सांगलीत १५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

यंदा सहकारी व खासगी अशा १२ कारखान्यांची धुराडी पेटलेली आहे. दिवाळीनंतर अधिकाधिक गाळप करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु बऱ्याच कारखान्यांना मजुरांची टंचाई भेडसावत आहे. तीन आठवड्यांच्या कालावधीत साडेचौदा लाख टन उसाचे गाळप करून १४ लाख ७० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी उतारा १०.१७ इतका आहे.
Production of 15 lakh quintals of sugar in Sangli
Production of 15 lakh quintals of sugar in Sangli

सांगली : जिल्ह्यात यंदा सहकारी व खासगी अशा १२ कारखान्यांची धुराडी पेटलेली आहे. दिवाळीनंतर अधिकाधिक गाळप करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु बऱ्याच कारखान्यांना मजुरांची टंचाई भेडसावत आहे. तीन आठवड्यांच्या कालावधीत साडेचौदा लाख टन उसाचे गाळप करून १४ लाख ७० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर सरासरी उतारा १०.१७ इतका आहे.

जिल्ह्यात यंदा सहकारी व खासगी अशा १५ साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला होता. परंतु प्रत्यक्षात १२ साखर कारखानेच सुरू झाले आहेत. परवाना मिळालेले तासगाव, डफळे कारखाना जत आणि यशवंत कारखाना नागेवाडी या तीन कारखान्यांत अद्याप गाळप सुरू नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तर महांकाली, माणगंगा आणि केन ॲग्रो हे कारखाने यंदा बंदच आहेत. त्यामुळे बारा कारखानेच हंगाम सुरू ठेवतील, असे चित्र दिसून येते.

गतवर्षीच्या हंगामात शेवटी कोरोनाच्या संकटामुळे कारखान्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या. बरेच ऊसतोड मजूर जिल्ह्यात काही दिवस अडकून पडले. कारखान्यांना त्यांची राहणे व जेवणाची व्यवस्था करावी लागली. त्यानंतर त्यांना सुखरूप सोडावे लागले. या मजुरांनी कोरोनाच्या संकटाचा अनुभव घेतला. त्यानंतर कोरोनाची आपत्ती कायम असताना कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक कारखान्यांकडे मजूर यंदा कमी प्रमाणात आले आहेत. त्यामुळे ऊसतोडीसाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. मजुरांची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर ऊसतोडणी करून घेण्यासाठी पाठपुरावा लागेल अशी परिस्थिती आहे. मजुरांची कमतरता असताना काही ठिकाणी शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी जादा पैसे द्यावे लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अशा सर्व परिस्थितीत कारखान्यांचा हंगाम सुरूआहे.

यंदा ऊस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु मजुरांची कमतरता लक्षात घेऊन हंगामाच्या शेवटी अधिकाधिक गाळप करण्यासाठी कारखाना प्रशासनाला कसरत करावी लागेल, असे चित्र आहे. सध्या काही कारखाने दैनंदिन गाळप क्षमतेप्रमाणे कारखाने चालवत आहेत. परंतु काही कारखान्यांचे गाळप क्षमतेपेक्षा थोडे कमी असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यातील गाळपाचे चित्र (३ डिसेंबरअखेर)
कारखाना दैनंदिन गाळप क्षमता (टन) गाळप (लाख टन) साखर (लाख क्विंटल) उतारा
वसंतदादा (दत्त इंडिया) ७५०० १.५३ १.५४ १०.०९
राजारामबापू साखराळे ७००० १.५९ १.७१ १०.७४
विश्‍वासराव नाईक २५०० १.१५ १.०८ ९.३८
हुतात्मा किसन अहिर ५००० ०.८९ ०.८९ १०.०८
राजारामबापू वाटेगाव ४००० १.०० १.०६ १०.६३
सोनहिरा ५५०० १.८४ १.८२ ९.९२
क्रांती ५००० १.९७ १.९९ १०.१२
राजारामबापू (सर्वोदय) ३५०० ०.८० ०.८२ १०.२५
मोहनराव शिंदे ४००० ०.३६ ०.३२ ८.९६
निनाईदेवी (दालमिया) ५००० ०.६८ ०.७२ १०.५७
उदगिरी शुगर २५०० १.२१ १.२३ १०.१७
सद्‌गुरू श्रीश्री २५०० १.४४ १.५० १०.४५
एकूण ०००० १४.४६ १४.७० १०.१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com