आरोग्यदायी पेरूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

 processed food products made from guava fruit
processed food products made from guava fruit

पेरू हे फळ फक्त चविष्टच नाही तर त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पेरूच्या झाडाचे इतर भागदेखील तेवढेच उपयोगी आहेत. पेरू फळापासून जॅम, जेली, सरबत असे पदार्थ घरगुती स्तरावर किंवा गावपातळीवर तयार करून महिलांना चांगला रोजगार मिळवता येतो. फळासोबतच पेरूची पाने, खोड आणि सालही उपयुक्त आहे. पेरूच्या पानांमध्ये असलेले ८ ते १५ टक्के टॅनिन हे कातडी कमविण्यासाठी वापरतात. यामुळे कातडी मऊ व घट्ट बनते.

  • पानांपासून तेल निघते ज्याचा उपयोग स्वादाकरिता होतो आणि हे तेल जंतुनाशक देखील आहे. याशिवाय पानांमध्ये असलेल्या जीवनसत्व ब १, ब २ , ब ३ नायसिन व क जीवनसत्त्व तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी उपयोगी पडतात.  
  • पेरूच्या झाडाच्या खोडाच्या सालीपासून रंग मिळतो.  
  • पेरूच्या झाडाचे खोड हे मऊ असते. त्याचा उपयोग कोरीव काम करण्यासाठी करतात.
  • आरोग्यदायी पेरू

  • पेरूमध्ये असलेल्या उच्च प्रतीच्या अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांमुळे (विशेषतः जीवनसत्व क) एकूणच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.  
  • पोटॅशियम आणि तंतूच्या जास्त प्रमाणामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.  
  • संशोधकांच्या मते पेरूच्या पानांच्या अर्काच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नियंत्रित राहते.  
  • पेरूमध्ये असलेल्या तंतूमुळे (डाएटरी फायबर) पचन क्रिया चांगली व सुरळीत राहते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.  
  • क जीवनसत्त्वांच्या जास्त प्रमाणामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि थंडीमध्ये सहज इन्फेक्शन होत नाही. यामुळे लहान मुलांना थंडीच्या दिवसांत स्वच्छ पेरू खाण्यास द्यावेत जेणेकरून सर्दी, खोकल्याची लागण सहज होणार नाही.  
  •  पेरूमध्ये असलेल्या कॅरोटीन आणि लायकोपिन सारख्या अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्व अ, क मुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राहते.  
  • जीवनसत्त्व अ मुळे डोळ्यांचे आरोग्यदेखील चांगले राहते.  
  • पेरूच्या पानांमध्ये दाहशामक गुणधर्म तसेच जंतूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असल्यामुळे दात दुखीमध्ये याची कोवळी पाने चांगली चावून खाल्ल्यास फायदेशीर ठरते. मॅग्नेशियममुळे स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत होते.
  • पेरूची चव वर्षभर घ्यायची असेल तर त्याला काही प्रक्रिया करून वेगवेगळ्या पदार्थांच्या स्वरूपात टिकवून ठेवता येते. पेरूचे विविध पदार्थ जेली जेली करण्यासाठी स्वच्छ, कडक व पिकलेली फळे निवडावीत. पेरू स्वच्छ धुवून त्याच्या एकसमान फोडी करून घ्याव्यात. १ किलो फोडींसाठी १.२५ लीटर पाणी आणि १ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळून जाड बुडाच्या भांड्यात साधारण ३० मिनिटे उकळावे. अर्क चाळणीने गाळून घ्यावा. त्यामध्ये साधारण ७०० ग्रॅम साखर आणि ४ ग्रॅम सायट्रिक ऍसिड घालून पुन्हा उकळावे. ६७ ब्रिक्स येईपर्यंत किंवा जेलीची शीट टेस्ट येईपर्यंत शिजवावे. शेवटी काचेच्या निर्जंतुक बाटलीत भरून थंड जागी ठेवावे. थंड झाल्यास जेली सेट झालेली दिसेल. शीट टेस्टः जेली परीक्षणासाठी एका चमच्यात थोडी जेली घेऊन ती थंड करावी व चमचा हळुवारपणे तिरपा करावा. मिश्रण एकसंध घट्ट स्वरूपात खाली पडले तर जेली तयार झाली असे समजावे. सरबत (स्क्वॅश) १ किलो पिकलेले कमी बियांचे पेरू स्वच्छ धुवून फोडी करून घ्याव्या. १. ७५ लीटर पाणी, १. ७५ किलो साखर, २० ग्रॅम सायट्रिक ॲसिड मोजून ठेवावे. फोडी बुडतील एवढेच पाणी घालून फोडी शिजवाव्यात. शिजलेल्या फोडी मिक्सरमध्ये बारीक करून गर गाळून घ्यावा. साखर आणि राहिलेले पाणी घालून पाक करून घ्यावा. या पाकात सायट्रिक ॲसिड, पेरूचा गर मिसळून एक उकळी आणावी. थंड झाल्यावर निर्जंतुक बाटलीत भरून ठेवावे. लागेल तसे पाणी घालून सरबत तयार करावे. जॅम ताजी, पिकलेली पण घट्ट फळे निवडावीत. स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून फोडी करून घ्याव्यात. फोडी बुडतील एवढे पाणी घालून मऊ शिजवून घ्यावे. शिजलेल्या फोडी मिक्सरमधून बारीक करून घ्याव्यात आणि एक किलो फोडीस ७५० ग्रॅम साखर आणि ४ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळून जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात गर शिजविण्यास ठेवावा. शिजलेल्या गराची शीट टेस्ट येईपर्यंत शिजवावे. शेवटी आवडीचा रंग मिसळून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत जॅम भरून ठेवावा. थंड झाल्यास जॅम सेट होतो. संपर्कः प्रा. माधुरी रेवणवार, ९४०३९६२०१४ (विषय विशेषजज्ञ (गृह विज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, ता. बिलोली जि. नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com