दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
अॅग्रो विशेष
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळ
दिल्ली पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर हरियाना-दिल्ली सीमेवरील सिंघु येथे जमा झालेले आंदोलक शेतकरी शुक्रवारी रात्री दिल्लीतील बुराडी परिसरातील एकवटले. बुराडी येथे जमा झालेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर हरियाना-दिल्ली सीमेवरील सिंघु येथे जमा झालेले आंदोलक शेतकरी शुक्रवारी रात्री दिल्लीतील बुराडी परिसरातील एकवटले. बुराडी येथे जमा झालेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते गुरिंदर सिंग म्हणाले, ‘‘आम्ही चार-पाच महिने पुरेल इतके अन्नधान्य घेऊन आलो आहे. आम्ही आमचे जेवण आम्हीच तयार करीत आहे. दिल्लीत तळ ठोकून काळे कायदे मागे घेण्याची सरकारला विनंती करणार आहोत. आम्ही पंजाबचे शिख आहोत, कुणाचेही वर्चस्व खपवून घेणार नाही. आंदोलनस्थळी लंगर सुरू आहे. कुणाही आंदोलक उपाशी राहणार नाही. आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो आहोत. पोलिसांसह कुणीही येथे येऊन जेवण करू शकतात. काळे कायदे माघारी घेतल्यानंतरच येथून माघारी जाऊ.’’
दिल्ली पोलिसांचे शांतता राखण्याचे आवाहन
दिल्ली पोलिसांनी बुराडी येथील निरंकारी समागम स्थळावर शेतकऱ्यांना शांततामय रीतीने आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर आंदोलक रात्रभर बुराडी येथे येत होते. बुराडी येथे शांततामयरित्या आंदोलन करावे, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. दरम्यान, अंबालाचे पोलिस अधीक्षक राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाना-पंजाबमधून दिल्ली येणाऱ्या रस्त्यांवरील सर्व अडथळे काढून टाकण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे.
आंदोलन मागे घेण्याचे कृषिमंत्र्यांचे आवाहन
दिल्लीतील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि थंडीचा जोर पाहता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केले आहे. केंद्र सरकार तिन्ही कायद्यांबाबत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास तयार आहे, असेही तोमर यांनी म्हटले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तोमर म्हणाले, ‘‘केंद्र सरकार शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास तयार आहे. आम्ही यापूर्वीच त्यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. तीन डिसेंबर रोजी आणखी एक चर्चेची फेरी होणार आहे. त्यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना बोलविण्यात आले आहे. माझी आंदोलक शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांना विनंती आहे की, कोरोना आणि थंडीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घ्यावे.’’
दरम्यान, गुरुवारी (ता. २६) बोलताना तोमर यांनी म्हटले होते, ‘‘ केंद्राने केलेले कायदे क्रांतिकारी आहेत. शेतकऱ्यांना केंद्राचे प्रथम प्राधान्य आहे. शेतकरी विरोधात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. चर्चेतून नक्कीच मार्ग काढता येईल.’’
दरम्यान केंद्र सरकारच्या वतीने आंदोलक शेतकरी आणि त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली पोलिस ही अत्यंत संयमाने आंदोलन हाताळत आहेत. केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी आंदोलकांना आवाहन करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे, असे ते वारंवार सांगत आहेत.