इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !

‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही मिनिटांत शेतकऱ्यांचे काम हातावेगळे करणारे राज्यातील पहिले उपविभागीय कृषी कार्यालय.
baramati
baramati

पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही मिनिटांत शेतकऱ्यांचे काम हातावेगळे करणारे राज्यातील पहिले उपविभागीय कृषी कार्यालय,’ अशी सन्मानजनक प्रतिमा बारामतीमधील कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जिद्दीतून तयार झाली आहे.  ‘शेतकऱ्यांना हेलपाटे मारून जेरीस आणणारा विभाग म्हणजे कृषी विभाग,’ अशी प्रतिमा राज्यातील अनेक भागांत आहे. ही प्रतिमा बदलण्यात बारामतीचे कृषी कर्मचारी मात्र यशस्वी झाले आहेत. शेतकऱ्याच्या कामाची फाइल अवघ्या पाच मिनिटांत शोधून त्यावर दहा मिनिटांत कार्यवाही करणारी यंत्रणा कर्मचाऱ्यांनी तयार केली आहे.   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामतीत भव्य प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. त्यांच्याच सांगण्यावरून यातील इमारतीच्या एका अंगाला कृषी खात्याची कार्यालये थाटलेली आहेत. तालुका कृषी कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर उपविभागीय कृषी कार्यालय आहे. तेथून बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर अशा चार तालुका कृषी कार्यालयांवर नियंत्रण ठेवले जाते. मात्र केवळ नियंत्रण आणि स्वाक्षऱ्यांपुरती थातूरमातूर भूमिका न बजावता या उपविभागीय कार्यालयाने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते.  या उपविभागीय कार्यालयात शेतकरी आल्यानंतर त्याचे प्रसन्न चेहऱ्याने स्वागत केले जाते. प्रत्येक कर्मचारी ओळखपत्र लावूनच काम करतो. कार्यालयाच्या भिंतींवर योजनांची ताजी माहिती लावण्यात आली आहे. शेतकऱ्याने त्याच्या कामाविषयी विचारणा केल्यानंतर त्याबाबतची फाइल अवघ्या तीन ते पाच मिनिटांच्या आत शोधली जाते. तोपर्यंत या शेतकऱ्याला विश्रांती कक्षात बसविले जाते. कक्षातच वाचनालय तयार करण्यात आले आहे. तोपर्यंत या शेतकऱ्याची फाइल शोधली जाते. त्यानंतर त्याचे काम का अडले, अनुदान का मिळाले नाही, काय अपूर्तता आहे याची माहिती शेतकऱ्याला दिली जाते. संबंधित कार्यालयाला सूचना दिल्या जातात. १५ मिनिटांत काहीही संभ्रम न बाळगता शेतकरी या कार्यालयातून बाहेर पडतो.  ही सर्व कमाल अर्थातच उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांची आहे. केवळ कागदी घोडे नाचविण्यात धन्यता न मानता या कार्यालयाला रूप कार्पोरेटचे आणि कामाचा दर्जा मात्र गावातील ‘सहकारा’चा ठेवला आहे. ‘‘आम्ही साडेसात लाख पृष्ठसंख्येच्या कागदपत्रांची जुळणी करून घेतली. यात आमच्या कर्मचाऱ्यांनी सतत ८-९ महिने दिवसरात्र मेहनत घेतली. त्यामुळेच आता फाइल केवळ तीन मिनिटांत सापडते. केवळ फाइल सापडून उपयोग नाही. पात्र शेतकऱ्याचे काम झाले पाहिजे. तो समाधानाने त्याच्या शेतात परतावा, असा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो,’’ असे श्री. ताटे यांनी सांगितले. 

तुटलेल्या खुर्च्या, जळमटलेल्या भिंती, धूळ खात पडलेली कागदे आणि हरवलेल्या फाइल्स, गायब झालेले कर्मचारी आणि हे सर्व पाहून निराश आणि त्रस्त होणारा शेतकरी, असे चित्र राज्यातील कृषी खात्याच्या अनेक कार्यालयांचे आहे. ग्रामीण भागात मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयांमध्ये असे चित्र नित्याचे असते. इतकेच नव्हे तर राज्याच्या कृषी खात्याचा गाडा हाकणाऱ्या कृषी आयुक्तालयातील काही विभागांमधील कक्ष देखील धुळीने भरलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बारामतीच्या कृषी कार्यालयाने बदलेली प्रतिमा शेतकऱ्यांना सुखद धक्का देणारी ठरते आहे.  

प्रतिक्रिया बारामतीचे उपविभागीय कृषी कार्यालय आम्हाला घरच्यासारखे वागवते. तेथे पारदर्शकता आहे. कर्मचारी प्रेमळ आहेत. राजकीय अंग किंवा छोटामोठा असा भेद न करता नियमात असेल तर आमचे काम १५ मिनिटांत होते.  - तानाजीबापू पवार, शेतकरी, कोऱ्हाळे, जि. पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com