औरंगाबाद जिल्ह्यात तूर खरेदीत निश्‍चित उत्पादकतेचा खोडा

तुरीचे पीक बऱ्यापैकी आले आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड शेतकरी करीत आहेत. तरीही हेक्‍टरी केवळ ५ क्‍विंटल ४५ किलो तुरीचे उत्पादन निश्‍चित केल्याने कोंडी झाली आहे. - ईश्‍वर सपकाळ, शेतकरी, तिडका (ता. सोयगाव जि. औरंगाबाद) सलग तुरीत एकरी ८ ते १२ क्‍विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन होते. मग हेक्‍टरी ५ क्‍विंटल ४५ किलो उत्पादन खरेदीसाठी निश्‍चित करणे योग्य नाही. शासनाने व संबंधित यंत्रणेने याचा फेरविचार करून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी. - बळिराम होटकर, शेतकरी, विहामांडवा, ता. पैठण.
productivity loss in Tour purchases in Aurangabad district
productivity loss in Tour purchases in Aurangabad district

औरंगाबाद  : हमीभावाने तूर खरेदीत ऑनलाइन पीकपेऱ्याची अडचण आहे. तो मिळण्याची संथगती कायम आहे. यातच आता तूर खरेदीसाठी जिल्ह्यात हेक्‍टरी ५ क्‍विंटल ४५ किलो या प्रमाणात पेरा आवश्‍यक केला आहे. त्यानुसार तूर खरेदी निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात आंतरपीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. फार मोजके शेतकरी तुरीची सलग पेरणी वा लागवड करतात. साधारणत: कपाशीतच तुरीचे आंतरपीक घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. सलग पीक नसल्याने तुरीचा पिकपेरा शेतात पिक असूनही मिळण्यात अडचण येते. जिल्ह्यात खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनचे ६, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे २ व शेतकरी उत्पादक  कंपन्यांचे ६ खरेदी केंद्रे निश्‍चित केली आहेत. या केंद्रांवरून तूर खरेदीसाठी नोंदणीची प्रक्रिया व १ फेब्रुवारीपासून काही ठिकाणी खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

यंदा ऑक्‍टोबरमधील अतिवृष्टीने खरिपाची सर्वच पिके हातची गेली. केवळ तुरीच्या पिकाकडूनच शेतकऱ्यांना आशा होती. बऱ्यापैकी तुरीचे पीकही आल्याचे चित्र आहे. तुरीचा हमी दर ५ हजार ८०० रुपये  प्रतिक्‍विंटल आहे. बाजारात मात्र त्यापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत आहे. त्यावरून तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी असल्याचे स्पष्ट होते. शिवाय  कपाशीच्या आंतरपिकात हेक्‍टरी ८ ते १२ क्‍विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन होत आहे. तरीही शासनाने तूर खरेदीसाठी निश्‍चित केलेली हेक्‍टरी उत्पादकता नोंदणी शेतकऱ्यांना अडचणीची ठरणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे खरेदीसाठी तुरीच्या निश्‍चित उत्पादकतेविषयी फेरविचार करण्याची गरज आहे.

मार्केटिंग फेडरेशनतंर्गत  गंगापूर, खुलताबाद व औरंगाबाद या केंद्रावर तूर खरेदीसाठी प्रतिसाद मिळत आहे. गंगापूरच्या केंद्रावर ३७७, खुलताबाद येथे २१ तर, औरंगाबाद येथील केंद्रावर ९३  शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. वैजापूर व कन्नड येथे नोंदणी झाली नाही. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनतंर्गत पैठणच्या केंद्रावर ७४५ तर, लासूर स्टेशन येथील केंद्रावर २२६, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहा केंद्रावर ५४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com