जमीन सुपिकतेसाठी कंपोस्ट खत निर्मिती

कंपोस्ट खताचा उपयोग जमिनीत केल्यास जमिनीत पूर्वी दिलेल्या रासायनिक खतांमधील अन्नद्रव्य विद्राव्य स्वरूपात रूपांतर घेऊन पिकांना उपलब्ध होतात. तसेच जमिनीत महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करण्यास मदत होते.
Methods of making compost manure
Methods of making compost manure

कंपोस्ट खताचा उपयोग जमिनीत केल्यास जमिनीत पूर्वी दिलेल्या रासायनिक खतांमधील अन्नद्रव्य विद्राव्य स्वरूपात रूपांतर घेऊन पिकांना उपलब्ध होतात. तसेच जमिनीत महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करण्यास मदत होते. सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने कुजवून कंपोस्ट खत तयार होते. सेंद्रिय पदार्थ कार्बनच्या अनेक संयुगाने बनलेले असतात. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजण्याची क्रिया सतत चालू असते आणि शेवटी सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर साध्या असेंद्रिय संयुगात होते. जमिनीच्या उत्पादन क्षमतेत सेंद्रिय पदार्थाचे कार्य सुपीक जमीन बनविण्यात सेंद्रिय पदार्थाचा प्रत्यक्ष सहभाग असतो. कारण त्यामधून हळूहळू अन्नद्रव्ये पिकासाठी उपलब्ध होतात. सेंद्रिय पदार्थांच्या खनिजीकरणामुळे कार्बन, नायट्रोजन, गंधक, फॉस्फरस व इतर मूलद्रव्य मुक्त होतात. भारी जमिनीत चिकण मातीच्या कणांचे प्रमाण जास्त असते. अशा जमिनीत पाणी हळूहळू मुरते, त्यामुळे बरेचसे पाणी वाहून जाते, अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही. भारी जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास ती जमीन भुसभुशीत होते. मशागत करणे सोपे जाते. जमीन भुसभुशीत झाल्यावर पाणी मुरते पाणी वाहून जात नाही, त्यामुळे जमिनीची धूप कमी होते, हवा खेळती राहते. जमिनीच्या पृष्ठभागावर पोपडा तयार होत नसल्याने पेरलेल्या बियाण्याची उगवण चांगली होते. शेतकरी रासायनिक खतांचा वापर शिफारशीपेक्षा जास्त करू लागले आहेत. त्यामुळे जमिनीत उपयुक्त अन्नद्रव्यांचे असंतुलन निर्माण झाले. जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीवर दिसून येऊ लागला. कंपोस्ट खताचे फायदे 

  • काडीकचरा, जनावरांचे मलमूत्र, पिकाचे उरलेले अवशेष तसेच बांधावरील पानगळ इत्यादी अवशेषांचे जिवाणूच्या सहयोगाने कुजून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत.
  • कंपोस्ट खताचा उपयोग जमिनीत केल्यास जमिनीत पूर्वी दिलेल्या रासायनिक खतांमधील अन्नद्रव्य विद्राव्य स्वरूपात रूपांतर घेऊन पिकांना उपलब्ध होतात. तसेच जमिनीत महत्त्वाच्या अन्नद्रव्याचे संतुलन व संतुलित पुरवठा करण्यास मदत होते. पिकांची जोमाने वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.
  • कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते.
  • कंपोस्ट खतामुळे भारी जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मातीची धूप कमी होते. हलक्‍या जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
  • कंपोस्ट खत करण्याच्या पद्धती इंदौर पद्धत

