शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मिती

अकोला येथील पशुप्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागामध्ये टेस्ट ट्यूब बेबी (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) तंत्राचा वापर करून शेळीमध्ये शरीरबाह्य फलन आणि भ्रूण निर्मितीबाबत यशस्वी संशोधन करण्यात आले.
Production of test tube baby in goat
Production of test tube baby in goat

अकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथील पशुप्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागामध्ये टेस्ट ट्यूब बेबी (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) तंत्राचा वापर करून शेळीमध्ये शरीरबाह्य फलन आणि भ्रूण निर्मितीबाबत यशस्वी संशोधन करण्यात आले. संस्थेच्या प्रक्षेत्रावर नुकताच एका शेळीने तीन करडांना (२ नर व १ मादी) जन्म दिला.

सध्याच्या काळात शेळ्यांची उत्पादकता आणि आनुवंशिकता वेगाने वाढवायची असेल, तर जैविक तंत्रज्ञानाचा वापर हा चांगला पर्याय आहे. या संशोधनाबाबत प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. चैतन्य पावशे यांनी सांगितले, की शरीरबाह्य फलन आणि भ्रूणनिर्मिती प्रयोगासाठी कत्तलखान्यातून शेळ्यांची बिजांडे आणली. त्यातील स्त्रीबीजकोषातून स्त्रीबीजे बाहेर काढली. त्यांना प्रयोगशाळेत योग्य माध्यमात परिपक्व करून फलन माध्यमात शुक्राणू सोबत फळवली गेले. फलन माध्यमात शुक्राणू टाकण्याआधी वीर्यातील नको असलेले घटक काढून त्यावर उपचार केले. योग्य तेच शुक्राणू फलन माध्यमात स्त्रीबीजासोबत सोडण्यात आले. भ्रूण प्रत्यारोपणक्षम होईपर्यंत दोन ते तीन दिवस प्रयोगशाळेत योग्य माध्यमात इन्क्यूबेटरमध्ये ठेवण्यात आले. 

साधारणपणे ६० ते ७२ तासांनंतर ४ ते ८ पेशी असलेले भ्रूण शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपणक्षम भ्रूण दाई शेळीमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. भ्रूणाचा उर्वरित विकास हा दाई शेळी मातेच्या गर्भाशयात करण्यात आला. भ्रूण प्रत्यारोपण करण्यासाठी दाई शेळ्यांची निवड पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरून करण्यात आली. प्रत्यारोपित केलेल्या शेळ्यांची गर्भ तपासणी करण्यात आली. यामध्ये सहापैकी एका शेळीने १४९ दिवसानंतर तीन करडांना (२ नर व १ मादी) जन्म दिला आहे.

शेळ्यांमधील शरीरबाह्य भ्रूणनिर्मिती मानकीकरणाचे संशोधन डॉ. चैतन्य पावशे (विभाग प्रमुख, पशुप्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग) आणि विद्यार्थी करत आहेत. या संशोधन प्रकल्पामध्ये पशुप्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील विद्यार्थी डॉ. मेघा अम्बालकर, डॉ. रुचिका सांगळे तसेच प्राध्यापक डॉ. श्याम देशमुख, डॉ. महेश इंगवले, शस्त्रक्रिया विभागातील डॉ. मिलिंद थोरात, डॉ. रत्नाकर राउळकर, डॉ. महेश पवार, औषधी शास्त्र विभागातील डॉ. सुनील वाघमारे, डॉ. वैजनाथ काळे, प्रमोद पाटील, श्री. राठोड, दत्ता गायकवाड, श्री. डोंगरे तसेच पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शेषराव चव्हाण यांची मदत लाभली. या प्रकल्पाला महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर आणि संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com