गाभण जनावराची योग्य देखभाल महत्त्वाची

गाभण जनावराची योग्य देखभाल महत्त्वाची
गाभण जनावराची योग्य देखभाल महत्त्वाची

जनावरांच्या व्यवस्थापनात गाभण जनावरांची योग्य निगा आणि देखभाल हे जन्माला येणाऱ्या वासरांच्या दृष्टीने, गायी-म्हशींच्या पुढच्या वेतात दूध उत्पादनाच्या दृष्टीने, तसेच दूध व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. गाभण जनावरांच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनातील काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याकडे पशुपालकांनी लक्ष द्यावे.  साधारणतः गायीचा गर्भकाल हा २८२ दिवसांचा असतो. गाईच्या अगोदर व्यालेल्या व कृत्रिम रेतन केलेल्या तारखांच्या नोंदी केलेल्या असाव्यात व गाईची व्यायची अपेक्षित तारीख नोंद करून ठेवावी.

गाभण गायीची काळजी -

  • गोठ्यातील जमिनीचा पृष्ठभाग खडबडीत असावा, जेणेकरून गायी घसरून पडणार नाहीत.
  • शक्यतो गाभण जनावरे इतर जनावरांपासून वेगळी बाजूला बांधावीत.
  • गाभण गाई, म्हशींना डोंगराळ भागात चरायला नेणे टाळावे.
  • गाभण गायीला संतुलित आहार द्यावा. शेवटचे तीन महिने गायीच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन ठेवावे. गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाचे वजन पहिल्या सहा महिन्यांच्या साधारणपणे दुप्पट वाढते, म्हणून शेवटचे तीन महिने गाभण जनावर आणि गर्भ या दोघांच्याही दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे गायीला हिरव्या चाऱ्यासोबतच खुराकही द्यावा. आहारात खनिज मिश्रणाचा उपयोग करावा. स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. त्यामुळे निरोगी वासरू जन्माला येते.
  • ​व्यालेल्या गायीची काळजी -

  • गाभण काळ पूर्ण झालेल्या, व्यायला आलेल्या जनावरात कास व निरण सुजते. जनावरे वेगवेगळ्या गोठ्यात बांधावीत जेथे स्वच्छ हवा, भरपूर प्रकाश आणि जमीन स्वच्छ केलेली असावी.
  • गाभणकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रसूतीच्या टप्प्यात गाई, म्हशींवर सातत्याने लक्ष ठेवावे.
  • विण्याच्या या सर्व लक्षणांवर लक्ष ठेवावे. प्रसूती वेदनांमुळे पहिल्या टप्प्यात गाई, म्हशींची ऊठ-बस वाढते, खूप बेचैन होते.
  • गाई, म्हशी विण्याचे तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात गर्भाशयाचे मुख उघडते आणि विस्तारते. दुसऱ्या टप्प्यात वासरू बाहेर येते आणि तिसऱ्या टप्प्यात वासराचे आवरण व पटले बाहेर येतात.
  • सशक्त गाई आपोआप वितात; पण काही जनावरे अशक्त असल्यामुळे त्यांना विताना मदतीची आवश्यकता असते. अशा गायींची विशेष काळजी घ्यावी लागते.
  • पहिल्यांदा वासराने पाय निरनातून बाहेर येतात. नंतर नाक दिसते व डोके बाहेर येते.
  • अनेक वेळा वासराची गर्भाशयातील नैसर्गिक अवस्था (तोंड व पुढील पाय निरनाकडे) बदलते तेव्हा गायी अडतात व कळा देतात त्या वेळेस तत्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलवावे.
  • गायी व्याल्यानंतर गायींच्या निरणाचा\ बाहेरील भाग शेपटी व मागच्या पायांच्या शेपटीच्या जवळील भागाकडे पोटॅशअम परमॅंगनेटच्या कोमट पाण्याने किंवा कडुलिंबाचा पाला टाकून उकळलेल्या पाण्याने धुऊन घ्यावा.
  • गाय व्याल्यास तिला थंडीपासून बचाव करण्यासाठी थोडा वेळ उन्हात बांधावे व पिण्यास पाणी द्यावे.
  • गाय व्याल्यानंतर लगेचच धार काढावी व वासराला पाजावे.
  • गायीचा जार साधारणत: दोन ते चार तासांत पडतो, हा जार जर बारा (१२) तासांपर्यंत पडला नाही, तर लगेचच पशुवैद्यकाच्या मदतीने जार काढावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा जार जर जनावरांनी खाल्ला तर दुधाळ जनावरांत दूध कमी होते.
  • गायी व्यायल्यानंतर कासदाह व दूध ज्वर हे सर्वसाधारण होणारे रोग आहेत. त्या दृष्टीने पशुपालकांनी जागरूक असावे व वेळीच उपचार करून घ्यावेत.
  • व्यालेल्या गायीस भिजलेला भुसा व थोडी पेंड द्यावी पेंडीचे प्रमाण शरिराच्या पोषणसाठी प्रति दिवशी १ किलो किंवा प्रति २ लिटर दुधास ५०० ग्रॅम प्रमाणे खुराक द्यावा.
  • वासराची काळजी -

