नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
अॅग्रो विशेष
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला
विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली आहे. केंद्र सरकारकडून समिती स्थापन करून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारल्याची माहिती समोर येत आहे.
नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली आहे. आंदोलक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, राज्यमंत्री सोम प्रकाश, पंजाबचे खासदार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विज्ञान भवनात झालेली बैठक झाली. केंद्र सरकारकडून समिती स्थापन करून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारल्याची माहिती समोर येत आहे.
बैठकीनंतर केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणाले, ‘‘बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कोणताही निर्णय झाला नाही. गुरुवारी (ता. ३) रोजी पुन्हा बैठक होईल. समिती स्थापण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना मान्य नाही. आंदोलन मागे घ्यावे, अशी सरकारची विनंती आहे.’’
देशभरातील सुमारे ३३ शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. ही चर्चा दोन तासांहून अधिक चालली. या बैठकीत केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र शेतकरी संघटनांनी तीनही कायदे रद्द करण्याची मागणी केली. शेतकरी संघटनांनी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.
भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) रूपसिंह सिन्हा पीटीआयशी बोलताना म्हणाले, ‘‘केंद्राचा समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी फेटाळली आहे. बैठक संपताच आमची भूमिका जाहीर करू.’’
अहंकाराच्या खुर्चीतून खाली उतरा : राहुल गांधी
‘‘अन्नदाता शेतकरी रस्त्यांवरून, मैदानावरून धरणे आंदोलन करीत आहेत आणि टीव्हीवरून खोटे भाषण देत आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे आपल्या सर्वांवर कर्ज आहे. त्यांना न्याय आणि हक्क दिल्यानंतरच हे कर्ज उतरणार आहे. त्यांच्यावर लाठीमार करून, अश्रुधुराची नळकांडी फोडून त्यांचे कर्ज उतरणार नाही. जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीतून खाली उतरून विचार करा, शेतकऱ्यांना अधिकार द्या,’’ अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून केली आहे.
शेतकऱ्यांचे मत ऐका : मुख्यमंत्री पी. विजयन
तिरुअनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पी.. विजयन यांनी एक ट्विट करून दिल्लीत निदर्शने करीत असलेल्या शेतकऱ्यांचे मत ऐका, त्यांचे प्रश्न सहानुभूतिपूर्वक सोडवा, अशी विनंती केली आहे. शेतकऱ्यांचे देशासाठी मोठे योगदान आहे, आता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची वेळ आली आहे. या प्रश्नावर संपूर्ण देशाने एक होण्याची गरज आहे. केंद्र सरकारने त्यांचे मत ऐकून घ्यावे, अशी विनंती ही विजयन यांनी केली आहे.
वाहनांच्या रांगांमुळे दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-हरियानाच्या सीमेवरील सिंघू आणि टिक्री येथून होणारी वाहतूक बंद आहे. दिल्लीच्या वाहतूक पोलिसांनी हरियानात जाण्यासाठी इतर पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. मात्र मंगळवारी सकाळी राजधानी दिल्लीतील रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. परिणामी, दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
सिंघू सीमा दोन्ही बाजूंनी बंद आहे. त्यामुळे वाहतूक मुकारबा चौक आणि जीटीके रस्त्यावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे सिग्नेचर पूल ते रोहिणी आणि जीटीके रस्ता, एनएच ४४, सिंघू सीमा येथे जाणे टाळावे, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. टिक्री सीमा ही बंद असल्याने बादुसराय आणि झटीकारा सीमा फक्त दुचाकी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडीने दिल्लीकर हैराण झाले आहेत.
- 1 of 657
- ››