  • या पद्धतीला ढीग पद्धत म्हणतात. यामध्ये ढिगाची लांबी सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेनुसार ठेवावी. रुंदी ६ फूट आणि उंची ३ ते ६ फूट ठेवावी. कंपोस्ट करण्या करता शेतातील काडीकचरा, जनावरांचे शेण,मूत्र वापरतात.
  • यामध्ये ३० सेंमी काडी कचऱ्याचा थर करावा. त्यावर १५ सेंमीचा शेणमुत्राच्या मिश्रणाचा थर द्यावा. जर शक्‍य असेल तर ०.९ किलो अमोनियम सल्फेट शेणमूत्राच्या स्लरी सोबत शिंपडावे. यामधून मिळणारा नायट्रोजन सूक्ष्म जिवांची वाढ करून कुजवण्याचा वेग वाढतो.
  • जमिनीपासून ५ ते ६ फूट उंच आणि ४ ते ५ थर काडी कचरा, शेणमुत्राच्या मिश्रणाचे द्यावेत. याशिवाय ढिगाला शेणाने सारवावे. यामुळे तापमानात वाढ होऊन कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते.
  • कुजण्याची क्रिया लवकर होण्याकरता एका महिन्याच्या अंतराने ढीग वर-खाली करून कुजणारे पदार्थ एकजीव करावेत. ४ ते ५ महिन्यात इंदौर पद्धतीने तयार केलेले कंपोस्ट खत तयार होते.
  • बंगलोर पद्धत

  • या पद्धतीला खड्डा पद्धत असे म्हणतात. खड्याची रुंदी ५ ते ६ फूट, ३ फूट खोली आणि लांबी सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेनुसार ठेवावी.
  • बंगलोर पद्धतीचा खड्डा आजूबाजूच्या क्षेत्रापेक्षा उंचावर घेतात. जेणेकरून त्या ठिकाणी बाहेरचे पाणी येवून मुरणार नाही.
  • कंपोस्ट खतासाठी शेतातील काडी-कचरा, शेणमूत्र वापरतात. यामध्ये ३० सेंमी काडी कचऱ्याचा थर असावा. त्यावर १५ सेंमी शेणमुत्राच्या मिश्रणाचा थर द्यावा. जर शक्‍य असेल तर ०.९ किलो अमोनियम सल्फेट शेणूमुत्रासोबत शिंपडावे. यामधून मिळणारा नायट्रोजन सूक्ष्म जिवांची वाढ करून कुजवण्याचा वेग वाढतो.
  • उन्हाळ्यात १ ते २ वेळा पाणी देण्याची गरज असते. यामुळे खड्याच्या तापमानात वाढ होत नाही. कुजण्याची प्रक्रिया ऑक्सिजन विरहीत होते. या प्रक्रियेत अमोनिया कमी प्रमाणात निघून जातो. कारण जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्‍साईड असल्यास अमोनियम कार्बोनेट स्थिर असतो.
  • या पद्धतीत ४ ते ६ महिन्यात कंपोस्ट खत तयार होते. या खड्यातून ६ टन कंपोस्ट खत मिळतो. या पद्धतीला महत्त्वाचा फायदा असा आहे की यातील घटक खाली वर करण्याची गरज पडत नाही.
  • नॅडेप पद्धत 

  • या पद्धतीत जमिनीवर पक्‍क्‍या विटांच्या साहाय्याने १० फूट लांब, ६ फूट रुंद व ३ फूट उंच अशा आकाराच्या टाकीचे बांधकाम केले जाते. विटांच्या दोन ओळीनंतर तिसऱ्या ओळीत खिडक्‍या ठेवल्या जातात. या पद्धतीमध्ये सुमारे एक ते दीड टन काडी कचरा, १०० किलो शेण, १.५ टन चाळलेली माती भरली जाते.
  • नॅडेप पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर शेणाचा सडा टाकून घ्यावा. त्यानंतर सहा इंच जाडीचा काडी-कचरा थर आणि इतर सेंद्रिय पदार्थांचा थर द्यावा. त्यावर १००० लिटर पाण्यात पाच किलो शेण मिसळून शिंपडावे.
  • यानंतर साधारणतः: एक ते दोन इंच जाडीचा चाळलेला मातीचा थर देऊन परत पाणी शिंपडावे. अशाप्रकारे तीन ते चार महिन्यात उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होते.
  • तयार कंपोस्ट खत

  • उत्तम कुजलेले खत मऊ दिसते.
  • खताचा रंग तपकिरी किंवा गर्द काळा असतो.
  • खतामधून कार्बन-डाय ऑक्साइड निघण्याचे प्रमाण कमी होते.
  • खतातील कार्बन आणि नायट्रोजन यांचे गुणोत्तर २०:१ असते. नत्राचे प्रमाण १ ते १.५ टक्के असते.
  • संपर्क- डॉ.शशीशेखर जावळे, ७५८८१५५४४९ (मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com