रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध

रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध

सांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्ह्यातील दूध संकलन सोमवारी (ता. १६) शंभर टक्के बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सुमारे बारा लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प झाले. गावोगावी दूध संकलन केंद्र बंद ठेवून आंदोलना पाठिंबा दिला. तर विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या विरोधात निषेध केला. जिल्ह्यात आंदोलन शांततेच्या व सहकार्याच्या मार्गाने सुरू झाले. दरम्यान, जिल्ह्यातून सहा दुधाचे टॅंकर पोलिस बंदोबस्तात जाण्याची शक्‍यता असल्याची माहिती शासकीय डेअरी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

जिल्ह्यात खासगी आणि सहकारी असे एकूण २४ दूध संघ आहेत. दररोज सुमारे १३ लाख लिटर दुधाचे संकलन होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये वाढवून मिळावे, यासाठी सोमवार (ता. १६) पासून दूध दराचे आंदोलन हाती घेतले आहे. वाळवा तालुक्‍यात दुधाचा टॅंकर अडवून दूध रस्त्यावर ओतून रविवारी (ता. १५) पासूनच दूध दराचे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील राजारामबापू, हुतात्मा, वारणा, सोनहिरा, मोहनराव शिंदे, डोंगराई अशा सर्वच दूध संघांनी पाठिंबा देत दूध संकलन बंद ठेवले. सकाळच्या टप्प्यात डेअरी उघड्या नव्हत्या. चिलिंग प्लॅंटच्या वाहनांना रोखून दूध रस्त्यावर ओतले जात असल्याने त्यांना संकलन शंभर टक्के बंद ठेवले. तर समडोळी (ता. मिरज) येथे मारुतीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरवात केली.

दरम्यान, महामार्ग, जिल्ह्यातील संवेदनशील गावातील मुख्य चौकात मोठा पाेलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातून सहा दूधाचे टॅंकर सायंकाळी पोलिस बंदोबस्तात मुंबईला रवाना होण्याची शक्‍यता असल्याची माहिती शासकीय डेअरी विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात आंदोलन शांततेच्या व सहकार्याच्या मार्गाने सुरू झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, महेश खराडे, किसान सभेचे उमेश देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी जागोजागी पाहणी करून लोकांना सूचना दिल्या. जिल्हा पोलिसांनी धरपकड सुरू केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com