खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी; हजारो लिटर दुधाची नासाडी

नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन सुरू असल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक खासगी डेअरींनी दूध संकलन बंद केले आहे. तसेच हॅाटेल व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे शासकीय दुग्धशाळेसह अनेक खासगी डेअरींच्या दूध संकलनात वाढ झाली आहे. परंतु अतिरिक्त दूध संकलन होत असल्याने प्रक्रिया यंत्रणा तोकडी पडत आहे. दूध दर लिटरमागे ३ ते ७ रुपयांनी कमी झाले आहेत. संकलन केंद्रांवर दूध स्विकारले जात नसल्याने हजारो लिटर दूधाची नासाडी होत आहे. या तीन जिल्ह्यांतील अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज मोठे नुकसान होत असून अडचणी वाढल्या आहेत.
Private dairy collection system weak; Thousands of liters of milk wasted

नांदेड जिल्ह्यात हेरिटेज डेअरी, मदर डेअरी, अमूल तसेच अन्य दोन खासगी डेअरी मार्फत दूध संकलन केले जाते. मदर डेअरीचे अनेक ठिकाणी संकलन केंद्र आहेत. हेरिटेज डेअरीचे अर्धापूर आणि जानापुरी येथे शीतकरण केंद्र आहेत. या शीतकरण केंद्रांवर क्षमतेपेक्षा १ हजार लिटर जास्त दूध संकलन केले जात आहे. मध्यंतरी टॅंकर बंद असल्यामुळे संकलन व्यवस्था विस्कळीत झाली होती. परंतु आता सुरळीत झाली आहे. परंतु अतिरिक्त दूधाचा प्रश्न आहे. 

अर्धापूर तालुक्यातील एक आणि उमरी तालुक्यातील एका खासगी डेअरीचे दूध संकलन बंद असल्याने शेतकऱ्यांच्या दूधाची नासाडी होत आहे. अन्य डेअरींच्या संकलनात वाढ झाली आहे. त्यामुळे प्राथमिक संकलन केंद्रावरुन नेहमीपेक्षा कमी दूध स्विकारले जात आहे. त्यामुळे शिल्लक दुधाचा प्रश्न निर्माण झाला असून नासाडी होत आहे. परभणी जिल्ह्यातील ताडकळस येथील हेरिटेज डेअरीच्या शीतकरण केंद्रांवर क्षमतेपेक्षा सुमारे ८०० लिटर जास्त दूध स्विकारले जात आहे. 

पाथरी तालुक्यात तीन खासगी डेअरीकडून सुमारे दहा हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. परंतु विविध कारणांनी संकलनात अडचणी येत आहेत. त्यामुळे दुधाची नासाडी होत आहे. गेल्या दोन दिवसांत दूध संकलन सुरू झाले असले तरी पेमेंटबाबत अनिश्चितता असल्याने दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे. शासकीय दुग्धशाळेने दूध संकलन सुरू करावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात वारंगा (ता. कळमनुरी) येथे हेरिटेज डेअरीची ३० हजार लिटर क्षमतेचे दूध शीतकरण केंद्र आहे. परंतु या ठिकाणी सध्या ३५ हजार लिटर दूध संकलन केले जात आहे. अतिरिक्त ठरत असल्याच्या कारणांवरुन अनेक दूध उत्पादकाचे पूर्ण दूध स्विकारले जात नसल्याने नासाडी होत आहे. अनेक खासगी डेअरींज दूध भुकटी तसेच प्रक्रिया यासाठी वेगवेगळे दर देत आहेत. देयके अदा करण्याबाबत देखील अनिश्चितता दिसत असल्याने दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणी सापडले आहेत. 

दोन खासगी डेअरीचे दूध संकलन बंद आहे. चालू असलेल्या डेअरीकडून नेहमीपेक्षा कमी दूध स्विकारले जात आहे. दरही कमी केले आहेत. दररोज  शेकडो लिटर दूधाची नासाडी होत आहे.  - ज्ञानेश्वर माटे, अर्धापूर, जि. नांदेड 

खाजगी दूध डेअरीच्या संकलन केंद्रामुळे तालुक्यातील दूध उत्पादकांना  दिलासा मिळाला आहे. परंतु दूध संकलन काही दिवस बंद राहिल्याने दुधाची  नासाडी झाली. शासकीय दुग्ध शाळेतील संकलन यंत्रणेत प्रभावी सुधारणा करुन  दूध स्विकारले तरच शासनाने घेतलेल्या निर्णयाचा शेतकऱ्यांचा फायदा होईल.  - विठ्ठल गिराम, बाभळगाव,  ता. पाथरी, जि. परभणी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com