  • वासरू जन्मल्यानंतर तत्काळ त्याच्या नाकातील व तोंडातील चिकट द्रव काढावा व श्‍वसनक्रिया सुरळीत होण्यासाठी त्याच्या छातीवर हाताने ८ ते १० वेळा दाबून सोडावे, ज्यामुळे श्‍वसनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.
  • वासरू कमजोर असल्यास त्याला उभे राहण्यास आणि दूध पिण्यास मदत करावी.
  • श्‍वसन चालू झाल्यास वासराला गाईसमोर चाटण्यासाठी ठेवावे, त्यामुळे वासराच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. गाय जर वासराला चाटत नसेल, तर वासराला पोत्याने घासून स्वच्छ करावे.
  • वासराची नाळ गरम पाण्याने धुऊन शरीरापासून २.५ सेंमी अंतरावर कापावी. त्या ठिकाणी आयोडीन लावावे. जेणेकरून नाळेला जंतुसंसर्ग होणार नाही.
  • जन्मल्यानंतर कमीत कमी एक तासात वासरास गायीचे पहिले दूध पाजावे. या दुधामुळे जन्मतः वासराच्या आतड्यात असलेली विष्ठा बाहेर टाकण्यास मदत होते व वासराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • पहिल्या दुधामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटक मुबलक प्रमाणात असतात.
  • गायीचे पहिले दूध वासरास त्याच्या वजनाच्या १/१० म्हणजे १० टक्के द्यावे (२ ते २.५ लिटर रोज) व कमीत कमी पहिले पाच दिवस द्यावे. हे दूध दिल्याने वासरास कसल्याही प्रकारची हगवण लागत नाही.
  • व्यापारी तत्त्वावर चालणाऱ्या फार्मवर गाईचे दूध पाच दिवसांत द्यावे व नंतर मिल्क रिप्लेसर चालू करावे. वासरू १५ दिवसांचे झाल्यावर त्याला नंबर द्यावा. शिंगांचे डी होर्निंग करून घ्यावे. वासरू ३ महिन्यांचे झाल्यावर त्यास नंबर द्यावा. वासाराला ॲन्थ्रॅक्स व फऱ्या रोगाचे लसीकरण करावे. लसीकरणापूर्वी जंतनाशकाची मात्रा द्यावी.
  • लहान वासरे फुफ्फुस दाह रोगाला बळी पडतात. याशिवाय लहान वासरांमध्ये जंत आणि इतर परोपजीवी कीटकांचा (उदा. गोचीड) प्रादुर्भाव दिसून येतो. या वर उपाययोजना म्हणून वासरांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची मात्रा द्यावी. गोचिडासारख्या परोपजीवी कीटकांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.
  • वासरातील विविध रोगाच्या प्रतिबंधासाठी वासरांचा थंडी व वाऱ्यापासून बचाव करावा, गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी. वासरांची वेगळ्या गोठ्यात व्यवस्था करावी. गोठ्यामध्ये ओलावा किंवा दमटपणा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • संपर्क : डॉ. यादव, ७६६६८०८०६६ (मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com