छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त आज वढूत कार्यक्रम

 छत्रपती  संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त आज वढूत कार्यक्रम
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त आज वढूत कार्यक्रम

पुणे ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३० व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. ५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मूक पदयात्रा, शासकीय पूजा, शासकीय सलामी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, पुरस्कार वितरण, पालखी सोहळा आदी विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. वढू ग्रामपंचायत, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी साडेपाचला छत्रपती शंभूराजे बलिदान स्मरणासाठी मूक पदयात्रा, सहा वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, कवी कलश, वीर शिवले समाधीला महाअभिषेक, ७ वाजता मूक पदयात्रा, साडेआठ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा, साडेनऊ ते साडेअकरा मोरे महाराज देहूकर यांची शंभूराजे पुण्यस्मरण कीर्तन सेवा, साडेअकरा वाजता समाधीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, दुपारी १२ वाजता गृह विभागाकडून शासकीय मानवंदना, त्यानंतर सभा व पुरस्कार कार्यक्रम, तसेच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील कलाकारांचा सन्मान होणार आहे. 

दुपारी दीड वाजता शिवकालीन पोवाडा कार्यक्रम, पुरंदर ते वढू पालखीचे स्वागत व त्यानंतर महाप्रसाद होईल. केईएम रुग्णालय व शंभूराजे युवा मंचच्या वतीने सकाळपासून रक्तदान शिबिरही होणार आहे. या वर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या शंभू भक्तांसाठी आवश्‍यक सुविधांचा तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनीही वढू येथे भेट देऊन आढावा घेतला आहे. 

दरम्यान, यानिमित्त धर्मवीर बलिदान गीताचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे ऐतिहासिक नाटक होईल, अशी माहिती सरपंच रेखा शिवले यांनी दिली. तर दरम्यान या उत्सवाच्या निमित्ताने कायदा सुवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक डॉ. सुहास वारके, जिल्हा अधीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी समाधी स्थळी भेट देऊन पाहणी केली.

अभिनंदन वर्धमान यांचा गौरव   या वर्षी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना धर्मवीर छत्रपती पुरस्कार, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना शंभू छत्रपती मृत्युंजय पुरस्कार, नवी मुंबई येथील धर्मवीर शंभूराजे उत्सव मंडळास शंभूभक्त अशोक भंडलकर शंभू सेवा पुरस्कार, तर पुणे येथील श्रीरंग कला दर्पण यांना शंभूभक्त डी. डी. भंडारे शंभू सेवा पुरस्कार, तसेच तुळापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले यांना शंभूभक्त गेणू गणपती शिवले शंभू सेवा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com