नगर जिल्ह्यात निवडणूक रिंगणातील बहुतांश नेते कोट्यधीश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अधिकृत पक्षांचे जवळपास सर्वच उमेदवार कोट्यधीश आहेत. एखादा अपवाद वगळला तर बहुतांश उमेदवारांचा व्यवसाय शेती आहे. निवडणूक नामनिर्देशन पत्र भरताना दिलेल्या शपथपत्रात उमेदवारांनी मालमत्ता नमूद केल्याने हे स्पष्ट झाले.    

जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघांतून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार, शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, संग्राम जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार शंकरराव गडाख, आशुतोष काळे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. श्रीरामपूरचे भाऊसाहेब कांबळे यांच्याकडे सुमारे १३ लाख ८९ हजार ७२ रुपयांची जंगम; तर दोन कोटी ३२ लाख १७ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. येथून काँग्रेसकडून लढत असलेले लहू कानडे यांच्याकडे ५९ लाख ७८ हजार ७२३ रुपयांची जंगम; तर चार कोटी ८९ लाख ८० हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे तीन कोटी २५ लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

संगमनेरचे शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्याकडे ११ कोटी १६ लाख ६५ हजार ९१३ रुपयांची मालमत्ता आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे आठ कोटींची मालमत्ता आहे. अपक्ष अर्ज भरलेल्या काँग्रेस नेत्या अनुराधा नागवडे व त्यांचे पती राजेंद्र यांच्याकडे सहा कोटी १० लाख रुपयांची संपत्ती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार घनश्‍याम शेलार व त्यांच्या पत्नीकडील जंगम मालमत्ता ३४ लाखांच्या घरात आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे पावणेनऊ कोटींची मालमत्ता आहे. कोपरगावमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्याकडे ११ कोटी ८२ लाख १७३ रुपये जंगम; तसेच २ कोटी ९४ लाख ८८ हजार ९०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

अपक्ष उमेदवार राजेश परजणे पावणेतीन कोटींचे मालक आहेत. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याकडे पावणेचार कोटी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील दाम्पत्याकडे २४ कोटी ७८ लाख २६ हजार २७९ रुपयांची मालमत्ता आहे. त्यात विखे पाटील यांच्याकडे १७ कोटी ८४ लाख ५२ हजार ७२० रुपयांची, तर शालिनी विखे पाटील यांच्याकडे सहा कोटी ९३ लाख ७३ हजार ५५९ रुपयांची एकूण मालमत्ता आहे. शिर्डीतील काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांच्याकडे ७९ लाख ३८ हजार ५९१ रुपयांची जंगम, तर १० कोटी ८ लाख ५१ हजार ५०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. राहुरीतील राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे जंगम व स्थावर मालमत्ता सहा कोटी ९१ लाख ५२ हजार ७०२ रुपयांची; तर आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे पंचवीस कोटींची मालमत्ता आहे.  

कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजप उमेदवार राम शिंदे दाम्पत्याकडे एकूण दोन कोटी ४२ लाख १५ हजार ९२७ रुपयांची मालमत्ता आहे. रोहित पवार यांच्याकडेही कोट्यवधींची मालमत्ता आहे. वैभव पिचड यांच्याकडे पाच कोटी ८३ लाख ७५ हजार रुपये; तर पत्नी पूनम पिचड यांच्याकडे ९५ लाख रुपयांची संपत्ती आहे. नगरमधील अनिल राठोड साडेतीन कोटींचे मालक असून संग्राम जगताप यांच्याकडे सव्वानऊ कोटींची मालमत्ता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com