कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने आघाडीवर

Private factories lead in sugar mills
Private factories lead in sugar mills

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या मध्याअखेर कोल्हापूर विभागाच्या साखर उताऱ्यात वाढ झाली आहे. या कालावधीपर्यंत गाळप झालेल्या उसाचा साखर उतारा सरासरी ११.९७ इतका राहिला. कोल्हापूर विभागात (कोल्हापूर, सांगली जिल्हे) एकूण १३९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. ११.९७ च्या सरासरी उताऱ्याने १६६.६१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

या कालावधीपर्यंतच्या सरासरी उताऱ्यात सांगलीच्या निनाईदेवी कारखान्याचा उतारा १२.७६ तर रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचा सरासरी उतारा १२.७५ इतका राहिला आहे. सरासरी उताऱ्यामध्ये खासगी कारखानेच अव्वल राहत असल्याची स्थिती आहे. विभागात एकूण ३४ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. अद्याप एकही कारखाना हंगाम आटोपल्याने बंद पडला नाही. 

यंदा डिसेंबरपासून साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात प्रारंभ झाला. सुरुवातीला अतिशय धीम्या गतीने साखर हंगामाची सुरुवात झाली. पूरग्रस्त परिस्थितीमुळे ऊसतोडणीत अडथळे निर्माण झाले. जानेवारीपासून ऊसतोडणीला काहीशी गती आली. पण, पूरबाधित उसाची तोडणी धीम्या गतीने राहिली. हंगाम अंतिम टप्प्याकडे चालला असला, तरी अजूनही पूरबाधित उसाची तोडणी सुरूच आहे. तोडणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बुडून गेलेल्या उसाचे वजन जास्त भरत असल्याचा अनुभव कारखानदारांना येत आहे. यामुळे अनेक कारखाने दहा-बारा दिवसांच्या कालावधीतील घट वगळता आपला हंगाम नियमित पूर्ण करतील, अशी शक्‍यता सध्या आहे. 

फेब्रुवारी मध्यापर्यंतच्या हंगामावर नजर टाकल्यास सहकारी साखर कारखान्यापेक्षा खासगी साखर कारखान्यांचा सरासरी उतारा जादा पडत असल्याचे चित्र आहे. जे सहकारी साखर कारखाने खासगी कंपन्यांनी चालवायला घेतले आहेत, या कंपन्यांनी साखर उतारा चांगला राखला आहे. खासगी कारखान्यांपैकी जवळजवळ सत्तर टक्क्यांहून अधिक कारखान्यांचा साखर उतारा १२ टक्क्यांच्या पुढे आहे. तर, सहकारी कारखान्यांचा साखर उतारा ११.५० ते १२ टक्क्यांच्या दरम्यान आहे. बिद्री, राजाराम बापू, हुतात्मा कारखान्यांचा साखर उतारा ही १२ हून अधिक आहे. 

दोन्ही जिल्ह्यांमध्ये अजूनही उसाची तोड नियमित सुरू आहे. महापुरामुळे ऊस कमी पडेल, असा अंदाज होता. परंतु, सध्या दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश ऊस कारखान्यांकडे अद्यापही ऊस शिल्लक आहे. यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी दक्षिण महाराष्ट्रातील गळीत हंगाम निश्‍चितपणे चालण्याची शक्‍यता असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.

जिल्हा गाळप सरासरी उतारा 
कोल्हापूर ९३ लाख ३४ हजार ११.९७ 
सांगली ४५ लाख ६६ हजार ११.९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com