कमी भावात केळी देण्यापेक्षा लढवली शक्कल, तयार केले वेफर्स !

कोरोना विषाणू व लॉकडाऊनच्या संकटातच कळंब (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील जानकरवस्तीतील रोहन व अविनाश या पांढरमिसे बंधूंनी संधी ओळखली. आपली एक एकर केळीची बाग व्यापाऱ्यांना कमी दरात देण्यापेक्षा त्यांनी केळीचे वेफर्स तयार करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत सुमारे २०० ते २५० किलोपर्यंत विक्री साधून त्यांनी नुकसानीत जाणारी केळीची शेती चांगल्या प्रकारे सावरली आहे. संकटातही तगून राहण्याचा आत्मविश्‍वास त्यांनी मिळवला आहे.
Production of wafers from bananas during lockdown period
Production of wafers from bananas during lockdown period

कोरोना विषाणू व लॉकडाऊनच्या संकटातच कळंब (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील जानकरवस्तीतील रोहन व अविनाश या पांढरमिसे बंधूंनी संधी ओळखली. आपली एक एकर केळीची बाग व्यापाऱ्यांना कमी दरात देण्यापेक्षा त्यांनी केळीचे वेफर्स तयार करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत सुमारे २०० ते २५० किलोपर्यंत विक्री साधून त्यांनी नुकसानीत जाणारी केळीची शेती चांगल्या प्रकारे सावरली आहे. संकटातही तगून राहण्याचा आत्मविश्‍वास त्यांनी मिळवला आहे. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील कळंब गावानजीकच्या लालपुरी जवळील बाळासो व विठ्ठल या पांढरेमिसे बंधूंची १३ एकर शेती आहे. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक शेती करीत होते. अलीकडे कुटुंबातील बी.ई मॅकेनिकल झालेल्या अविनाश व आयटीआय झालेल्या रोहन या दोघा युवकांनी शेतीची धुरा सांभाळण्यास सुरवात केली. अविनाश हे बारामती येथे नोकरी करतात. रोहन मात्र पूर्णवेळ शेती करतात. गाव परिसरात पाण्याची कमतरता आहे. उपलब्ध पाण्यावर येथील शेतकऱ्यांना वेगवेगळी पिके घेण्याची कसरत करावी लागते. पांढरमिसे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी केळीची लागवड केली होती. मात्र त्यानंतरची काही वर्षे त्यांनी हे पीक घेतले नव्हते. मागील वर्षी मात्र एक एकर क्षेत्रात केळीची लागवड केली. पाणी व एकूणच योग्य व्यवस्थापन केल्यानंतर चांगल्या दर्जाच्या घड तयार झाले. आणि आला लॉकडाऊन खरे तर यंदाच्या फेब्रुवारीपासून केळीची विक्री पांढरमिसे यांनी सुरू केली होती. त्यावेळी किलोला साधारण ८ ते १० रुपये दर सुरू होता. साधारण चार टनांची विक्री झाली. दरम्यान कोरोना विषाणूच्या संकटामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. केळीची विक्री अडचणीत आली. याचा व्यापाऱ्यांनी फायदा घेण्यास सुरवात केली. दोन ते तीन रुपये प्रति किलो दराने त्यांनी शेतकऱ्यांची केळी खरेदी करण्यास सुरवात केली. पांढरमिसे यांच्याबाबतही असेच घडले. जिवापाड कष्ट करून पिकवलेली केळी कवडीमोल दराने देण्यापेक्षा ती वाटून टाकलेली बरी असे दोघा बंधूंना वाटले. त्यानुसार काही घड आपल्या परिचितांना वाटले. तर काही घड शेळ्यांना खाऊ घातले. रोहन म्हणाले की याच दरम्यान आमच्या मावशीने केळीचे काही कच्चे घड वेफर्स तयार करण्यासाठी नेले. नेमकी हीच घटना आमच्या डोक्यातही एक कल्पना देऊन गेली. आणि सुरू झाली वेफर्सची निर्मिती

  • दोन ते तीन रुपये दराने केळी देण्यापेक्षा आपणही त्यापासून वेफर्स बनविले तर? असा विचार मनात येताच त्या दिशेने आखणी सुरू झाली. ग्रामीण भागासह शहरामध्येही केळीच्या वेफर्सला चांगली मागणी असते. हीच संधी होती बागेचे पैसे करायचे. मग सगळे कुटुंब कामाला लागले.
  • केळीची साल काढून चकत्या बनविण्यामध्ये दोघा बंधूंना घरातील बच्चे कंपनीने मदत केली. रोहन यांची आई लक्ष्मी चकत्या तळण्याचे काम करू लागल्या. यू ट्यूब चॅनेलचा आधार घेऊन रोहन यांनी वेफर्स अधिक रूचकर, चविष्ट करण्याचा प्रयत्न केला.
  • सध्या बाजारात केळीचे वेफर्स १५० ते २०० रुपये प्रति किलो दराने विकत मिळतात. मात्र पांढरमिसे यांनी शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री सुरू करीत सुरुवातीला किलोला १२० रुपये व आता १५० रुपये दराने ताज्या केळीचे वेफर्स विकण्यास सुरुवात केली आहे. त्याची जाहिरात सोशल मिडीयावर केल्याने आजूबाजूच्या गावांतील नागरिक खरेदीसाठी थेट घरी येऊ लागले.
  • दररोज होतेय विक्री

  • सध्या दररोज सुमारे १२ किलो वेफर्सची विक्री होत आहे. आत्तापर्यंत एकूण २०० ते २५० किलोपर्यंतची विक्री झाली आहे. एकूण उत्पन्न ५० ते ६० हजार रुपयांच्या वर गेले आहे. एक किलो वेफर्स तयार करण्यासाठी सुमारे तीन किलो केळी लागतात. नुसती केळी विकली असती तर ३ रुपये प्रति किलो दराने त्याचे ३० रुपये मिळाले असते.
  • मूल्यवर्धन केल्याने त्याचे १४० रुपये हाती येत आहेत. यातून तेल, मजुरी व अन्य खर्च वजा केल्यास ५० टक्के नफा मिळत आहे. शिवाय संकटाच्या काळात दोन मजुरांना रोजगारही दिल्याचे रोहन यांनी सांगितले. वेफर्ससह ग्राहकांना घडांची विक्री देखील होत असल्याने उत्पन्नाचा स्रोत कायम सुरू राहिला आहे. सध्या घरगुती पद्धतीने वेफर्स तयार करण्यासाठी वेळ लागत असल्याने यंत्राद्वारे निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी यंत्राचे बुकिंग देखील केले आहे.
  • शेतीबरोबर पोल्ट्रीचाही आधार

  • शेतीबरोबर पांढरमिसे कुटुंब पोल्ट्रीची करार शेती करीत आहेत. सुमारे २३०० ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन त्यांच्याद्वारे होत आहे. कोरोनाचा फटका पोल्ट्रीलाही बसला. चिकन खाल्यामुळे कोरोना पसरत असल्याची अफवा पसरली होती. आता मात्र स्थिती सुधारू लागली आहे.
  • पुढील दोन आठवड्यांमध्ये संबंधित कंपनीला कोंबड्यांची विक्री होणार आहे. त्यावेळी किलोला सहा ते सात रुपये नफा अपेक्षित असल्याचे रोहन यांचे म्हणणे आहे. संकटात पोल्ट्रीचा मोठा आधार असेल असे ते म्हणतात.
  • संपर्क- रोहन पांढरमिसे- ९९७०३६५९३५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com