कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘लॉकडाऊन’ 

द्राक्ष काढणी सुरु झाली आहे. परंतु त्यासाठी लागणारे पॅकिंग साहित्याचे उत्पादन बंद असल्याने पॅकिंग कसे करायचे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पॅकिंग साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या सुरु कराव्यात. - संजय बरगाले, द्राक्ष उत्पादक, मालगाव, ता. मिरज.
grapes  damage.
grapes damage.

नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम सुरवातीपासूनच संकटांच्या विळख्यात सापडला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर आता कोरोनामुळे द्राक्ष उत्पादकांना फटका बसत आहे. कोरोना विषाणूमुळे मनुष्यबळाची कमतरता, वाहतूक व निर्यात ठप्प झाल्याने उठाव नाही. परिणामी मागणी नसल्याने राज्यात अद्यापही ३० टक्के द्राक्षे बागेतच आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर मोठे संकट ठाकले आहे.  राज्यातील नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे या द्राक्ष उत्पादक पट्ट्यातील काढणीसाठी तयार झालेला माल काढणीविना वेलींवरच आहे. नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाच्या नोंदणीप्रमाणे ५८ हजार ३६७.४३ हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. यंदा सुरवातीलाच नैसर्गिक अडचणींमुळे द्राक्षहंगाम अडचणीत सापडला. आता पुन्हा मोठ्या कष्टातून माल तयार केला असताना काढणीची कामे बंद आहेत. प्रामुख्याने निफाड, दिंडोरी, नाशिक आणि चांदवड या तालुक्यांमध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहार छाटण्या झाल्या अशा ३० टक्के बागा काढणीविना आहेत.  सरकारने पुकारलेल्या संचारबंदीमुळे अनेक मजुरांनी गावाचा रस्ता धरला. त्यामुळे मनुष्यबळाची तीव्र कमतरता असल्याने सर्व पॅक हाउसची कामे ठप्प झाली आहेत. त्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील १५०० हेक्टर बागांमध्ये माल बाधित झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा फटका घडांना बसल्याने टिकवणक्षमता कमी झाल्याने गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे या द्राक्षापासून बेदाणा बनविणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. 

सांगली जिल्ह्यात वाहतूक सुरु, मात्र पुरेसे इंधन मिळेना  संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामध्ये भाजीपाला,फळे याची वाहतूक करता येईल असे सांगण्यात आले होते. जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि आरटीओ यांची बैठक घेऊन शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी परवाने घेतले आहेत. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवाने मिळाल्याने ८० ते ९० लहान मोठ्या गाड्या देशभरात पोहोचल्या आहेत. मात्र, वाहतूक करणाऱ्या ट्रकसाठी डिझेल मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. गाड्यांना इंधन उपलब्ध करण्यासाठी शासनाने मार्ग काढावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  सोलापुरात खरेदीदारांची पाठ, शेतकऱ्यांची चिंता वाढली  सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षहंगाम अंतिम टप्प्यात असताना खरेदीदारांनी पाठ फिरवल्याने द्राक्षांना उठाव मिळत नाही. त्यामुळे २५ टक्के द्राक्ष शिवारात आहेत. परिणामी, आधीच अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेले द्राक्ष उत्पादक आता या नव्या समस्येमुळे आर्थिक कोंडीत अडकले आहेत. पण अधिकचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आता बेदाणा निर्मितीचा पर्याय निवडला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात जवळपास २५ हजारहून अधिक एकर क्षेत्रावर द्राक्ष घेतले जातात. त्यापैकी ३० टक्के क्षेत्रावरील द्राक्ष बेदाण्यासाठी जातात.२० टक्के द्राक्ष निर्यात आणि उर्वरित द्राक्ष देशांतर्गत बाजारात जातात. पंढरपूर, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या भागात द्राक्षाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. अगदी पंधरवड्यापूर्वी वातावरण खूपच चांगले होते. बाजारपेठेत द्राक्षाला चांगला उठाव मिळत होता. 

