अतिपावसामुळे संत्रापट्ट्यात फळगळीची समस्या

अतिपावसामुळे संत्रापट्ट्यात फळगळीची समस्या
अतिपावसामुळे संत्रापट्ट्यात फळगळीची समस्या

अमरावती  ः गेल्या हंगामात पाण्याअभावी मोठ्या क्षेत्रावरील संत्रा बागा वाळण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर यावर्षी अतिपावसामुळे आंबिया बहारातील संत्रा फळगळीच्या समस्येचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अनेक बागांमध्ये आंबिया बहाराची फळे कुजून गळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.  चांदूरबाजार तालुक्‍यात शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, करजगाव, सोनोरी, नानोरी त्यासोबतच अंजनगावसूर्जी, वरुड, मोर्शी या भागांत संत्रा बागा आहेत. या भागातील शेतकऱ्यांचे हे मुख्य आणि नगदी पीक आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात अतिउष्णता, जमिनीतील पाण्याची खालावलेली पातळी त्यासोबतच प्रकल्पही कोरडे पडल्याने संत्राबागांना जगविणे कठीण झाले होते. त्यामुळेच लाखो हेक्‍टरवरील संत्रा बागा जळून गेल्या होत्या. यंदा मात्र अतिपावसापासून बागा वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. अतिपावसामुळे संत्रा झाडावरील आंबिया बहाराची फळे कुजत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. संत्र्यावर पिवळे डाग पडून संत्रा फळांची गळ होत असल्याचे चित्रही या भागात अनुभवले जात आहे. चांदूरबाजार तालुक्‍यात गेल्यावर्षी ५८७.०३ मिलिमिटर इतका पाऊस झाला होता. यावर्षी एकूण ९६१.२७ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी सुरवातीपासून पावसाने चांगली हजेरी लावल्याने संत्रा पिकाचा आंबिया बहार चांगलाच बहरला होता. तसेच, संत्र्याला चांगली मागणी असून भावदेखील चांगले मिळत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना यावर्षी चांगले पीक होण्याची खात्री होती. मात्र, आता प्रचंड फळगळतीमुळे पीक हाती येईस्तोवर झाडावर संत्रा टिकणार की नाही, या विवंचनेत संत्रा उत्पादक शेतकरी सापडला आहे. पितृपक्ष संपताच संत्रातोड सुरू होते. याकरिता दिल्ली, केरळ, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, गोवा या भागांतून खरेदीदार येतात अनेक संत्रा बागातील संत्रा खरेदी विक्री व्यवहार सुरू देखील झाले आहेत. 

संजीवक, युरीया फवारणी शिवाय इतर कोणतेच उपाय राष्ट्रीय लिंबूवर्गीय संस्था तसेच कृषी विद्यापीठाकडे नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून संत्रा फळगळीवर ठोस उपाय सुचविण्यात दोन्ही संस्था अपयशी ठरल्या आहेत. मे अखेरपर्यंत संत्र्याची धारणा योग्यरितीने होते. पाऊस सुरू होताच फळगळीच्या समस्येचा सामना शेतकऱ्यांना दरवर्षी करावा लागतो. त्यामुळे दरवर्षी भेडसावणाऱ्या या समस्येचे निदान होण्याची गरज आहे. - रूपेश वाठ, संत्रा उत्पादक शेतकरी, चौसाळा, ता. अंजनगावसूर्जी, जि. अमरावती  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com