खानदेशात उडदाचे एकरी एक क्विंटलपर्यंत उत्पादन

खानदेशात उडदाचे एकरी एक क्विंटलपर्यंत उत्पादन
खानदेशात उडदाचे एकरी एक क्विंटलपर्यंत उत्पादन

जळगाव ः खानदेशातील शेतकऱ्यांसाठी उडदाचे पीक यंदा आतबट्ट्याचे व तोट्याचे ठरले आहे. दरही हमीभावाएवढे नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.  अतिपावसाने काळ्या कसदार जमिनीत पीक पुरते वाया गेले. उशिरा पेरणी केलेल्या हलक्‍या क्षेत्रातील पीक हाती आले, परंतु त्याचा दर्जाही अतिपावसात घसरला. अडीच ते तीन क्विंटल एकरी उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु, उत्पादन एकरी एक क्विंटल जेमतेम आले आहे. खानदेशात सुमारे ५० हजार हेक्‍टरवर उडदाची पेरणी झाली होती. केळी व इतर पिकांसंबंधी बेवड आणि जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढीसंबंधी अनेक शेतकरी या पिकाची पेरणी करतात. तापी, गिरणा, वाघूर, पांझरा, गोमाई नदीकाठी पेरणी बऱ्यापैकी असते. जळगाव जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. कमाल शेतकरी पेरणीसाठी घरी जतन केलेले वाण वापरतात. यंदा अतिपावसाने फवारण्यांची गरज नव्हती. एकदा तणनियंत्रण व दोनदा आंतरमशागत करून पीक जोमात वाढले. रासायनिक खतात अनेकांनी फक्त डीएपी किंवा फक्त सुपर फॉस्फेटची एक बॅग एकरी दिली होती. उडदाला ५७०० रुपये हमीभाव जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दरही बऱ्यापैकी मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु सप्टेंबरमध्ये जळगाव, धुळ्यात अनेक भागांत २८ दिवस सतत पाऊस सुरू होता. त्यामुळे पिकाला फटका बसला. दाणे बारीक पडले. त्यांचा रंग फिकट तपकिरी झाला. बुरशी वाढली. दर्जा घसरल्याने बाजारात दर कमी झाले. सध्या फक्त ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. पीक कापणीसाठी एकरी दीड हजार किमान खर्च आला. मळणीसाठी प्रतिक्विंटल २५० रुपये लागले. वाहतूक, शेतकऱ्याचा मेहनताना व इतर बाबी लक्षात घेतल्यास उडदाचे पीक तोट्याचे ठरले आहे. जेथे काळी कसदार शेती आहे, ते शेतकरी उडदानंतर आता कोरडवाहू ज्वारी, हरभरा पेरणीची तयारी करीत आहेत. पेरणीसंबंधी पूर्वमशागतीचा खर्च करायचा आहे.   

उडदाचे पीक अतिपावसाने नुकसानकारक ठरले. ओला उडीद मळणीसाठी क्विंटलमागे ५०० रुपये खर्च आला. पिकात अतिपावसाने तूटही आली होती. दर ३००० रुपये आहे. अशात आर्थिक तोटा वाढला आहे.  - प्रवीण पाटील, उडीद उत्पादक, खेडी खुर्द (जि. जळगाव)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com