बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वर

बचत गट
बचत गट

मुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल ॲप सुरू करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचतगटांची उत्पादने ऑनलाइन पद्धतीने थेट खरेदी करू शकतात. मागील काही वर्षांत बचतगटांच्या चळवळीने अशी ऑनलाईन क्रांती अनुभवली आहे. ॲमेझॉन हे जागतिक पातळीवरील अग्रमानांकीत असे ई-कॉमर्स व्यासपीठ आहे. शॉपिंगप्रेमींचे हे आवडते मोबाईल ॲप असून, यावर दररोज मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्य शासनाने आता बचतगटांची उत्पादने या ॲपवर उपलब्ध करून बचतगटांना मोठी बाजारपेठ मिळवून दिली आहे. ग्रामीण महिलांचा जीवनस्तर उंचावत त्यांच्या उद्यमशीलतेला वाव देत प्रगतीचा नवीन टप्पा त्यांच्या आयुष्यात यावा, यासाठी नवतेजस्विनी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नवतेजस्विनी ग्रामीण महिला सक्षमीकरण या कार्यक्रमांतर्गत ३६५ लोकसंस्थांची उभारणी करून त्या स्वबळावर उभ्या राहिल्या. नवतेजस्विनी ग्रामीण उपजीविका विकास हा ५२८ कोटी ५५ लाख रुपये किंमतीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून १० लाख कुटुंबे दारिद्र्यातून बाहेर येऊन आपत्कालीन स्थितीतही तग धरू शकतील.  या योजनेत राज्य शासनास ३३५ कोटी ४० लाख रुपये कर्ज आयफाडकडून प्राप्त होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ५ लाख बचतगटांची चळवळ अधिक गतिमान होणार असून, राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार आहे. पुढील सहा वर्षांच्या कालावधीमध्ये महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) हा प्रकल्प राबविण्यात येईल. बिनव्याजी कर्ज देणार शासनाने सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेतून बचतगटांना बिनव्याजी बँक कर्ज उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेतून १० हजारहून अधिक बचतगटांना शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात आला आहे. उमेद अभियानातून सन २०१४ नंतर २ लाख ४५ हजार बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. यातून ग्रामीण भागातील ३२ लाख ८६ हजार कुटुंबे बचतगट चळवळीशी जोडली गेली आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना राबविण्यात येत असून यातून आतापर्यंत २७ हजार ६६७ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com