गेल्या महिन्यात प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होणाऱ्या द्राक्षाचे दर या आठवड्यात मात्र एकदमच खाली आले, जवळपास निम्म्याने ते उतरले. स्वतः शेतकऱ्यांनाही वाहन करुन बाजारात द्राक्ष पाठवणे शक्य नाही. कारण पुणे, मुंबई या खात्रीच्या बाजारपेठाही विस्कळीत झाल्या आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे काही भागात द्राक्षाचे नुकसान झाल्यानेही त्याचा फटका बसला. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती गंभीर होत चालल्याने शेतकऱ्यांची अधिकच कोंडी होऊन बसली आहे. यावर मार्ग म्हणून शेतकरी आता ही द्राक्ष बेदाण्यासाठी नेत आहेत. सध्याच्या परिस्थितीत बेदाणा निर्मिती हाच एकमेव उपाय त्यांच्यासमोर आहे. 

बेदाण्यासाठी रॅक मिळेना  द्राक्षासाठी खरेदीदार मिळत नसल्याने शेतकरी बेदाण्याकडे वळत आहेत. मात्र बेदाणा निर्मितीसाठी असलेले रॅक उपलब्ध होत नाहीत. एकीकडे बागेत झाडावर द्राक्ष ठेवता येत नाहीत आणि दुसरीकडे बेदाण्यासाठी द्राक्ष न्यावी तर रॅक उपलब्ध होत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी या दुहेरी संकटामुळे मेटाकुटीस आले आहेत. 

शेतकऱ्यांसमोरील प्रमुख अडचणी 

  • व्यापारी नसल्याने उठाव नाही 
  • संचारबंदीमुळे राज्याबाहेर वाहतुकीत अडथळे 
  • काढणी व निर्यात प्रक्रिया कामकाजात मनुष्यबळाची अडचण 
  • बाहेरील व्यापाऱ्यांकडून देयके थांबल्यामुळे आर्थिक पेच 
  • शेतकऱ्यांची आर्थिक तरलता संपुष्टात 
  • पाठविलेल्या कंटेनरचे देयके अडकून 
  • निर्यात प्रक्रियेत ऑनलाईन फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रे मिळण्यात अडचणी 
  • शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या 

  • द्राक्ष वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करावे 
  • गाड्यांबरोबर बंदोबस्त द्यावा 
  • पॅकिंग साहित्य उपलब्ध करून द्यावे. 
  • वाहतूकीचे परवाने वाढवून प्रक्रिया सुरळीत करावी. 
  • वाहतुकीसाठी पुरेसे इंधन उपलब्ध करुन द्यावेत. 
  • लहान व्यापाऱ्यांना विक्रीचे परवाने द्यावेत. 
  • शहरात द्राक्ष विक्रीसाठी शेतकऱ्यांना वेळ ठरवून द्यावी. 
  • बेदाणा निर्मितीसाठी लागणारा माल उपलब्ध करून द्यावा. 
  • प्रतिक्रिया द्राक्षाची वाहतूक सुरु झाली आहे. परंतु पंपावर डिझेल उपलब्ध करुन दिले जात नाही. त्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि शासनाने यावर मार्ग काढावा.  - महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सांगली 

    माझी दोन एकर द्राक्ष आहेत. यंदा पहिल्यांदाच द्राक्ष केली आहेत. पण विक्रीची अडचण झाली आहे. खरेदीदार मिळत नसल्याने सध्या बेदाणा निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. पण त्यासाठीही रॅक मिळत नाही. सरकारने याचा विचार करुन मदत केली पाहिजे.  - लंकेश पाटील, द्राक्ष उत्पादक, पडसाळी, ता. उत्तर सोलापूर 

    द्राक्ष उत्पादकांनी घाबरुन न जाता आपण आपल्या जवळच्या मार्केटमध्ये परवाना घेऊन द्राक्षाची विक्री करण्यासाठी पुढे आले पाहिजे. मी दोन किलोचे पॅकिंग करुन सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात विक्री करणार आहे. त्यामुळे माझ्या द्राक्षाची विक्री होईल आणि दोन पैसेही अधिक मिळतील.  -मारुती चव्हाण, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पलूस, जि. सांगली. 

    द्राक्ष उत्पादक पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. विक्री होण्यासाठी शासनाने वाहतूक व्यवस्था, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य व आंतरराज्य वाहतूक यासाठी सकारात्मक कामकाज करणे गरजेचे आहे. अन्यथा द्राक्ष उत्पादकांचे संपूर्ण अर्थकारण कोलमडणार आहे.  - रवींद्र बोराडे, विभागीय अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com