रासायनिक शेतीपद्धतीत आता बदल आवश्यक

रासायनिक शेतीपद्धतीत आता बदल आवश्यक
रासायनिक शेतीपद्धतीत आता बदल आवश्यक

रोम : हरितक्रांतीच्या वेळी सुरू झालेली रासायनिक शेतीपद्धती आजच्या काळातही सुरूच आहे. रसायनांच्या अनियंत्रित वापराने आज पर्यावरण व जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. जागतिक अन्नसुरक्षा व पोषण या बाबी टिकवायच्या असतील व पर्यायाने ग्रामीण जीवनमान उंचावायचे असेल, तर या रासायनिक शेतीत बदल करणे व जैवविविधता टिकवणे अत्यंत महत्त्वाचे झाले अाहे, असे प्रतिपादन अन्न आणि कृषी संघटनेचे (एफएअो) महासंचालक जोस ग्रॅझीनो दा सिल्व्हा यांनी येथे केले.   कृषीविषयक धोरणे आणि शेतीपद्धती या विषयांवर अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद झाला.आरोग्यदायी, पौिष्टक अन्ननिर्मितीचे महत्त्व हा मुद्दा या परिसंवाद चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. या वेळी आपले विचार व्यक्त करताना अन्न आणि कृषी संघटनेचे (एफएअो) महासंचालक जोस ग्रॅझीनो दा सिल्व्हा म्हणाले, की सुमारे ५० वर्षांपूर्वी हरितक्रांतीचे युग होते. त्या वेळची गरज म्हणून रासायनिक शेतीचे सिद्धांत वापरून शेती केली जायची. आज काळ बदलला आहे. मात्र, रासायनिक शेती मात्र त्यानुसार बदललेली नाही. या शेतीत रसायनांचा अनियंत्रित वापर होत असल्याने जैवविविधता व पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अन्नसुरक्षेला त्याचा मोठा धोका जाणवत आहे.

जैवविविधता टिकवणे गरजेचे   जागतिक अन्नसुरक्षा टिकवायची असेल, तर जैवविविधतेचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण जनतेचे योग्य पोषण होण्याबरोबर त्यांचे जीवनमानही उंचावण्याची गरज आहे, असे मतही जोस ग्रॅझीनो दा सिल्व्हा यांनी या वेळी व्यक्त केले. पृथ्वीवरील विविध सजीवांच्या प्रजाती, परिसंस्था (इकोसिस्टीम) सध्या धोक्यात आल्या आहेत. भात, मका, गहू हीच तीन मुख्य अन्नपिके, तर गायी-म्हशी, वराह व कोंबड्या हाच जगभरातील अन्नऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. अन्नसुरक्षेला बळकटी देण्यासाठी अन्नाचे स्त्रोत व्यापक करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यात अतिउष्ण, तसेच अतिशुष्क वातावरणाला सहनशील वनस्पतींचा वापर पुढे यायला हवा. त्याचबरोबर बदलत्या वातावरणीय परिस्थितीत पशुधनाचेही विस्तारीकरण आवश्यक झाले आहे, असेही एफएअोच्या महासंचालकांनी बोलून दाखवले. 

शेतीपद्धतीत बदल हीच उत्पादनाची ग्वाही  हवामानबदलाचे शेतीवर जाणवणारे परिणाम, वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने आहारशैलीत बदल या आजच्या महत्त्वाच्या समस्या झाल्या आहेत. जैवविविधतेचे संरक्षण करणाऱ्या शेती उत्पादन पद्धतीच शाश्वत अन्न उत्पादनाची ग्वाही देऊ शकतील. जैविविधता टिकवण्यासाठी शेती, मत्स्यपालन व वनशेती यांचे यशस्वी व्यवस्थापन उलगडून दाखवणाऱ्या उदाहरणांचा या वेळी ऊहापोह करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com