फणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचे

विविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी पावडरचा वापर केला जातो. खाकरा, शेव, विविध बेकरी उत्पादने, रोजच्या आहारातील पोळी यामध्ये फणस बीचा वापर करता येतो.
khakra, cakes and pickles of jackfruit
khakra, cakes and pickles of jackfruit

विविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी पावडरचा वापर केला जातो. खाकरा, शेव, विविध बेकरी उत्पादने, रोजच्या आहारातील पोळी यामध्ये फणस बीचा वापर करता येतो. फणसाच्या फळांचे ढोबळमानाने कापा व बरका असे दोन प्रकार पडतात. कापा प्रकारच्या फणसातील गरे कडक, खुसखुशीत, चवीला जास्त गोड व रुचकर तर बरका फणसाचे गरे नरम, चवीला कमी गोड किंवा सपक असतात. फणसाचे पिकलेले गरे खाल्ले जातात. त्यापासून जॅम, जेली, लोणची व पाक हे खाद्यपदार्थ तयार करतात. कोवळ्या फणसाची भाजी केली जाते. तसेच कच्च्या फणसाचे लोणचे, सूप किंवा चिप्स बनविले जातात. फणसाचा गर हवाबंद करून त्याची विक्री केली जाते. फणसाच्या गरापासून फ्रूट लेदर, शुगर फ्री बेकरीचे पदार्थ, जॅम तसेच विविध प्रकारची पेये तयार केली जातात. फणस गरापासून वाइनसुद्धा बनवली जाते. फणसाची बी वाळवून पावडर करून किंवा भाजून खाल्ली जाते. विविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढवण्यासाठी फणस बी पावडरचा वापर केला जातो. खाकरा, शेव, विविध बेकरी उत्पादने, रोजच्या आहारातील पोळी यामध्ये फणस बीचा वापर करता येतो. फणसाच्या लाकडाचा फर्निचर निर्मितीसाठी केला जातो. विविध प्रक्रियायुक्त पदार्थ  ज्यूस साहित्य  फणस गर  ५०० ग्रॅम, साखर २७५ ग्रॅम, पाणी २.५ लिटर, ग्वार गम ०.२५ ग्रॅम. कृती पिकलेल्या फणस गराचा ५०० ग्रॅम पल्प घ्यावा. पाक तयार करण्यासाठी २.५ लिटर पाण्यात २७५ ग्रॅम साखर मिसळून चांगली विरघळून घ्यावी. तयार साखरेच्या पाकात फणसाचा पल्प एकत्रित करून चांगले ढवळून घ्यावे. या गरम मिश्रणात सायट्रिक आम्ल आणि ग्वार गम पूर्णपणे मिसळावेत. मिश्रणाचा टी.एस.एस. १० आल्यानंतर उष्णता देणे बंद करून गरम मिश्रण लगेच बाटलीत भरावे. कप केक  साहित्य  फणसाचा पल्प २०० ग्रॅम, फणसाचे तुकडे १० ग्रॅम, मैदा २५० ग्रॅम, मिल्क पावडर १०० ग्रॅम, बेकिंग पावडर ३.७५ ग्रॅम, बेकिंग सोडा ३.७५ ग्रॅम, बटर ५० ग्रॅम. कृती मैदा चाळणीने चाळून त्यात बेकिंग पावडर आणि सोडा टाकून पुन्हा चाळून घ्यावा. दुसऱ्या भांड्यात बटर, फणसाचा पल्प, मिल्क पावडर एकत्र करून ब्लेंडरमधून काढावे. या मिश्रणात मैदा टाकून पुन्हा ब्लेंडरमधून काढावे. नंतर त्यात फणसाचे तुकडे टाकावेत. केकचा आकार येण्यासाठी मफीन्स पात्रांचा वापर करावा. या पात्रांना मिश्रण चिकटू नये, यासाठी पात्रास बटर आणि मैदा लावावा. पात्रांमध्ये तीन चतुर्थांश भाग तयार मिश्रण भरून बेकिंग ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअस तापमानास २० मिनिटांसाठी ठेवावे. चांगले भाजलेले केक २० ते २५ मिनिटे थंड होण्यास ठेवून द्यावेत. लोणचे साहित्य   कच्च्या फणस गराच्या फोडी २५० ग्रॅम, तेल, बडीशेप ६.२५ ग्रॅम, मेथी बी ३.७५ ग्रॅम,  काश्मिरी मिरची पावडर ६.२५ ग्रॅम, बेडगी मिरची पावडर २.५ ग्रॅम, हिंग २.५ ग्रॅम, मोहरी डाळ १२.५ ग्रॅम, लवंग १.२५ ग्रॅम, मसाला वेलची १.२५ ग्रॅम,  काळी मिरी १.२५ ग्रॅम, मीठ ३० ग्रॅम. कृती मोहरी डाळ कढईत चांगली भाजून घ्यावी. थंड झाल्यावर त्याची मिक्सरमधून जाडसर भरड करावी. लवंग, मोठी वेलची, बडीशेप, मेथी बी वेगवेगळे भाजून त्यांची जाडसर भरड करून घ्यावी. एका खोल भांड्यात कच्च्या फणस गराच्या फोडी घेऊन त्यात मीठ, भाजलेल्या मोहरी डाळीची भरड, काश्मिरी मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर आणि मसाल्यांची भरड एकत्रित करावी. या मिश्रणात तापवून कोमट केलेले तेल मिसळावे. तयार मिश्रणास काही वेळ चांगले ढवळून घ्यावे आणि काचेच्या भरणीत भरावे. कच्च्या फणसाचा खाकरा साहित्य कच्च्या फणस गराचा पल्प १०० ग्रॅम, मैदा ७५ ग्रॅम, गव्हाचे पीठ ७५ ग्रॅम, तीळ १.५ ग्रॅम, धने पावडर ३.७५ ग्रॅम, आमचूर पावडर ३.७५ ग्रॅम, लाल मिरची पावडर २.२५ ग्रॅम, मीठ ३ ग्रॅम, तेल ७.५ ग्रॅम. कृती  कच्च्या फणस पल्पमध्ये मैदा, गव्हाचे पीठ, तेल, मीठ, तीळ, धने पावडर, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर एकत्रित करून चांगले मळून घ्यावे. या मळलेल्या कणकेच्या गोळ्यावर ओले सुती कापड ठेवून त्यास १५ ते २० मिनिटे ठेवून द्यावे. नंतर त्याचे ४० ते ४५ ग्रॅम वजनाचे छोटे गोळे करावेत. तयार छोटे गोळे पातळ लाटून गरम तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस शेकून घ्यावे. थंड करून तयार खाकरा हवाबंद पाकिटात सील करावा. संपर्क - प्रा. पल्लवी कांबळे, ८३२९३७५३९० (आदित्य अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com