खरीप पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता

पिके जोपासण्यापुरता पाऊस पडत आहे. अजून विहिरीला, तळ्याला कुठबी पाणी नाही. पोळा सणाला बैल धुण्यासाठी पुरेसे पाणी मिळाले नाही. पावसाने दडी मारल्यामुळे उत्पादनात घट होईल. - सुनील चिमनपडे,कुडळी, ता. देगलूर, जि. नांदेड.
खरीप पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता
खरीप पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता

नांदेड : जिल्ह्यातील खरीप पिकांना परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे. भुरभुर पावसामुळे पिकांची वाढ झाली. परंतु ओढे, नाले, नद्या प्रवाहित नाहीत. विहीर, कूपनलिकांना पाणी नाही. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या कायम आहे. सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे केळीच्या क्षेत्रात घट झाली आहे. मूग, उडदाचे उत्पादन हाती न आल्यामुळे शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या सावटाखाली पोळा सण उधार उसणवारी करून साजरा केला आहे. 

जिल्ह्यातील खरीप पिकांच्या पेरणीक्षेत्रापैकी सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ३ लाख ६५ हजार ४९७ हेक्टर आहे. मूग २२ हजार ७६५ हेक्टर, उडीद, २२ हजार ६५६ हेक्टर, तूर ७१ हजार १४४ हेक्टर, कपाशी २ लाख ३० हजार ६१२ हेक्टर, ज्वारी ३५ हजार ४६१ हेक्टर, तर मका १ हजार १७५ हेक्टर आहे. आधीच कमी पाऊस झाला. त्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला. परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावून घेतला आहे. 

हलक्या जमिनीवरील पिके वाळून गेली आहेत. भारी जमिनीवरील पिके उन्हामुळे सुकत आहेत. मूग, उडीद या कमी कालावधीतील पिकांना शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाचा ताण बसला. सोयाबीनची फुले, शेंगाची गळ सुरू आहे. कपाशीची बोंडे भरण्यासाठी आवश्यक ओलावा नाही. हळद पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात घटणार आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे इसापूर धरणात १४.८५ टक्केच उपयुक्त  पाणी आहे. त्यामुळे आवर्तनाची खात्री नाही. विहिरींना पाणी नसल्यामुळे जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात घट झाली आहे.

साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांना विमा कवच

पंतप्रधान पीकविमा योजनेत यंदाच्या खरिपातील सुमारे साडे पाच लाख हेक्टरवरील पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले. त्यासाठी १३ लाख प्रस्ताव सादर करण्यात आले. पीक योजनेत सहभागी शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम परतावा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढावी, अशी मागणी आहे.

चारा, पाण्याची समस्या कमी पावसामुळे धुरे बांधावरील गवताची वाढ झाली नाही. माळरानावरील गवत सुकून गेले आहे. ज्वारी, मका या चारा पिकांखालील क्षेत्र कमी आहे. गतवर्षीचा चारा संपला आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम आहे. अनेक शेतकऱ्यांना अजूनही चारा विकत घ्यावा लागत आहे. परंतु पैसे नाहीत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही बिकट आहे. 

पावसाची ४९ टक्के तूट

जिल्ह्यात १ जून ते ३१ ऑक्टोंबर या कालावधीतील पावसाची सरासरी ९५५.५३ मिलिमीटर आहे. यंदा पहिल्या तीन महिन्यात ४९२ मिलिमीटर (५१ टक्के) पाऊस झाला. देगलूर तालुक्यात गतवर्षीप्रमाणे यंदाही सर्वात कमी पाऊस झाला आहे. ऑगस्टअखेर पर्यंत वार्षिक सरासरीच्या ३९ टक्के पाऊस झाला. नांदेड तालुक्यात ५५.४५ टक्के, अर्धापूरमध्ये ४८.०६ टक्के, मुदखेडमध्ये ६२.९२ टक्के, भोकर ५०.७० टक्के, उमरीत ४९.२९ टक्के, कंधारमध्ये ५४.११ टक्के, लोह्यात ४६.९९ टक्के, किनवटमध्ये ५४.५३ टक्के, माहूरमध्ये ५१.९५ टक्के, हदगावात ४७.३३ टक्के, हिमायतनगरमध्ये ५५.४३ टक्के, बिलोलीत ५४.१९ टक्के, धर्माबादमध्ये ५५.०४ टक्के, नायगावात ५१.२७ टक्के, मुखेडमध्ये ४७.१७ टक्के पाऊस झाला. गेल्या काही दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com