उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी

कांदा पीक
कांदा पीक

जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात तापी व इतर नद्यांनजीकच्या गावांमध्ये शेतकऱ्यांमध्ये सुरवातीला उत्साह होता. परंतु सध्याचे कमी दर व पाण्याचा अभाव, यामुळे कांदा लागवड कमी झाली आहे. यातच जेथे लागवड झाली, त्या गिरणा, पांझरा, गोमाई काठावरील अनेक गावांमध्ये सिंचन करताना नाकीनऊ येत आहे.   रोपवाटिकांमध्ये कांदा रोपे विक्रीसाठी अजूनही उपलब्ध आहेत. परंतु उन्हाळ्यात सिंचनासंबंधी अडचणी येतील, म्हणून शेतकरी लागवड टाळत आहेत. पाट पद्धतीने सिंचन करताना अधिक दिवस लागत आहेत. शिवाय जशी उष्णता वाढेल, तशी हलक्‍या जमिनीत पाण्याची गरजही वाढणार आहे. मिळतील त्या दरात रोपवाटिकांमधील रोपांची विक्री अनेक शेतकऱ्यांनी केली.  उन्हाळ कांदा लागवडीसाठी धुळे, शिरपूर, शहादा, एरंडोल, चोपडा, यावल व चाळीसगाव हे तालुके आघाडीवर असतात. परंतु या भागात लागवड कमी झाली असून, खानदेशात मिळून फक्त पाच ते साडेपाच हजार हेक्‍टवर लागवड झाल्याचा अंदाज  आहे. तर गिरणा काठावरील अनेक गावांमध्ये कांदा लागवड झाली असून, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव तालुक्‍यात नदीकाठी जलपातळी घटत आहे. धुळे तालुक्‍यातील नेर, कुसुंबा, कापडणे भागात लागवड घटली आहे.   शिंदखेडामधील चिचवार व आरावे भागात लागवड झालेलीच नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच भडगाव, पाचोरामधील गिरणानदीपासून लांब अंतरावरील गावांमध्येही क्षेत्र कमी झाले आहे. चोपडा तालुक्‍यातील खर्डी, लोणी, वर्डी, धानोरा व सातपुडा लगतच्या भागात पाणीटंचाई असल्याने या भागातही क्षेत्र कमी आहे.  सध्या जळगावसह धुळे, पिंपळनेर (ता. साक्री) येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक टिकून आहे. जळगाव बाजार समितीत सध्या प्रतिदिन १३०० क्विंटल लाल कांद्याची आणि ४०० क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होत आहे. दर ३७५ ते ६०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यानच आहेत. दरवाढ होईल, असे चित्र नाही. सिंचनासाठी तुषार व ठिबक संच खरेदी करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. उताराच्या जमिनीत सिंचन करताना अधिक अडचणी येत असून, लागलीच किंवा दोन दिवसात सिंचन करावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com