धनगरवाडी येथे प्रतिकूल वातावरणातही रेशीम शेतीतून उत्पादन

नांदेड : शहरापासून जवळ असलेल्या धनगरवाडी येथे मागील अनेक वर्षांपासून रेशीम शेती केली जाते. शेतीमध्ये अनेक नैसर्गिक संकटे आली. कोरोनामध्ये टाळेबंदी आली. परंतु, येथील शेतकरी यातून ताठपणे उभे राहिले आहेत.
Production from silk farming even in adverse environment at Dhangarwadi
Production from silk farming even in adverse environment at Dhangarwadi

नांदेड : शहरापासून जवळ असलेल्या धनगरवाडी येथे मागील अनेक वर्षांपासून रेशीम शेती केली जाते. शेतीमध्ये अनेक नैसर्गिक संकटे आली. कोरोनामध्ये टाळेबंदी आली. परंतु, येथील शेतकरी यातून ताठपणे उभे राहिले आहेत. सध्या या ठिकाणी साठ एकरांवर शेतकरी तुतीचे उत्पादन घेतात. मागील अनेक वर्षांचा अनुभव असल्यामुळे येथील शेतकरी कोषनिर्मितीमध्ये निष्णात झाले आहेत. सध्या कोशाला दर सहाशे ते सातशे रुपये किलो मिळत आहेत. यामुळे गावांमध्ये प्रतिमहिना ५० लाख रुपये कोषनिर्मितीमधून मिळत आहेत.

नांदेड शहराजवळील धनगरवाडी हे शंभर-सव्वाशे उंबऱ्याचे गाव. या पूर्वी सोयाबीन, ज्वारी, कापूस अशी पारंपरिक पिके घेत होती. परंतु, मागील वीस वर्षांपासून येथील प्रयोगशील शेतकरी हरी पगडे यांनी रेशीम शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी सन २००० कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी सहलीत भाग घेतला. कर्नाटक मधील बंगळूर, म्हैसूर व रामनगर या भागांत रेशीम शेतीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्‍यांचा अनुभव ऐकायला मिळाला. यामुळे पगडे यांनी २००१ मध्ये एक एकरवर रेशीम शेतीची सुरुवात केली. या यातून हमखास उत्पादन मिळत असल्याने अनेक शेतकरी तुती लागवडीकडे वळले आहेत. 

प्रतिशेतकरी एक ते दोन एकर या प्रमाणात तुतीची लागवड करून उत्कृष्ट कोषाचे उत्पादन घेत असल्याने त्यांना भावही चांगला मिळत आहे. तुती लागवडीसाठी शासनाचे अनुदान मिळाले. यातून खर्च वजा जाता इतर पिकाच्या तुलनेत बऱ्‍यापैकी उत्पन्न मिळाल्याने इतर शेतकऱ्‍यांनीही रेशीम शेतीची कास धरली. २०१० नंतर या गावात तब्बल ६० ते ७० शेतकरी रेशीम उत्पादन घेत आहेत. रेशीम उत्पादनात सोबतच गावातच अर्जन पगडे यांनी चॉकी सेंटरही उभारल्यामुळे शेतकऱ्‍यांना अंडकोष आणण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत नाही.

एक एकर रेशीम शेतीपासून शेतकऱ्यांना वर्षाकाठी चार बॅच घेता येतात. त्यातून सरासरी दीडशे ते १८० किलो कोषाचे उत्पादन मिळते. या सरासरी तीस हजार ते पस्तीस हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो. यातून शेतकऱ्यांना खर्च वजा जाता एकरी एक सव्वा लाख ते दीड लाख रुपयांचे उत्पादन हमखास मिळते.

सध्या बाजारात सातशे ते आठशे रुपये किलो दर असल्यामुळे सध्या शेतकऱ्‍यांना अधिकचे पैसे मिळत आहेत. परंतु सरासरी तीस ते पस्तीस हजार रुपये दर मिळाला तरी शेतकऱ्‍यांना इतर पिकांच्या तुलनेत रेशीम शेती पासून चांगले उत्पादन मिळते, असे येथील जाणकार शेतकरी हरी पगडी यांनी सांगितले. येथील पुंडलिक काकडे, अर्जुन काकडे, धारोजी काकडे व सुदाम काळे यासह अनेक शेतकरी नियमितपणे दरवर्षी तुतीची लागवड करतात.

लागवड खर्चात बचत

तुतीची एकदा लागवड केल्यानंतर पुढील दहा ते पंधरा वर्षे रेशीम शेतीतून उत्पादन घेता येते. या मुळे लागवडीसाठी दरवर्षी खर्च करण्याची गरज नाही. यामुळे शेतकऱ्‍यांच्या उत्पादन खर्चामध्ये बचत होते. तुतीचा पाला रेशीम शेतीसह दुभती जनावरांना देता येतो. यामुळे दुधाचे उत्पादन वाढते.

चॉकी सेंटर गावातच

गावात तुती उत्पादकांची संख्या अधीक असल्याने या ठिकाणी अर्जुन पगडे यांनी चॉकी सेंटर उभे केले आहे. दोनशे अंडीपुंज एकरसाठी लागतात. अंडीपासून दोन मोड चॉकी सेंटरवर तयार करून ते शेतकऱ्‍यांना सातशे रुपयांना विक्री केले जाते. चॉकी सेंटर चालविणाऱ्‍यांना वेगळे अनुदान दिले जाते.

शेतकऱ्‍यांना रोजगार देणारी शेती

रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम शेतीमध्ये शासकीय अनुदान मिळते. यात नर्सरी तयार करणे १ लाख ५० हजार, तुती लागवड ५० हजार, शेड उभारणे १ लाख ६८ हजार अनुदान मिळते. यात कुशल व अकुशल अशा कामांचा समावेश होतो. शेतकऱ्‍यांना स्वतःच्या शेतीत काम करून तीन वर्षे रोजगार उपलब्ध करुन देणारी एकमेव शेती रेशीम शेती आहे.

महिन्याकाठी ५० लाखांचे उत्पादन

गावात सर्वाधिक शेतकरी तुतीची लागवड करत आहेत. वर्षातून चार बॅचमधून कोषाचे उत्पादन शेतकरी घेतात. हे कोष बीड, जालना, पूर्णा, रामनगरम आदी ठिकाणी विक्रीसाठी नेले जातात. सध्या या कोषाला प्रति क्विंटल सत्तर ते ऐंशी हजार रुपये दर मिळत आहे. परंतु, सरासरी दर तीस ते पस्तीस हजार रुपये क्विंटल गृहीत धरला जातो. सध्या गावात महिन्याला ५० ते ६० लाख रुपये येत असल्याची माहिती हरी पगडे यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com