सांगलीत सव्वा लाख टन चाऱ्याची निर्मिती होणार

सांगलीत सव्वा लाख टन चाऱ्याची निर्मिती होणार
सांगलीत सव्वा लाख टन चाऱ्याची निर्मिती होणार

सांगली ः जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत भीषण दुष्काळ असून तेथील पशुधनाला चाराटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाकडून ७२ हजार ५३७ किलो चारा बियाणांचे वाटप कण्यात आले आहे. दोन हजार ३१७ हेक्‍टरवर याची लागवड झाली आहे. यापासून पशुधनासाठी १ लाख १४ हजार ३७६ टन चाऱ्याचे उत्पादन होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठे महांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज, पलूस आणि कडेगाव तालुक्‍यांतील ४८७ गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. या ठिकाणच्या पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 

मार्च ते मे महिन्यात दुष्काळाची तीव्रता आणखी भीषण होण्याची शक्‍यता आहे. याचे गांभीर्य ओळखूनच जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाकडून जिल्ह्यात वैरण विकास प्रकल्प राबविला जात आहे. पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांतील ३ हजार २१३ शेतकऱ्यांना ७२ हजार ५३७ किलो बियाणे आणि ठोंबाचे वाटप केले आहे. त्यासाठी चाळीस लाखांचा निधी खर्च झाला आहे. दोन हजार ३१७ हेक्‍टरवरवर याची लागवड झाली आहे. या क्षेत्रातून पशुधनासाठी एक लाख १४ हजार ३७६ टन चारा उपलब्ध होणार आहे. 

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला चारा शासन विकत घेऊन दुष्काळी भागातील पशुधनासाठी पुरविला जाणार आहे. पाण्याची उपलब्धता असणाऱ्या शेतकऱ्यांनाच चारा बियाणाचे वाटप केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पशुसंवर्धन विभागाबरोबरच कृषी विभागाकडूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारा बियाणांचे वाटप केले आहे. हा चाराही दोन ते तीन महिन्यांत पशुधनासाठी उपलब्ध होण्याची शक्‍यता असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

अनुदानावर बियाणे वाटप  चारानिर्मितीसाठी प्रशासनाने प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांना पाच किलो मका बियाणे आणि २३६ पर्यंत ठोंबाचे शंभर टक्के अनुदानावर वाटप केले जाते आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यातून जास्तीत जास्त चारानिर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com