कांदा निर्यातीसाठी लोडिंग सुरू... 

निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता करून निर्यातीची तयारी सुरू आहे. मालाच्या मागणीनुसार वर्गीकरण सुरू आहे. त्यामुळे या निर्यातीमुळे दर स्थिर राहून उत्पादकांना त्याचा लाभ मिळणार आहे. - मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव.
Onion loading
Onion loading

नाशिक: केंद्र सरकारने १५ मार्चपासून कांदा निर्यात आणि साठवणुकीवरील निर्बंध उठविल्यानंतर जिल्ह्यासह राज्यातील कांदा बाजारपेठात पुन्हा निर्यातीची गजबज सुरू झाली आहे. आखाती देशांमध्ये दुबई, ओमान, मस्कतसह दक्षिण आशियामधील सिंगापूर, मलेशिया व श्रीलंका या देशातील आयतदारांकडून मागणी असून सहा महिन्यांनंतर सुरू झालेल्या निर्यातीमुळे कांदा दरात सुधारणा अपेक्षित आहे. 

कांदा निर्यात प्रक्रिया सुरळीत होण्याबाबतची अधिसूचना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने संकेतस्थळावर जाहीर केली होती. ज्यामध्ये निर्यात करताना पतपत्र, किमान निर्यात मूल्य नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे गेल्या पाच महिन्यानंतर कांदा निर्यात पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा निर्यातीसाठी मालाची लोडिंग करून माल बंदरावर पाठवायला सुरुवात केली आहे. 

उन्हाळ कांद्याच्या दरात वाढ झाल्यानंतर वाणिज्य मंत्रालयाने दर नियंत्रित करण्यासाठी निर्यात प्रक्रियेवर केंद्र सरकारने सप्टेंबर २०१९ अखेर निर्बंध आणले होते. गेल्या पाच महिन्यांत बाहेरील देशांमधून कांद्याची मागणी असताना बंदीमुळे निर्यात प्रक्रिया बंद होती. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण होऊन कांदा उत्पादकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. रविवार (ता.१५) पासून निर्यात सुरळीत झाल्याने कांदा उत्पादक व व्यापारी या दोन्ही घटकांना मोठा दिलासा मिळाला असून, व्यवहार पुन्हा रुळावर येतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना प्रमुख मागणी असलेल्या आखाती देशांमध्ये दुबई, ओमान, मस्कतसह दक्षिण आशियामधील सिंगापूर, मलेशिया व श्रीलंका या देशातील आयतदारांकडून मागणी आहे. ही घोषणा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मालाची चौकशी होऊ लागल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्या अनुषंगाने तयारी करून माल पाठवायला सुरुवात केली आहे.  लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, कळवण, नामपूर आदी महत्त्वाच्या कांदा बाजारातील व्यापाऱ्यांनी त्या अनुषंगाने तयारी पूर्ण केली आहे. ज्यामध्ये निर्यातक्षम मालाचे वर्गीकरण करून व्यापारी ट्रकच्या माध्यमातून माल मुंबई येथे कंटेनर लोड करण्यासाठी पाठवीत आहेत. 

साठवणूक मर्यादेमुळे काही अडचणी होत्या; आता तीही हटविल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. सरकारने कांदा निर्यातबंदी लागू नये व हा निर्णय कायम ठेवावा त्यातून कांदा उत्पादकांना दिलासा दिला जाईल, असा सूर उमटू लागला आहे.  या देशांत प्राधान्य...  दुबई, ओमान, मस्कत, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका आदी 

प्रतिक्रिया...  मागणी भरपूर आहे, माल जाण्यास सुरुवात झाली आहे. श्रीलंका, मलेशिया या देशांना माल पाठविला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेऊन कामकाज सुरू ठेवावे लागणार आहे.  - नंदकुमार डागा, अध्यक्ष, लासलगाव मर्चंट असोसिएशन   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com