खासगी दूध खरेदीदरात वाढीचे संकेत; सोनई, पतंजलीने कोंडी फोडली

खासगी दूध खरेदीदरात वाढीचे संकेत; सोनई, पतंजलीने कोंडी फोडली
खासगी दूध खरेदीदरात वाढीचे संकेत; सोनई, पतंजलीने कोंडी फोडली

पुणे : दुष्काळ, महापूर आणि चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दुधाचे दर वाढवून देण्याची मागणी केली जात होती. मात्र, दूध दराची कोंडी सर्वप्रथम सोनई व पतंजलीने या खासगी संघांनी फोडली आहे. या दोन्ही डेअरी उद्योगांनी गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपये वाढ देत प्रतिलिटर ३० रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे.  पतंजलीने तात्काळ दरवाढ देण्यास सुरवात केली आहे. तसेच, सोनईने एक सप्टेंबरपासून चार लाख शेतकऱ्यांना प्रतिलिटर दोन रुपये जादा दर देण्याचे घोषित केले आहे. राज्यात दूध पावडरचे दर तेजीत असल्यास दुधालादेखील जादा दर मिळतो. सध्या गाय दूध पावडरचे दर प्रतिकिलो २६० ते २७० रुपये, तर म्हैस दूध पावडरसाठी २९० ते ३०० रुपये मिळत आहे. किमान दिवाळीपर्यंत पावडर बाजारात तेजी राहील. त्यानंतर किमती वाढण्याची शक्यता नसेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  दरम्यान, पावडर प्लांटचालकांनी सध्या प्रक्रिया कमी करून दूध पुरवठ्यावर भर दिला आहे. पुराच्या स्थितीने राज्याच्या दूध बाजारात तयार झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी प्रक्रिया कमी केली. एकट्या सोनईने आपला दूधपुरवठा १५ लाख लिटर्सवर नेला आहे.  दुधाची पंढरी असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा तडाखा बसल्यानंतर राज्याच्या एकूण दूध पुरवठ्यात तयार झालेली पोकळी अजून भरून काढता आलेली नाही, त्यामुळे दुधाची मागणी टिकून आहे. मुंबई व पुणे या दुधाच्या सर्वांत मोठ्या बाजारपेठा आहेत. मुंबईला रोज किमान ६० लाख लिटर्स, तर पुणे भागात २५ लाख लिटर्सची मागणी असते. पश्चिम महाराष्ट्रातील गोकूळ व वारणा या दोन्ही प्रसिद्ध सहकारी दूध उत्पादक संस्थांकडून दुधाचा पुरवठा घटल्याने सध्या या दोन्ही बाजारपेठांमध्ये परराज्यांतील दुधाला मागणी वाढली आहे. 

अमूलकडून पुरवठ्यात वाढ अमूलकडून मुंबई व पुण्याच्या बाजारपेठांना रोज १८ ते २० लाख लिटर्सपेक्षा जास्त दुधाचा पुरवठा होतो. मात्र, महापुरानंतर या बाजारपेठांमध्ये तयार झालेला तुटवडा भागविण्यासाठी अमूलकडून सध्या ४ ते ५ लाख लिटर्सने जादा पुरवठा करण्यास सुरवात केली आहे. अमूलच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील दुधाची गरज भागविण्यासाठी गुजरात व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडूनच आम्ही दुधाची खरेदी वाढविली आहे, त्यामुळे घटलेल्या पुरवठा स्थितीचा फायदा शेवटी शेतकऱ्यांनाच होतो आहे. 

पंतजलीकडून दुधाला ३० रुपये दर  राज्यातील दुष्काळी स्थितीचा अंदाज घेत पशुपालक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये दर देण्याचा निर्णय पतंजलीने घेतला आहे. २१ ऑगस्टपासून पतंजली डेअरीकडून शेतकऱ्यांना जादा दर देण्यास सुरवात केली आहे. दुष्काळी स्थिती, जनावरांच्या छावण्या, पाण्याची टंचाई यामुळे दुधाचे दर शेतकऱ्यांना वाढवून देण्याचा मुद्दा महाराष्ट्रातील युनिटचालकांनी थेट बाबा रामदेव यांच्यापर्यंत नेला, त्यामुळे दुधाचे दर वाढविण्यास पतंजलीच्या मुख्यालयाने तात्काळ मान्यता दिली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

उत्तर भारतात पावडर तेजीत  दरम्यान, इतर राज्यांतदेखील दूध पावडरचा साठा सध्या कमी असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. उत्तर भारतात पावडर प्लांटचालकांकडे कमी साठे असल्यामुळे पावडरचे दर आता प्रतिकिलो ३२५ ते ३४० रुपयांपर्यंत गेले आहेत. पावडर दरामध्ये अजून प्रतिकिलो १०-१५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुधाचे भाव वाढल्यामुळे पावडरचे भाव वाढत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

पिशवीबंद दुधाचा आढावा घेणार : शेतकऱ्यांकडून खरेदी  केलेल्या दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे पिशवीबंद दुधाच्या दराचादेखील आढावा घेण्याच्या हालचाली डेअरीचालकांनी सुरू केल्या आहेत. पावडर व बटरचे दर कोसळल्यानंतर पिशवीबंद दुधाचे दर कमी झाले होते. मात्र, आता दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठा तेजीत असल्यामुळे पिशवीबंद दूधविक्रीचे प्लांट तोटा सहन करून चालविण्यास उद्योजक तयार नाहीत.  राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला पुढील काळात चांगला दर मिळणार आहे. दुष्काळ आणि पुरामुळे पशुपालकांची हानी झालेली आहे, त्यामुळे पशुपालकांना सावरण्यासाठी डेअरी उद्योगाला पुढाकार घ्यावा लागेल. आटपाडी भागात आम्ही स्वतः शेतकऱ्यांना एक हजार जनावरे अनुदानावर वाटणार आहोत. या उपक्रमात बॅंक ऑफ इंडिया व आटपाडी दूध संघ सहभाग राहील. सांगली भागातील आपत्तीग्रस्त पशुपालकांसाठीदेखील अशी योजना राबविण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. - श्रीपाद चितळे,  संचालक, चितळे डेअरी उद्योग ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेले दूध पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही प्रतिलिटर ३० रुपये दर देणार आहोत. राज्यात महिनाभर दुधाचा तुटवडा जाणवत राहील. दुष्काळी स्थिती, चारा व पाण्याची टंचाई, तसेच पावडर बाजारातील तेजी यामुळे पुढील काही दिवस शेतकऱ्यांना दुधासाठी चांगले दर मिळतील. - दशरथ माने,  अध्यक्ष, सोनई डेअरी उद्योग समूह

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com