कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटला

कीटकनाशक विक्रेते
कीटकनाशक विक्रेते

पुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक पात्रतेची अट टाकल्यामुळे तयार झालेला तिढा अखेर दोन वर्षांनंतर सुटला. आता केवळ तीन महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करताच विक्रेत्याला कायमस्वरूपी परवाना मिळणार आहे.  केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सह सचिव अतीश चंद्रा यांनी अधिसूचना काढून हा प्रश्न निकालात काढला आहे. पदवीच्या अटीला देशात सर्वप्रथम माफदा अर्थात महाराष्ट्र ॲग्रो इनपुट एन्ड फर्टिलायझर्स डीलर असोसिएशनने कडाडून विरोध केला होता. माफदाचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश कवडे यांनी हा प्रश्न केंद्र शासनासमोर मांडला. त्यानंतर आता अखिल भारतीय फर्टिलायजर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी पाठपुरावा केल्यामुळे केंद्राला आपली भूमिका बदलावी लागली.  कीडनाशके नियम १९७१ च्या दहाव्या कलमानुसार कीडनाशकांची विक्री, वितरण, साठवणूक किंवा प्रदर्शन करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. त्यासाठी संबंधित व्यक्तीकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी शास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायन, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र यापैकी एका विद्याशाखेची पदवी बंधनकारक आहे.  देशातील बहुतेक राज्यांमध्ये वर्षानुवर्षे कीडनाशके विक्री व्यवसाय करणारे विक्रेते पदवीधारक नाहीत. त्यामुळे या समस्येला पर्याय म्हणून एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा दुसरा पर्यायदेखील देण्यात आलेला होता.  पदविका पूर्ण करण्याचा पर्याय केंद्र शासनाने २०१७ मध्ये दिला. मात्र, त्यानंतर देखील हजारो विक्रेते पुन्हा अडचणीत आले. कारण, पदविका अभ्यासक्रमाला असलेली वयाची अट उलटून गेलेली होती. हजारो विक्रेत्यांचे वयोमान ४५ वर्षांच्या पुढे आहे. त्यामुळे हा गुंता सुटत नव्हता. केंद्राने आता अशा विक्रेत्यांसाठी केवळ तीन महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला तरी परवाना देण्याचा तिसरा पर्याय देखील खुला केला आहे. सामेतीमार्फत प्रशिक्षण राज्याच्या कृषी व्यवस्थापन व विस्तार प्रशिक्षण संस्थेत (सामेती) आठवड्यातून केवळ एक दिवस प्रशिक्षण देणारा व एकूण बारा आठवडे चालणारा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आता कीडनाशके विक्रेत्यांना मिळू शकेल. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याशिवाय कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, हैद्राबादमधील मॅनेज संस्था, केंद्र शासनाची एनआयडीपीआर संस्था देखील प्रशिक्षण देऊ शकेल, असे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com