌घाटने केली. 

(ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त 8 जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेल्या भावना. "सकाळ'च्या वाचकांसाठी पुन्हा एकदा प्रसिद्ध करीत आहोत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com