कोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

कोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर त्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांची साठवण करून वर्षभर विविध अन्नपदार्थांत वापरतात.हिरव्या रंगाची फळे फोडून वाळवतात.
Processed foods products of kokum
Processed foods products of kokum

कोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर त्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांची साठवण करून वर्षभर विविध अन्नपदार्थांत वापरतात. हिरव्या रंगाची फळे फोडून वाळवतात. त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ साठविण्यासाठी आणि आंबटपणा आणण्यासाठी करतात. कोकम सालीची भुकटी

  • कोकम सालीची भुकटी तयार करण्यासाठी सर्वप्रथम परिपक्व कोकम फळे निवडावीत. ती फळे स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडी करावीत. नंतर फळांचे सहा ते आठ तुकडे करून आतील गर व बिया वेगळ्या कराव्यात.
  • हे तुकडे ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला वाळवणी यंत्रात चांगले वाळवावेत. पूर्णपणे वाळल्यानंतर त्यांची दळण यंत्रात भुकटी करावी.
  • प्लॅस्टिक पिशवीमध्ये हवाबंद करून ठेवावी.
  • या भुकटीपासून कोकम पेय पाणी, साखर, मीठ, जिरेपूड घालून तयार करता येते.
  • अमृत कोकम (सिरप)

  • उन्हाळ्यामध्ये या पेयाच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. अमृत कोकम बनविण्यासाठी ताज्या कोकम फळांच्या सालीचा वापर करतात.
  • सर्वप्रथम उत्तम प्रतीची, परिपक्व, ताजी फळे निवडावीत. फळे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन, पुसून कोरडी करून घ्यावीत.
  • नंतर फळे कापून त्यांचे ४ किंवा ६ समान भाग करावेत. गर आणि बिया बाजूस काढून फळांच्या सालीचे वजन करून घ्यावे.
  • स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात किंवा उत्तम प्रतीच्या प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये सालीमध्ये १ः२ या प्रमाणात थराथराने साखर मिसळावी. एक किलो कोकम सालींसाठी दोन किलो साखर वापरावी. दुसऱ्या दिवशी बरीचशी साखर सालीच्या अंगच्या पाण्यात विरघळते.
  • त्यानंतर दरदिवशी हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ चांगले ढवळावे, त्यामुळे साखर लवकर विरघळण्यास मदत होते. साधारणपणे सात ते दहा दिवसांत रसात साखर पूर्ण विरघळते आणि कोकम सिरप तयार होते.
  • तयार पेय मलमलच्या कापडातून गाळून घेऊन साली वेगळ्या कराव्यात. त्या सिरपमध्ये आवश्‍यकता भासल्यास सोडिअम बेन्झोएट ६०० मिलिग्रॅम प्रति किलो सिरप या प्रमाणात मिसळावे.
  • हे सिरप निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांत किंवा फूड ग्रेड प्लॅस्टिक कॅनमध्ये हवाबंद करून थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावे.     
  • कोकम फळांमध्ये आम्लतेचे प्रमाण भरपूर असल्याकारणाने कोकम सिरपमध्ये सायट्रिक आम्ल वापरावे लागत नाही. या प्रकारे बनविलेल्या सिरपमध्ये एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण सुमारे ७०-७२ टक्के असते. गडद लाल रंगाचे कोकम सिरप हे संपृक्त पेय असल्याकारणाने त्यामध्ये १ ः६ या प्रमाणात पाणी मिसळून आणि चवीसाठी थोडी जिऱ्याची भुकटी, तसेच थोडे मीठ वापरून पेय तयार होते.
  • कोकम तेल

  • कोकम तेल तयार करण्यासाठी कोकमाच्या बियांचा वापर केला जातो. त्यासाठी कोकम बिया सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रामध्ये खणखणीत वाळवाव्यात.
  • नंतर बियांवरील आवरण काढावे. आवरण काढलेल्या बिया दळण यंत्रात दळून त्यांची भुकटी तयार करावी. - अशी भुकटी उकळत्या पाण्यामध्ये दोन-तीन तास ठेवली जाते. नंतर हे द्रावण थंड केले जाते.
  • द्रावण थंड झाल्यानंतर पाण्याच्या वर तवंग येतो. तो तवंग व्यवस्थित काढून त्याला उष्णता देऊन नको असलेले घटक बाजूला केले जातात. पुन्हा ते थंड केले जाते. यालाच कोकम तेल म्हणतात.
  • कोकम आगळ

  • पिकलेल्या कोकम फळांच्या साली, गर आणि मीठ यांच्या मिश्रणापासून तयार करण्यात येणाऱ्या रसास कोकम आगळ असे म्हटले जाते. कोकम आगळ म्हणजे परिपक्व कोकमाचा खारवलेला रस होय.
  • कोकम आगळ हे पिकलेल्या कोकम फळांच्या सालीपासून, बियांवरील गरापासून किंवा पूर्ण फळाच्या फोडींपासून १५ ते २० टक्के मीठ वापरून तयार करतात.
  • तयार मिश्रण प्रत्येक दिवशी सकाळ-संध्याकाळ असे दोन वेळा ढवळावे. जेणेकरून मीठ त्या रसात पूर्णपणे विरघळेल. आठवड्याने अशा प्रकारे खारवलेला कोकमाचा रस म्हणजेच कोकम आगळ हे निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत किंवा प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये हवाबंद करून ठेवावे.
  • कोकम आगळापासून १ ः ७ या प्रमाणात पाणी मिसळून आणि चवीसाठी साखर आणि जिरे वापरून स्वादिष्ट पेय तयार करता येते.
  • कोकम आगळापासून पाणी तसेच खोबऱ्याचे दूध वापरून, फोडणी देऊन 'सोलकढी' हे स्वादिष्ट पेय तयार करता येते. सोलकढीला थोडा तिखटपणा आणण्यासाठी हिरव्या मिरचीचा रस वापरतात. सोलकढी हे पेय जेवणानंतर पित्तशामक म्हणून घेतले जाते.
  • संपर्क- प्रा. पल्लवी कांबळे, ८३२९३७५३९० आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com