अंजिराच्या कॅलिफोर्निया गोल्डन, मिशन वाणांसाठी प्रस्ताव

अंजिराच्या कॅलिफोर्निया गोल्डन, मिशन वाणांसाठी प्रस्ताव
अंजिराच्या कॅलिफोर्निया गोल्डन, मिशन वाणांसाठी प्रस्ताव

पुणे : कमी टिकवण क्षमता आणि टोटल सोल्युबल शुगरच्या (टीएसएस) कमी प्रमाणामुळे अंजीर फळाच्या मूल्यवर्धनात अडचणी येत आहेत. हे लक्षात घेत सुक्या अंजिरासाठी जगप्रसिद्ध, चांगली टिकवणक्षमता असलेल्या कॅलिफोर्निया गोल्डन आणि कॅलिफोर्निया मिशन या दोन जाती भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिताचा प्रस्ताव केंद्र सरकारने कॅलिफोर्निया येथील युसी डेव्हीस विद्यापीठाला पाठविण्यात आला आहे.  या जातींच्या आयातीसाठी तरुण अंजीर उत्पादकांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय कोरडवाहू फलोत्पादन संस्थेने पाठबळ दिले. याबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य अंजीर उत्पादक संघाचे सदस्य रोहन उरसळ म्हणाले की, राज्यात सासवड, पुरंदर मध्ये मोठ्या प्रमाणावर अंजीर लागवड आहे. मात्र दिवसेंदिवस हवामानातील बदल, अवेळी पाऊस यामुळे अंजीर फळबाग धोक्यात येत आहे. महाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या अंजीर जातींचा टिकवण क्षमतेचा अत्पल्प कालावधी आणि कमी साखरेचे प्रमाण लक्षात घेता प्रक्रिया करून सुके अंजीर करण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे अलीकडे काही शेतकरी अंजीर बागा तोडून डाळिंब तसेच इतर पिकांकडे वळले आहे. यामुळे अंजिराचे क्षेत्र कमी होत आहे. बाजारपेठेत ताजी अंजीर फळे आणि प्रक्रियेला असलेली संधी लक्षात घेऊन चांगली टिकवण क्षमता असलेल्या जातींची लागवड होणे आवश्यक आहे. नवीन जातींच्या आयातीबाबत रोहन उरसळ म्हणाले की, कॅलिफोर्निया गोल्डन ही जात प्रक्रियेसाठी उपयुक्त आहे. कॅलिफोर्निया मिशन ही जात खाण्यासाठी चांगली असून याची टिकवणक्षमता २२ ते २५ दिवसांची आहे. नवीन जातींच्या आयातीसंदर्भात काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन अंजीर बागांच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी तातडीने भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांच्याशी संपर्क साधून मला चर्चेसाठी जाण्यास सांगितले. त्यानुसार आॅक्टोबर महिन्यात डॉ. महापात्रा यांची भेट घेऊन अंजीर फळबागांची सद्यस्थिती आणि भविष्यातील अडचणींची माहिती दिली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बिकानेर येथील केंद्रीय कोरडवाहू फलोत्पादन संस्थेचे संचालक डॉ. पी. एल. सरोज आणि केंद्रीय कृषी खात्यातील फलोद्यान आयुक्त डॉ. बी. एन. एस. मूर्ती यांच्याशी चर्चा झाली. अंजीर संघाचे तज्ज्ञ प्रकाश कुलकर्णी यांनीदेखील मोलाचे मार्गदर्शन केले. बिकानेर येथील राष्ट्रीय परिसंवादात मला सादरीकरणाची संधी मिळाली. या वेळी झालेल्या चर्चेमध्ये कॅलिफोर्निया गोल्डन आणि कॅलिफोर्निया मिशन या दोन जाती भारतात आयात करण्याबाबत चर्चा झाली. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. अंजिराचे घटते क्षेत्र टिकविण्याचे आव्हान  हवामान बदल, कमी टिकवण क्षमतेमुळे अंजिराची बाजारपेठ शेतकऱ्यांना साधता येत नाही. अंजिराची साठवणूक करू शकत नसल्याने बाजारात अचानक वाढलेल्या आवकेमुळेदेखील दर मिळत नाही. यामुळे शेतकरी अंजिराच्या बागा तोडून डाळिंब आणि इतर फळपिकांकडे वळत आहेत. दुसऱ्या बाजूला डाळिंबाचे क्षेत्र आणि उत्पादनात वाढ होऊन दर तुलनेने कमी मिळत आहेत. यामुळे अंजिराचे कमी होणारे आणि डाळिंबाचे वाढणाऱ्या क्षेत्रामुळे दोन्ही फळांचे बाजारपेठेतील संतुलन राखण्यासाठी अंजिराच्या टिकाऊ जाती विकसित होण्याची गरज आहे.   सुक्या अंजिराची ६५० कोटींची उलाढाल  भारतात सुक्या अंजिरासाठी लागणाऱ्या जाती उपलब्ध नसल्याने प्रामुख्याने अफगाणिस्तान, टर्की आणि कॅलिफोर्नियामधून सुक्या अंजिराची आयात आपल्याकडे होते. या अंजिराची उलाढाल सुमारे ६५० कोटींची असून, दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात सुक्या अंजिरासाठी उपयुक्त जाती उपलब्ध झाल्यास भारतीय बाजारपेठेच्याबरोबरीने निर्यातीला संधी उपलब्ध होतील, असे अभ्याससकांचे म्हणणे आहे.  दृष्टिक्षेपात अंजीर

  • अंजीर उत्पादक प्रमुख राज्ये : महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेश
  • महाराष्ट्रातील क्षेत्र    :    सुमारे ३ हजार हेक्टर
  • कर्नाटकातील क्षेत्र    :  सुमारे २ हजार ४०० हेक्टर
  • पुणे जिल्ह्यातील क्षेत्र  :  सुमारे १८०० हेक्टर
  • पुरंदर तालुक्याचे क्षेत्र  : सुमारे ७०० हेक्टर 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com